बातम्या

दलाई लामांचा महाराष्ट्राला दिलासा; पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान देण्याचे ट्रस्टला आदेश

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

महाराष्ट्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून अनेक दुर्घटना झाल्या. महाड तालुक्यात तर तळीये गावातील दरडीखाली अनेक लोक बेपत्ता झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे महापुराचा तडाखा बसला. अजूनही तेथील पूरस्थिती ओसरली नाही. चिपळूण, महाड आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये आता स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

महाराष्ट्रावरील निसर्गाच्या या संकटामुळे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा व्यथित झाले. महाराष्ट्रातील गंभीर पूर परिस्थितीची वार्तापत्रे तसेच दृश्यफित पाहून त्यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना संदेश पाठविला आहे. त्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की “मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराच्या संकटापासून महाराष्ट्राला मुक्तता मिळावी म्हणून मी प्रार्थना करतो. राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी सहाय्य करेल असा मला विश्वास वाटतो”.

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा नुसतेच संदेश धाडून गप्प बसलेले नाहीत. त्यांनी दलाई लामा ट्रस्टला आदेश दिले आहेत की महाराष्ट्रातील पूर सहाय्यता निधीसाठी तात्काळ दान द्यावे. महाराष्ट्रातल्या या पूरपरिस्थिती बाबत भारतातील अनेक श्रीमंत देवालये मूग गिळून गप्प बसलेली आहेत. अशा वेळी उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश मधील धर्मशालेतून बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी दिलेला हा दिलासा निश्चितच मोलाचा वाटतो.

महाराष्ट्राशी त्यांना विशेष आत्मीयता
महाराष्ट्र ही संतांची मांदियाळी आहे त्याच बरोबर प्राचीन बौद्ध लेण्यांची भूमी आहे. याच भूमीत नोव्हेंबर २०१९ मध्ये औरंगाबाद येथे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला ते हजर राहिले होते. त्यामुळे महाराष्ट्राशी त्यांना विशेष आत्मीयता आहे. त्यांची प्रार्थना आणि महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न निश्चितच फलदायी होईल आणि महाराष्ट्र संकटमुक्त होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास मला वाटतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *