लेणी

भारतातल्या पहिल्या कोरीव लेणींची निर्मिती आणि इतिहास

“भारतामध्ये कोरीव लेणींची निर्मिती ही सर्वात प्रथम सम्राट अशोक याच्या काळात झाली.बौद्ध भिक्षूंना हवा असलेला एकांत, ध्यान-धारणा , चिंतन-मनन करण्यासाठी लागणारी शांतता ही नगरात किंवा गावात निवास करुन मिळणारी नव्हती. या साठी त्याने मनुष्यवस्तीपासून दूर अशा डोंगरपरिसरात ही ‘शैलगृहे’ अर्थात ‘लेणी’ खोदविली.

अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यांनी बौद्ध भिक्खूंसाठी दक्षिण बिहारमधील बाराबर, नागार्जुनी, व सितामढी इ. ठिकाणी ही सुरुवातीची लेणी खोदविली. बाराबर येथे सुदामा, विश्वामित्र, कर्णकौपर, व लोमशऋषी ही चार लेणी आहेत. त्यापैकी ‘सुदामा’ हे लेणे सर्वच प्राचीन असून,’न्यग्रोध गुंफा’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. याची रचना साधी असून, समोर आयताकार दालन व त्यानंतर वर्तुळाकार खोली आहे.

या लेणींपासून सुमारे १.५ कि मी. अंतरावर ‘नागार्जुनी’ गुहा आहेत. गोपिका, वाडिहक व वडलिक या तीन लेण्यांचा समावेश त्यात आहे. या लेणींचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगरातील खडकाला समांतर अशी खोदलेली आहेत. ‘बाराबर’ येथील सुप्रिया व ‘नागार्जुनी’ येथील गोपिका ही लेणी प्रशस्त आहेत.या समूहातील ‘सुदामा’ व ‘लोमशऋषी’ ही लेणी सर्वात प्राचीन असून, ती आकाराने लांबट आयताकार असून त्यातील एका टोकाची रचना ही गजपृष्ठाकार असून ती अर्धगोलाकार आहे.

‘लोमशऋषी’ लेण्याचे प्रवेशद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणींहून भिन्न आहे. ते रेखीव असून, अर्धस्तंभांनी युक्त चौरसाकृती द्वार व त्यावर अर्धगोलाकार आकारातील चैत्यकमान कोरलेली असून कमानीच्या वरच्या भागात जाळी कोरलेली असून , त्याखाली स्तूपाला वंदन करणाऱ्या आठ हत्तींचे कलात्मक शिल्पांकन आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प लेणींमधील ‘शैल शिल्पकले’ ची सुरुवात ठरते. ही लेणी अतिशय साधी असून, बौद्ध भिक्खूंच्या समर्पित जीवनाशी या लेणींची जवळीक साधलेली आहे.

मुखदर्शनाचा काही अलंकृत भाग वगळता या लेणीमधील साधेपण नजरेत भरण्यासारखेच आहे. ही लेणी खोदतांना तत्कालीन स्थापत्यविशारदांनी एखाद्या साध्या घरासारख्या ‘आकृतीबंधा’चा उपयोग केला असावा. एखादे घर ज्याप्रमाणे अगोदर लाकडी खांबावर तुळया व छत टाकून उभारण्यात येते, व नंतर भिंतीमध्ये दारे- खिडक्या बसवण्यात येतात, त्याप्रमाणे या ‘लोमशऋषी’ लेणींची प्रारंभीच रचना दिसून येते.

” चारही दिशांकडून आलेल्या भिक्खूंना पावसात राहता यावे, यासाठी ही लेणी खोदविली आहेत…” असे ‘बाराबर’ येथील लेणींच्या भिंतीवर सम्राट अशोक यांचा नातू ‘दशरथ’ याने ‘धम्मलिपी’तील शिलालेखातून लिहून ठेवल्याचे आपणांस आजही स्पष्टपणे दिसून येते….”

-अशोक नगरे, पारनेर,अहमदनगर (लेखक – बौद्ध शिल्पकला आणि इतिहास अभ्यासक)