बातम्या

कुशीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता; जगभरातील बौद्ध यात्रेकरूंसाठी उपयोगी

दिनांक २४ जून रोजी केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर विमानतळास आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता देण्यात आली. यामुळे उत्तरप्रदेशातील ‘कुशीनगर’ जेथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले ते ठिकाण व आजूबाजूची अनेक महत्त्वाची बौद्धस्थळे यांकडे जगभरातून यात्रेकरू व पर्यटक येतील असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने कुशीनगर विमानतळाची सुधारणा करण्यात आली आहे. ‘बुद्धीष्ट सर्किट’ योजने अंतर्गत कुशीनगर हे बौद्ध स्थळांचे मध्यवर्ती ठिकाण राहणार आहे. तेथून लुंबिनी, श्रावस्ती येथे भेट देता येऊ शकेल. तसेच सारनाथ व बोधगया ही ठिकाणे दूर असली तरी जवळच्या टप्प्यात येऊ शकतील.

कुशीनगरची धावपट्टी ३.२ कि.मी. लांब बांधली असून तेथे एअरबस सारखी मोठी विमाने उतरण्यासाठी सर्व सुविधा करण्यात आलेल्या आहेत. असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे श्रीलंका, थायलंड, तैवान, व्हिएतनाम, कंबोडिया, जपान आदी देशातील असंख्य बौद्ध यात्रेकरू येथे येऊन दर्शन घेऊ शकतील. बऱ्याच वर्षापासून या विमानतळाची मागणी होत होती.

भारतातील उत्तरप्रदेश राज्यातील हे ‘बुद्धीष्ट सर्किट’ जगभरातील बौद्ध यात्रेकरूंसाठी तसेच पर्यटकांसाठी उपयोगी पडणार आहे. यामुळे उत्तर प्रदेशात पर्यटन व्यवसाय मोठ्या धडाक्यात सुरू होणार आहे. या आंतराष्ट्रीय विमानतळासाठी ५९० एकर जागा ताब्यात घेतली आहे. तसेच उत्तरप्रदेश राज्य सरकारने १९० कोटी विकास कामासाठी दिले आहेत. ( गुजरात सरकारने या पासून धडा घ्यावा व देव-नी-मोरी बुद्ध स्तुप प्रकल्पासाठी निधी तात्काळ द्यावा.) या विमानतळाचे आधुनिकीकरण एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) तर्फे पूर्ण करण्यात आले आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *