इतिहास

चांद्रवर्षं कॅलेंडर; भारतीय कालमापनाची परंपरा बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर अन्य देशात सुद्धा गेली

भारतात चांद्रवर्षावर आधारित कॅलेंडर मध्ये जे चैत्र, वैशाख….फाल्गुन महिने आहेत ती नावे तीन हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या साहित्यात आढळत नाहीत. जे पुरातन साहित्य म्हणून ऋग्वेद आणि अनुषंगिक ग्रंथांचा उदोउदो केला जातो त्यातही ही नावे आढळत नाहीत. इ.स. पूर्व ५ शतकापासून म्हणजेच बुद्धांच्या कालखंडा नंतर ही नावे उदयास आल्याचे दिसून येते. मात्र नक्षत्रांचा अभ्यास भारतीय खंडात पूर्वीपासून असल्याचे अनेक साहित्यावरून दिसून येते. बुद्धांच्या कालखंडानंतर पौर्णिमेस अत्यंत महत्व प्राप्त झाले. त्यामुळे भारतीय कॅलेंडरमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रामध्ये असतो त्यानुसार महिन्यांची नावे ठेवली गेली हेच सत्य आहे.

चांद्रवर्षावर आधारित भारतीय कालमापनाची परंपरा बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर अन्य देशात सुद्धा गेली आणि तिथे ती रूढ झाली. थोडक्यात चांद्र आणि सौर वर्षावर आधारित कालमापणाचा आणि पंचांगाचा जो वापर आज आपण करीत आहोत त्याचे श्रेय हे बौद्ध संस्कृतीला जाते.

इंग्रजी महिन्यांच्या नावाचा आणि खगोलशास्त्राचा काडीचाही सबंध नाही. वर्षभराच्या काळात चंद्र १२ वेळा २७ नक्षत्रांची प्रदक्षिणा करतो. त्यापैकी काही नक्षत्रांजवळ असताना चंद्राची पोर्णिमा असल्याचे बौद्ध खगोल तत्वज्ञानी यांच्या ध्यानी आले. भगवान बुद्ध यांचे पोर्णिमेशी असलेले अतूट नाते पाहता त्या दिवशी असलेल्या नक्षत्राला अत्यंत महत्व प्राप्त झाले. म्हणूनच कोणी कितीही काही म्हणो परंतु भारतीय महिने, तिथी, पंचांग यांचा इ.स. ४ थ्या शतकापासून झालेला उदय हा नालंदा विद्यापीठातील संशोधनाचा, शिकवणुकीचा परिणाम आहे. राशीचक्राचे ही असेच आहे. इ.स.पूर्व ५०० वर्षांपर्यंत भारतीय हिंदू ग्रंथात राशींची नावेच येत नाहीत. ‘वेदांग ज्योतिष’ या पुरातन ग्रंथात देखील राशींचा उल्लेख नाही. राशीचक्रांची कल्पना आणि त्यांच्या संस्कृत नावांचा उदय ही देखील नालंदा विद्यापीठाची देणगी आहे. मात्र पुरोहित वर्गाने या सर्व शोधांचा वापर केवळ स्वहितासाठी आणि अंधश्रद्धा वाढविण्यासाठी केला, हे निर्विवाद सत्य आहे.

ग्रेगरियन कॅलेंडर हे सूर्य आणि चंद्र यांच्या विविध कलांचा मागोवा घेत नाही. मात्र चंद्रवर्षावर आधारित असलेल्या कालमापन पद्धतीमध्ये याचा सविस्तर मागोवा घेतला जातो. या वर्षी १२ फेब्रुवारी रोजी माघ महिना सुरू झाला. तोच दिवस कोरिया, रशिया, चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर चांद्र नववर्ष म्हणजेच Lunar New Year म्हणून साजरे केले जाते. या दिवशी कुटुंबाचे सौख्य कायम रहावे आणि त्याच्या समृद्धीत वाढ व्हावी यास्तव आदल्या दिवशी घराची साफसफाई केली जाते. घराला नवीन आशीर्वाद मिळावेत यासाठी जुने अडगळीचे सामान काढून टाकून घर स्वच्छ लख्ख केले जाते. आशिया खंडात चीन, व्हिएतनाम, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. जगातील १.५ बिलियन लोक नवचंद्र वर्ष साजरे करतात. या दिवशी वरील देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. चीनमध्ये यास चून जाय, व्हिएतनाममध्ये तेथ, कोरियात सेउल्लंल तर तिबेटमध्ये लोसर असे म्हटले जाते. या वर्षी निळा आणि जांभळा रंग हा लकी रंग मानण्यात आला आहे. परंतु लाल रंग सुद्धा नवीन चंद्रवर्ष साजरा करण्यासाठी व चांगल्या भविष्यासाठी लोकप्रिय आहे. या दिवशी भाताचा गोड पदार्थ ( खिर) तयार केला जातो.

भारतात माघ महिन्यात मोठी माघपूजा केली जाते. भगवान बुद्धांच्या काळात माघ पौर्णिमेदिवशी १२५० अहर्त झालेले भिक्खू बुद्धांना येऊन भेटले. म्हणून या दिवसाला संघ दिवस असे सुद्धा म्हटले जाते. माघ महिन्याच्या पौर्णिमेलाच भगवान बुद्धांनी तीन महिन्यानंतर महापरिनिर्वाण होणार असल्याचे विदित केले होते. दीड हजार वर्षांपूर्वी याच महिन्यात प्रयाग संगमावर राजे लोकांचे मेळे भरविले जात. बुद्ध प्रतिमेची मिरवणूक काढली जात असे. धम्माचा अभ्यास असलेले प्रकांड पंडित यांचे आखाडे भरविले जात. हळूहळू याचेच रूपांतर कुंभमेळ्यात बदलत गेले. पुढेपुढे अनेक देवतांचा समावेश माघी पूजेत झाला. थोडक्यात आताच्या सण, चालीरीती, परंपरा यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास तो बौद्ध संस्कृती पर्यंत पोहोचतो. विक्रम सवंत आणि शालिवाहन शक सुरू करणारे राजे बौद्ध होते याबाबत कोणीच काही बोलत नाही. म्हणून बौद्ध संस्कृतीचे अध्ययन करणाऱ्या व विविध विषयांचे संशोधन करणाऱ्या प्राचीन विद्यापीठाचें हे ऋण ओळखले पाहिजे. मात्र प्रामाणिकपणे ते मान्य करणे अनेकांना अवघड जाते. तरी सुरू झालेले नवीन चांद्रवर्ष अखिल जगतासाठी निरोगी आणि समृद्धीचे जावो.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *