जगभरातील बुद्ध धम्म

कझाकस्तान मधील बौद्ध धर्म

जुन्या सोव्हिएत रशियाच्या तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किरजिस्तान आणि कझाकस्तान प्रांतामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्माचा सिल्क रोड द्वारे प्रवेश झाला होता. त्यावेळी येथे बौद्ध संस्कृती खूप बहरलेली होती.

कझाकस्तान हा प्रांत आता स्वतंत्र देश असून प्रामुख्याने तुर्कीश लोकांची वसाहत येथे होती. आठव्या शतकात मुस्लिम आक्रमणाने हा प्रांत ढवळून निघाला. आणि राजाच मुस्लिम झाल्याने प्रजेने सुद्धा त्याचे अनुकरण केले. आता ठिकठिकाणी ज्ञानार्जनामुळे माणसातील संशोधक वृत्ती वाढली असून बौद्ध धर्माच्या असंख्य खुणा या देशात उजेडात येत आहेत.

‘तम् गली तास’ हे ऐतिहासिक स्थळ या देशात असून येथे दगडांच्या मोठमोठ्या शिळेवर बुद्ध चित्रांचे कोरीवकाम व पेंटिंग केलेले आढळून आलेले आहे. तसेच अनेक प्राणी यांचे आकार या दगडी शिळाना दिलेले आहेत. येथील कोरा नदीच्या आजूबाजूस असलेल्या पर्वतरांगांमध्ये बुद्ध प्रतिमा सापडत आहेत. स्तुपांचे अवशेष आढळून येत आहेत.

दगडांच्या मोठमोठ्या शिळेवर बुद्ध चित्रांचे कोरीवकाम व पेंटिंग

तेथील मोठ्या दगडी स्तुपा भोवताली चंक्रमन करण्याचा मार्ग असून अजूनही ती परंपरा तेथील लोंकामध्ये आहे. तेथील सुफी ध्यानधारणा करतात. श्वासोच्छ्वासावर आधारित मंत्रोच्चार करतात. या वरून तेथे महायान / वज्रयान बौद्ध परंपरा मुस्लिम संप्रदायात स्थापित झाल्या आहेत यास पुष्टी मिळते. सायराम येथे जमिनीखाली मोठे दगडी बौद्ध विहार आढळले आहे. कारागंडा प्रदेशात विहारांचे अवशेष आढळले आहेत.

सोव्हिएत रशियाचा अस्त झाल्यावर तेथील सर्व प्रांतात बौद्ध धम्माचा परत उदय होत असून Diamond Way Buddhist या शाखेची ७० केंद्रे आतापर्यंत स्थापित झाली आहेत.