इतिहास

तथागत बुद्धांची दिनचर्या कशी होती?

बुद्धांची दिनचर्या कशी होती याचे वर्णन नुकतेच ‘The Manual of Buddhism’ या नारदा लिखित पुस्तकात वाचण्यात आले. बुद्ध दिवस-रात्र धम्म कार्यात व्यग्र असत. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत धम्माबद्दल प्रवचन देणे, श्रामणेर यांना भिक्खुंसाठी उपसंपदा देणे, त्यांना धम्माची माहिती देणे, त्यांचे मनोधैर्य उंचावणे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे तसेच भिक्खूंच्या शंकेचे निरसन करणे अशा कामात ते सतत व्यग्र रहात. तसेच वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत त्यांनी आपला उदरनिर्वाह हा स्वतः भिक्षा मागूनच केला. दुसऱ्या कुणावरही अवलंबून राहिले नाहीत. अहर्त पदाची पायरी गाठण्यासाठी त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या दिनचर्याचे मुख्यत्वे पाच भाग खालील प्रमाणे पडतात.

१) सकाळचा प्रहर २) दुपारचा प्रहर ३) संध्याकाळचा प्रहर (सहा ते दहा) ४) मध्यरात्रीचा प्रहर (रात्री दहा ते मध्यरात्री दोन) ५) पहाटेचा प्रहर ( मध्यरात्री दोन ते पहाटे सहा ). त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

१) सकाळी उठल्यावर ते धम्म चक्षूने धम्माची गरज जास्त कुणाला आहे याचा मागोवा घेत असत. त्याप्रमाणे त्यांची दिनचर्या घडून येत असे. जेथे जाणे आवश्यक आहे तेथे ते पायी चालून जात असत व आपल्या मनोबलाने वाट चुकलेल्यांना चांगला मार्ग दाखवीत. संसारात पसरलेली अशांती व अशुद्धता यांचा शोध घेऊन ते शांती आणि शुद्धतेत त्याचे परिवर्तन करीत.

२) त्यानंतर दुपारी मध्यान्ह पूर्वी भिक्षापात्रात प्राप्त झालेले भोजन घेत असत. भोजनानंतर ते छोटेसे प्रवचन देत व लोकांना त्रीरत्नास शरण जाण्यास सांगून पंचशीलाचे महत्त्व पटवून देत असत. तसेच इच्छुकांना उपसंपदा देऊन भिक्खू संघात दाखल करून घेत असत. त्यानंतर ते थोडी विश्रांती घेत.

३) संध्याकाळी त्यांचे प्रवचन होत असे, त्यावेळी सर्व भिक्खू एकत्र येत असत. संध्याकाळी ६ ते रात्री १० या प्रहरात भिक्खुंची प्रश्नोत्तरे होत असत. या काळात त्यांच्या शंकांचे निरसन केले जाई. बुद्धांना धम्माबाबत अनेक प्रश्न विचारले जात असत. तसेच साधने बाबत प्रश्नोत्तरे होत. अशावेळी बुद्ध सर्वांना धम्म सोप्या भाषेत समजावून सांगत असत. अशा तर्हेने पाच भिक्खुंपासून सुरू झालेले शास्त्यांचे शासन लाखो उपासक आणि भिक्खुंमध्ये सर्व मध्य भारतात त्याकाळी पसरले गेले.

४) मध्यरात्रीचा प्रहर हा रात्री १० वाजल्यापासून मध्यरात्रीच्या २ वाजेपर्यंत असे. या प्रहरात दुसऱ्या जगातील देव आणि मानवी दृष्टीस न दिसणाऱ्या व आकलन होणाऱ्या अमानवी शक्तींच्या शंकांचे निरसन होत असे. ‘संयुक्त निकाय’ या ग्रंथात अनेक देवलोकांच्या शंकांचे निरसन बुद्धांनी केल्याचा उल्लेख आलेला आहे.

५) पहाटेचा प्रहर हा मध्यरात्री २ पासून ते पहाटे ६ वाजेपर्यंत असे. या प्रहरातील पहिल्या भागात (२ ते ३) ते चक्रमंण करीत असत. व हळुवार चालत ध्यानधारणा करताना चराचर सृष्टीचा मागोवा घेत. त्यानंतर दुसर्‍या भागात ( ३ ते ४ ) ते एक तासाची उजव्या कुशीवर पडून निद्रा घेत असत. आनंद यांनी सांगितले आहे की बुद्ध निद्रा घेत असले तरी ते स्वभावतःच जागृत असत. तिसऱ्या भागात (४ ते ५) ते निब्बाण अवस्थेतील अहर्तपदाचा लाभ घेत. आणि चौथ्या भागात ( ५ ते ६ ) ते महाकारूणीक होत असत. चराचर सृष्टीतील सर्वांप्रती त्यांची करुणामय दृष्टी फिरत असे. म्हणूनच पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतचा काळ हा ध्यानधारणेस अतिशय उपयुक्त काळ मानला गेला आहे. “लवकर निजे लवकर उठे” ही उक्ती खरेतर पहाटेच्या ध्यानसाधनेच्या अभ्यासाकरिता निर्माण झाली असावी. शिलांचे पालन करून जे नियमित या काळात ध्यानधारणा करतात त्यांची झपाट्याने धम्माच्या क्षेत्रात प्रगती होते याचे दाखले आहेत.

अशातऱ्हेने बुद्धांची सर्व दिनचर्या धम्माच्या कार्यात व्यतीत होत असे. २४ तासात ते फक्त एक तास निद्रा घेत असत. दुपारच्या माध्यान्ह नंतर दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ते मेत्त भावनेत मग्न रहात असत. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी भिक्षा मागून आणलेल्या अन्नावर गुजराण केली. आणि या जागेवरून त्या जागेवर असे वर्षातील आठ महिने फिरत धम्माचा प्रसार केला. कधीही न थकता न दमता वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत ते कार्यरत राहिले. हजारो वर्षातून एखादाच असा बुद्ध मानवजातीच्या कल्याणाकरिता जन्मास येतो. आणि दुःख मुक्तीचा मार्ग मानव जातीस दाखवितो. आता त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालणे हे मानवजातीचे आद्य कर्तव्य आहे. जे त्यावरून चालत आहेत ते नक्कीच धम्मनिष्ठ आणि पुण्यकर्मी आहेत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)