आंबेडकर Live

२ डिसेंबर १९५६ : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दलाई लामा

२ डिसेंबर १९५६ वार रविवार नानकचंद सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, ”आलास वेळेवर…आज आपल्याला खूप काम करायाचे आहे” ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व कार्ल मार्क्सचे ‘दास कॅपिटल’ या ग्रंथातील संदर्भित मजकूर परत डोळ्यांखालून घालून ‘बुद्ध अँड कार्ल मार्क्स’ या आपल्या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. लिहिलेल्या मजकुराची पाने ते नानकचंदला टाईप करायला देत होते. अकरानंतर स्नान, जेवण व थोडी विश्रांती यांत तीन तास घालवून परत लिहावयास बसले व लिहलेला मजकूर टाईप करवून घेत होते. संध्याकाळ पर्यंत हे काम चालले होते.

संध्याकाळी तिबेटचे दलाई लामा यांच्या सत्काराचे त्यांना आमंत्रण होते. दिल्ली नागरिकांतर्फे हा सत्कार समारंभ अशोकविहार महरौली येथे नानकचंद यांच्यासोबत पोहचले. या समारंभास मोठ्या प्रमाणात अस्पृश्य लोक उपस्थित होते. बाबासाहेबांनी नुकतेच म्हणजे १४ ऑक्टोबर रोजी धर्मांतर केले होते. त्यात तिबेटचे दलाई लामा यांचा सत्कार करण्याचा योग आला.

त्यावेळी दलाई लामा यांचे वय फक्त २१ वर्षांचे होते. १९५६ साली देशात भगवान बुद्धांची २५०० वी जयंती साजरी करण्याचा निर्णय भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतला होता. त्यामुळे दिल्ली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी दलाई लामा भारतात आले होते.

दलाई लामा यांनी यावेळी डॉ.बाबासाहेबांना उद्देशून बोलताना “बोधिसत्व” असे संबोधले आणि प्रबुद्ध भारत बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची बाबासाहेबांना आठवण करून दिली. भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. मात्र दलाई लामा आणि बाबासाहेबांची ही भेट अखेरची ठरली, चार दिवसांनी महामानवाचे परिनिर्वाण झाले.

– जयपाल गायकवाड

 

 

3 Replies to “२ डिसेंबर १९५६ : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि दलाई लामा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *