बातम्या

मध्यप्रदेशच्या मंत्री महोदया बौद्ध स्थळांच्या प्रचारासाठी परदेशात

थायलंडमध्ये २६ ऑगस्ट पासून “बुद्ध भूमी भारत – बौद्ध पदयात्रा” हे अभियान चालविण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेशचे पर्यटन, सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वस्त निधी यांचे मंत्री श्रीमती उषा ठाकूर यांनी भाग घेतला. मलेशिया आणि कंबोडिया मध्ये देखील भारतातील बौद्ध स्थळांबाबतचा पर्यटन रोड शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देखील मंत्री महोदया यांनी भाग घेतला आणि मध्य प्रदेश मधील बौद्ध स्थळांचा तेथे प्रचार, प्रसार केला. बँकॉक येथे २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट पर्यंत एमकॉर्टियर शॉपिंग सेंटर येथे देखील बौद्ध स्थळांबाबतचे चर्चासत्र झाले. यामध्ये मध्य प्रदेशातील विविध बौद्ध स्थळांची माहिती देण्यात आली. यामध्ये सांची, विदिशा, ग्यारसपूर, उदयगिरी, सतधारा सुनारी आणि अंधेर व मुरेलखुर्द अशा स्थळांचा समावेश होता. पर्यटन मंत्री यांनी कौला लुंपुर आणि फेनॉम्पेन शहरातील टूर ऑपरेटर्स बरोबर पर्यटन रोड शो मध्ये देखील भाग घेतला.

भारतातील अनेक राज्याचे पर्यटन मंत्री किंवा त्या विभागाचे प्रमुख हे परदेशात जाऊन त्यांच्या राज्यातील बौद्ध स्थळांबाबत तेथे माहिती देतात. त्यांचा प्रसार करतात. यामुळे अनेक परदेशी पर्यटक त्यांच्या राज्यात येऊन पर्यटन स्थळे पाहतात. सप्टेंबर २०१८ मध्ये ओरिसा पर्यटन विभागाच्या प्रमुख अर्चना पटनाईक यांनी सुद्धा बँकॉक येथे पर्यटन रोड शो मध्ये ओरिसातील बौद्ध स्थळांचा प्रचार केला होता. आपल्या महाराष्ट्रात देखील लेण्यांच्या व स्तुपाच्या रूपाने बौद्ध संस्कृतीची अनेक महत्त्वाची स्थळे आहेत. परंतु आजपर्यंत कुठल्या महाराष्ट्रीयन मंत्र्याने परदेशात जाऊन महाराष्ट्रातील लेण्यांचा प्रचार-प्रसार केल्याचे दिसून आले नाही. खरोखर हे खेदजनक आहे की महाराष्ट्रात एवढे बौद्ध संस्कृतीचे सांस्कृतिक वैभव असून देखील पर्यटन विभागाला परदेशी जाऊन त्याचा प्रसार-प्रचार करावा वाटत नाही. भारताच्या परदेशी चलन गंगाजळीत वाढ होईल अशी पावले महाराष्ट्रातून टाकली जात नाहीत. नुसते परदेशातील उद्योगधंदे यांना आमंत्रित करून विकास साधला जात नाही. मने जुळण्यासाठी परदेशी पर्यटकांना देखील आकर्षित करणे महत्त्वाचे आहे. इतर राज्यांनी ही गोष्ट ओळखली असून बौद्ध पर्यटनास बढावा देत आहेत. आपला महाराष्ट्र मात्र जातीचे राजकारण करण्यात मश्गूल आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)