एखाद्या शांत सुंदर निसर्गरम्य पर्वतराजीत गेलात आणि तेथील शिखरावर धीरगंभीर आवाजात बुद्ध वंदना म्हणालात किंवा महामंगल सुत्त किंवा जयमंगल अठ्ठगाथा यांचे जर पठण केलेत, तर बघा आसमंतात कंपने होऊन किती छान प्रतिसाद मिळतो. चित्तवृत्ती उल्हासित होतात. अंगावर रोमांच येतात. याचा प्रत्यक्ष अनुभव चीन, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, नेपाळ आणि भारतातील भिक्खूंनी बुद्धभूमीत घेतला.
दीड वर्षांपूर्वी १४ डिसेंबर २०१७ ते १७ डिसेंबर २०१७ मध्ये महायान पंथातील विविध बुद्ध सूत्रांचे पठण वरील देशातील भिक्खुंनी ग्रीधकुट पर्वतराजित केले. हा कार्यक्रम लाईट ऑफ बुद्ध धम्म फाउंडेशन आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेने आयोजित केला होता. यामध्ये जवळजवळ दीडशेहून जास्त भिक्खूंनी भाग घेतला. १४ डिसेंबर २०१७ रोजी सर्वजण थंडगार वातावरणात ग्रिधकुट पर्वतावर गेले. आणि तिथे त्यांनी सामुहिकपणे सूत्रांचे पठण केले. या सूत्रांमध्ये प्रज्ञापारमिता सूत्र, सद्धर्म पुंडरिक सूत्र, सुरंगमासमाधी सूत्र, ललितविस्तार सूत्र आणि भद्रकल्पिका सूत्र यांचा समावेश होता. अडीच हजार वर्षापूर्वी सुद्धा भगवान बुद्धांनी ग्रीधकूट पर्वतावर सूत्रे सांगून धम्मचक्र गतिमान केले असे चीन आणि कोरियन बौद्ध साहित्यात म्हटलेले आहे.
आता कित्येक वर्षांनी बुद्ध सूत्रांचे खुल्या वातावरणात, निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा वाचन झाले ही खरोखर महत्वपूर्ण घटना होय.बौद्ध देशांची एकजूट या निमित्ताने दिसून आली. हे ही तितकेच खरे. अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी व्हायची अनेकांची इच्छा असते. पण असे कार्यक्रम पार पडल्यानंतर त्याची बातमी कळते. यासाठी प्रत्येकानेे International Buddhist Confederation ( IBC) यांच्या होणाऱ्या कार्यक्रमांची सूची त्यांच्या वेबसाईटवर पहावी. तसेच लाईट ऑफ बुद्ध धम्मा फौंडेशनच्या साईटला भेट द्यावी. व होणाऱ्या कार्यक्रमाची सूची सोशल मीडियावर टाकावी. म्हणजे आपल्या बांधवांना सुद्धा वेळेत माहिती मिळेल. अशाच प्रयत्नांनी धम्म वाढेल, त्याची गोडी लागेल आणि पुन्हा या भूमीत बुद्ध बहरेल.
संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)