जगभरातील बुद्ध धम्म

रशियातील पर्वतरांगेत बुद्धप्रतिमा

रशियातील बुर्यातीया या प्रातांत बमंगोल गावाजवळील पर्वतरांगा मध्ये एक उभा सपाट पृष्ठभाग होता. स्थानिक गावकऱ्यांनी त्यावर बुद्धप्रतिमा कोरण्याचा विचार केला आणि ही बाब तिबेटीयन गुरू ऍलो रिंपोशे यांना कळवली. त्यांना ही कल्पना आवडली आणि लगेच त्यावर कार्यवाही सुरू केली.

बुद्धप्रतिमा

सन २०१६ मध्ये हे काम पूर्ण झाले आणि १० सप्टेंबर २०१६ रोजी या ३३ मी. उंच बुद्ध प्रतिमेचा समारंभपूर्वक अभिषेक केला गेला. यावेळी जवळजवळ १० लाख फुले वाहिली गेली. रशियातील अनेक शहरातून लोकांनी येऊन येथे हजेरी लावली. मिठाई, फळे वाटण्यात आली. ही भव्य बुद्धप्रतिमा दूरवरून सुद्धा दिसत असल्याने येथे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भूमिस्पर्श असलेली बुद्धप्रतिमा उभारल्यास माणसांमधील उल्हास वाढतो, वैरभावना कमी होते, तेथील प्रांतात सुबत्ता नांदते असे तेथे मानले जाते. अशा समजुतीवर विश्वास ठेवा अगर न ठेवा पण बुर्यातीया प्रांत बौद्ध प्रांत म्हणून झपाट्याने नावारूपास येत आहे हे मात्र नक्की.

बुद्धप्रतिमा

आपल्या महाराष्ट्रात अनेक पर्वतरांगा आहेत. तरीही आपल्याकडे बुद्धप्रतिमा अथवा बुद्धमूर्ती उभारल्याचे कुठेच दिसत नाही. श्रीलंकेत ठिकठिकाणी हिरव्यागार डोंगरात सफेद बुद्धमूर्ती दिसतात. यामुळे तेथील परिसराला एक वेगळीच शोभा येते. आपल्याकडे मुंबई पुणे हायवेवरील आजूबाजूच्या डोंगरात सफेद बुद्धमूर्ती उभारण्याची कल्पना वास्तवात येईल काय?

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)