एखाद्या डोंगरात कोरलेली वास्तूला लेणीं म्हणावे कि गुहा हे खरं तर माझ्यासारख्या इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र न शिकलेल्याला (विद्यार्थीदशेत) पडायला हवा. मात्र जेव्हा काही “इतिहासतज्ञ” किंवा या विषयात “विद्यावाचस्पती” (PhD) पदवी धारण करणारे लेणींना “गुहा” असे संबोधायला लागतात तेव्हा हे अज्ञान दूर करायला हवे.

नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीं मधील २७ शिलालेखात लेणीं हा शब्द २१ वेळा येतो. डेविड एफर्ड यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शिलालेख असणाऱ्या काही लेणींचा अभ्यास केला. त्यात त्यांना ४७ ठिकाणी लेणीं हा शब्द दिसला. म्हणजेच “लेणीं” हा शब्द बुद्ध लेणींमध्ये इ.स.पूर्व २०० पासून ते इ.स.८०० पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो.
आचार्य बुद्धघोष यांनी इ.स.५व्या शतकात “विभंग” या पालि ग्रंथावर “सम्मोहविनोदनी” हा टीकाग्रंथ लिहिला. त्यात लेणीं आणि गुहा यांची व्याख्या करताना लिहितात – गुहा म्हणजे डोंगरात किंवा उंच जमिनीत नैसर्गिक रित्या तयार झालेली खोली अथवा खड्डा तर लेणीं म्हणजे खडकात कोरून बनवलेली वास्तू”. पालि प्राकृत भाषेतील लेणीं या शब्दाला संस्कृत मध्ये पर्यायी शब्द आहे “लयन” ज्याचा अर्थ होतो राहण्याची खोली अथवा जागा.

बौद्ध भिक्खूंसाठी पाषाणामध्ये कोरलेल्या या सुंदर कलाकृती “बुद्ध लेणीं”च आहे हे लक्षात घ्यावे…
महाराष्ट्रात असलेल्या जवळपास ११०० लेणींमधील अनेक नावे, त्यांचे शिलालेखांचे अर्थ किंवा त्यांचा काळ हे जाणून बुजून अथवा अनावधानाने अथवा अज्ञानाने चुकीचे सांगितले जातात. यांचा अभ्यास होणं खूप गरजेचे अन्यथा PhD घेऊन देखील आम्ही आमचे हसे करून घेऊ!!!
अतुल भोसेकर, (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)
Very imp information to devlop our knowledge ,