जगभरातील बुद्ध धम्म

जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे? कन्फुशियसने हे उत्तर दिले

अनेक चिनी पौराणिक कथांतून ‘पश्चिम स्वर्गा’चे वर्णन वाचावयास मिळते. त्या स्वर्गात सर्वत्र सुख आणि शांती आहे. तेथील सर्व वस्तू सोन्या-रूप्याने आणि मौल्यवान जड जवाहिरांनी सुशोभित केलेल्या आहेत. तेथील निर्झर स्वच्छ पाण्याचे असून ते सोनेरी वाळूवरून वाहतात. तलावात सर्वत्र कमळांची फुले आहेत. आजूबाजूच्या पाऊलवाटा आल्हादकारक आहेत. तेथे कर्णमधूर संगीत नेहमी ऐकू येते आणि दिवसातून तीनदा फुलांचा वर्षाव होतो. तेथे जन्मलेले सुखी प्राणी आपल्या वस्त्रांसह दुसऱ्या जगात जाऊन तेथे राहात असलेल्या अगणित बुद्धांच्या पुढे पुष्पांची आदरांजली वाहू शकतात. हा ‘पश्चिमेचा स्वर्ग’ म्हणजेच जम्बुद्वीप किंवा भारतवर्ष आहे अशी ठाम समजूत जुन्या चिनी वाङ्मयात आढळून येते.

चिनी लोकांना भारताबद्दल इतका आदर वाटण्याचे एकमेव कारण म्हणजे हा देश शाक्यमुनी गौतम बुद्धांचा आहे, ह्याच देशात त्यांचा जन्म झाला, येथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि येथेच मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी धम्मज्ञान दिले.

चीनमध्ये बुद्धधम्माचा शिरकाव केव्हा आणि कसा झाला हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. असे म्हणतात की, एका राजाच्या फॉन नावाच्या मंत्र्याने कन्फुशियसला एकदा विचारले की, जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे? ‘ कन्फुशियसने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले की, ‘ पश्चिमेच्या देशात राहात असलेल्या एका स्वर्गीय तत्त्वज्ञानी माणसाबद्दल मी ऐकले आहे. या कथेचा संदर्भ देऊन बहुतेक सर्व चिनी बौद्ध असे अनुमान काढतात की, कन्फुशियसला गौतम बुद्धाबद्दल माहिती होती.

चिनी विचारवंत कन्फुशियस

कन्फुशियस कोण होते?

ज्या वेळी भारतात गौतम बुद्ध आपल्या धम्माचा आणि विचारांचा प्रचार करत होते त्यावेळी चीन मध्ये कन्फ्युशियस यांचा जन्म झाला होता. कन्फ्युशियस एक प्राचीन चिनी विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, जपानी, कोरियन व व्हिएतनामी लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो. कन्फ्युशियस ईश्वराबद्दल कधीच काही सांगितले नाही तसेच धर्म स्थापन सुद्धा केला नाही. परंतु आज कन्फ्युशियस हा चिनी मूळ धर्म असल्याचे म्हण्टले जाते. कन्फ्युशियस एक विचार आणि जीवनशैली आहे.

2 Replies to “जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे? कन्फुशियसने हे उत्तर दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *