बातम्या

प्राचीन बुद्धमूर्ती संकटात; 71 वर्षानंतर पुराचं पाणी बुद्ध मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचलं

तब्बल 71 वर्षानंतर चीनमधल्या लेशान शहरापासून जवळच असलेल्या बुद्धांच्या भव्य मूर्तीला पाण्याचा वेढा पडला आहे. 233 फूट उंचीची ही प्राचीन बुद्ध मूर्ती चीनचा ऐतिहासिक वारसा आहे. यंदाच्या पुराचं पाणी बुद्ध मूर्तीच्या पायापर्यंत पोहोचलं आहे. जे मुळात जमिनीपासून कित्येक फूट उंचावर आहे. चीनमधल्या मागच्या दोन पिढ्यांनी असं दृश्यं पाहिलं नव्हतं. शेती आणि घरं गिळल्यानंतर चीनमधला महापूर आता ऐतिहासिक वास्तूंसाठी संकट बनला आहे. चीनचं नाही, तर खुद्द युनेस्कोनंसुद्धा चीनमधल्या पुराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बुद्धमूर्तीचा इतिहास काय आहे?

चीन देशातील लेशानमध्ये गौतम बुद्धांचा ७१ मीटर म्हणजे २३३ फूट उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा असून या मूर्तीचे सर्वात लहान बोट एवढे मोठे आहे की दोन माणसं त्यावर आरामात बसू शकतात. या मूर्तीत भगवान बुद्ध गंभीर मुद्रेत दिसतात. बुद्धांचा हात आपल्या गुडघ्यावर आणि ते नदीकडे एकसारखे टक लावून पाहत आहेत असे दिसते.

चीनच्या लेशान शहरापासून जवळच असलेल्या डोंगरात बसलेल्या अवस्थेतील ही भव्य भगवान बुद्धांची मूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान तांग राजघराण्याच्या काळात एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीव काम करून बनवली आहे. भगवान बुद्धांची ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. त्यासोबतच प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणून या मूर्तीला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोर तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम झाला आहे. इ.स. १९९६ साली या स्थळाला युनेस्को ने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागेवर ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक बुद्ध मूर्ती आणि कोरीवकामे दिसतात.

मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना

त्याकाळी मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचे प्रवाह फार वेगवान होते, नद्या संगमाच्या जागेवर नेहमी जहाज दुर्घटनाग्रस्त होत असत. हा सर्व प्रकार पाहून हैतांग नावाच्या बौद्ध भिक्खूंनी स्थानिक गव्हर्नरला असे पटवून दिले की येथे बुद्धमूर्तीची उभारणी केल्याने ही जागा सतत बुद्धांच्या नजरेसमोर राहून या दुर्घटना टळतील. (बौद्ध भिक्खूचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता पण हे काम करून घेण्यासाठी बुद्धमूर्तीचे कारण सांगितले) सरकारी पाठिंब्याने व हैतांगांच्या पुढाकाराने या मूर्तीचे काम इ.स. ७१३ ला सुरू झाले. काही काळाने गव्हर्नरने मदत बंद केली आणि काम बंद पडले. काम बंद केल्याचा निषेध म्हणून आणि स्वतःची मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना दाखवण्यासाठी हैतांगांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले. हैतांग त्या अर्धवट अवस्थेतील मूर्तीशेजारच्या गुहेत राहू लागले. काही काळाने त्यांचा मृत्यूही झाला. त्यानंतर ७० वर्षांनी जिएदुशी नावाच्या गव्हर्नरने पुढाकार घेऊन प्रकल्पाला पाठिंबा आणि अर्थबळ देऊन तो पूर्ण करून घेतला. एवढी प्रचंड मूर्ती कोरताना कपारीतून मोठ्या प्रमाणात दगड निघत असत आणि ते नद्यांच्या संगमाच्या पात्रांत टाकले जात असत. या भरीमुळे ती मूर्ती बनेपर्यंत नद्यांचे प्रवाह खरोखरच संथ होऊन जहाजांचे अपघात होणे थांबले होते.

आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना मानला जातो. त्यात पावसाच्या पाण्याने मूर्तीची झीज होऊ नये व पाणी सहज वाहून जावे यासाठीही एक नलिकायोजना होती. मूर्ती तयार झाल्यावर तिच्यावर १३ मजली उंच लाकडी छत बांधले होते. छताला व मूर्तीला सोने व माणकांनी सजवले परंतु युवान राजघराण्याच्या आक्रमकांनी या छताची मोडतोड करून सोने माणके लुटून नेली.