ब्लॉग

चिवर आणि त्याचा भगवा रंग, सत्यमार्गाचा खरा संग

चिवराला नैसर्गिकरित्या पिवळा, भगवा रंग येण्यासाठी मुख्यत्वे फणसाच्या झाडाच्या सालीचा, पुष्पांचा, हळदीचा वापर अजूनही म्यानमारमध्ये केला जातो. या रंगामुळे चिवर गडद न दिसता त्यात साधेपणा येतो. भगवा रंग हा अनासक्ती, अनित्यता, क्षणभंगुरता दर्शवितो. या रंगामुळे मनात विकारांचा क्षोभ होत नाही.

अडीच हजार वर्षापासून चालत आलेल्या भिक्खुंच्या या चिवराच्या परंपरेचा फार मोठा पगडा भारतीय संस्कृतीवर पडलेला आहे. त्यामुळे भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र तपस्वी, योगी, मठाधिपती, संन्यासी, भिक्षेकरी, आचार्य, साधू, स्वघोषित गुरूं आणि बाबालोक यांनी देखील भगवी वस्त्रे परिधान करण्याची रीत उचलली. दुःखमुक्तीच्या मार्गाची तोंडओळख नसलेल्या चलाख व्यक्ती भगवी वस्त्रे लेऊन आणि गुरूंचे लेबल लावून आज भोळ्या लोकांची दिशाभूल करीत आहेत हे पाहून कीव वाटते. असो, जे सत्यमार्गावर चालले आहेत त्या सुज्ञांनी पाखंड्याचां संसर्ग होऊ न देता एकट्याने मार्गक्रमण करून आपले लक्ष्य गाठावे. सुत्तनिपात ग्रंथात एक गाथा आहे.

संसग्गजातस्स भवतीं स्नेहा स्नेहन्वय दुखंमिंद पहोति |
आदिनवं स्नेहज्ज पेक्खमानो एको चरे खग्गविसाणकप्पो ||

अर्थ :- संसर्ग घडल्याने स्नेह उत्पन्न होतो. स्नेहा पासून दुःख उत्पन्न होते. स्नेहा पासून उत्पन्न होणारा हा दोष पाहून सुज्ञाने गेंड्याच्या शिंगाप्रमाणे एकाकी रहावे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)