अडीच हजार वर्षापूर्वी बौद्ध तत्त्वज्ञानाची ओळख जगाला झाली. या बौद्ध तत्वज्ञानामुळे अध्यात्मिक उन्नती मानवाने कशी करावी याची जाणीव झाली. तसेच नैतिकता आणि सदाचरण यांचा प्रभाव चांगल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे याचे मार्गदर्शन मानवजातीला झाले. तसेच त्यातून विकास साधून सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कसे करावे याचे धडे मिळाले. जेम्स ए एफ स्टोनर यांच्या व्याख्येप्रमाणे व्यवस्थापन म्हणजे नियोजन, एकत्रीकरण, निरीक्षण, सर्व घटकांचे मार्गदर्शन व मदतीचा स्त्रोत या सगळ्याचा परिपाक आहे. उद्योगधंद्यात योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रमुखाकडे असावी लागते. आणि ती धम्माच्या आचरणाने प्राप्त होते हेच मोठे इंगित आहे.
बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना प्रत्येक गोष्टीतील सार पाहून त्याचा वापर व्यवसाय व्यवस्थापनात ( Business Management ) कसा करावा याचे अनेक धडे आढळून येतात. अनेकांनी बौद्ध तत्वज्ञान आणि व्यवस्थापन यावर संशोधन केले आहे. तरीही कामगारांचे, आर्थिक बाबींचे, खरेदी-विक्रीचे आणि उत्पादनाचे व्यवस्थापनबाबत खूपच कमी लिहिण्यात आले आहे. आणि जेंव्हा ही माहिती विविध बुद्ध गाथांमधून, जातक कथांमधून सामोरी येते तेव्हा सामान्यजनास व्यवसाय कसा करायचा याचे बाळकडू मिळते. योग्य गुणवत्तेच्या मालाची किंवा वस्तूची विक्री करताना चांगली वर्तणूक, मधुर आणि चतुर संभाषण आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो. जो सचोटीने या बाबी पाळून व्यवसाय करतो त्याची अध्यात्मिक उन्नती होतेच त्याचबरोबर व्यवसाय वृद्धिही होते. द्रव्यांची, मालाची, सहकार्याची उणीव भासत नाही. मदतीचा ओघ चारी दिशेकडून वहात राहतो. यातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग हा धम्मासाठी, समाजातील गरीब घटकांसाठी सुद्धा खर्च झाला पाहिजे.
पंचशीलाचे पालन आणि ध्यानसाधना यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होत असल्याचे दाखले आहेत. त्याचबरोबर व्यसनाधीनता, तंटे, अपघात यांचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून येते. काही लोकांना वाटते की धनाचा अपहार करणे, चुकीचा मार्ग अवलंबीने, द्रव्य घेऊन पळून जाणे, देणी बुडविणे या गोष्टींमुळे व्यवसायाची भरभराट होते. परंतु यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबाची अधोगती होते. अशा व्यक्तीस “काळा भुजंग” हे नामनिधान प्राप्त होते असे बौद्ध तत्वज्ञानात सांगितले आहे. तरी व्यवसाय बुध्दिष्ट मॅनेजमेंटनुसार केल्यास तो भरभराटीला येतो. म्हणूनच दोन हजार वर्षांपूर्वीपासून भारतखंडातील सर्व बंदरे व्यापारी गलबतांनी गजबजलेली होती. त्याकाळी सचोटीने सर्व प्रमुख देशांशी व्यापार चालत होता. आणि म्हणूनच व्यापाऱ्यांनी त्यांच्या मार्गावर लेण्यांच्या निर्मितीसाठी भरघोस दान दिले होते.

“चुल्लकसेठ्ठी जातक” कथा एका हुशार मुलाने चुल्लक यांचे बोलणे ऐकून एका उंदरापासून व्यवसाय सुरू करून हजारो सुवर्णनाणी कशी मिळविली याची स्फूर्तिदायक गोष्ट सांगते. “सेरिववाणिज जातक” कथा दारोदारी फिरणाऱ्या प्रामाणिक विक्रेत्यास सुवर्णपात्र कसे प्राप्त झाले हे सांगते. “कंचनक्खदं जातक”कथेतून प्राप्त झालेल्या धनाचे चार वाटे करून कामासाठी, कुटुंबासाठी, भविष्यासाठी व दानधर्मासाठी कसे खर्च करावेत याची माहिती मिळते. थोडक्यात बुद्ध तत्वज्ञान हे सदाचरणाने, नैतिकतेने व सत्यमार्गाने जीवन कसे व्यतीत करावे हेच सांगते. या प्रमाणे आचरण करून जे हुशार तरुण व्यवसायात उडी घेतात ते यशस्वीच होतात, याचे अनेक दाखले जगापुढे आहेत.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)