इतिहास

त्या अशोक स्तंभाच्या प्रेमापोटी गावकऱ्यांनी भारतातील सर्वात मोठे अशोकचक्र उभे केले

हरियाणा म्हणजे एकेकाळचा महायाना बौद्ध प्रदेश. इथला प्राचीन कुरुप्रदेश म्हणजे आताचा दिल्ली-कुरु-अंबाला हा भाग होय. प्राचीन बौद्ध साहित्यात कुरू प्रदेशातील टोपरा कलान, शुंगणा, चनेती अशा प्रसिद्ध बौद्ध स्थळांचा उल्लेख आलेला आहे. शेकडो विहार आणि संघाराम त्याकाळी होते. तसेच हजारो भिक्खुंचे तेथे वास्तव्य होते. हुएनत्संग यांनी सुद्धा त्यांच्या प्रवासवर्णनात शुंग आणि चनेती येथील भव्य स्तूपाचा उल्लेख केलेला आहे.

सम्राट अशोकाने शुंग आणि चनेती जवळील टोपरा कलान गावाच्या माध्यभागी असलेल्या टेकडीवर १३ मी. उंचीचा व ६५ आणि ९७ से.मी.व्यासाचा एक वालुकामय दगडाचा निमुळता स्तंभ उभारला होता. या स्तंभावर पालि भाषेतील उपदेश ‘धम्मलिपी’ मध्ये अंकित केला आहे. दीड हजार वर्षे तो ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत उभा होता. इ.स. १३५६ मध्ये मुघल बादशहा फिरोज शाह तुघलक इथे फिरत फिरत आला तेव्हा टेकडीवरील हा सुंदर स्तंभ बघून आश्चर्यचकित झाला. त्याला त्या स्तंभाची उंची, त्याची भव्यता खूपच आवडली. तसेच स्तंभाचे देखणेपण आणि गुळगुळीतपणा पाहून हा वैशिष्ट्यपूर्ण स्तंभ काढून दिल्लीला नवीन बांधलेल्या किल्ल्यावर उभारावा अशी आज्ञा केली.

दिल्ली फिरोज शाह कोटला येथे स्तंभ आणून उभारला.

बादशहाच्या आज्ञेप्रमाणे त्यावेळचे तंत्रज्ञ, कारागीर आणि सैन्य अधिकारी कामाला लागले. भूमार्गाने २०० कि.मी. दूर असलेल्या दिल्लीला स्तंभ नेणे अवघड होते. यमुनेच्या पात्रातून नौकेमधून नेता येऊ शकेल काय याची चाचपणी झाली व तोच मार्ग योग्य व सुरक्षित वाटला. त्याप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली. स्तंभाला फळ्या, बांबू, कापसाच्या लाद्या यांनी जखडून बांधले. त्यानंतर पायाजवळची माती खणून काढून स्तंभ काळजीपूर्वक ढिला करून हळूहळू आडवा करण्यात आला व ४२ चाके तयार करून ठेवलेल्या गाडीवर मजबूत दोरखंडानी बांधून ठेवण्यात आला. गाडीवर सिल्क गाद्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा सगळा गाडा दहा कि.मी. दूर असलेल्या यमुना नदीवर हजारो मजुरांद्वारे ओढत नेण्यात आला.

तेथून मोठ्या प्रयासाने नौकेवर चढवून नदीच्या मार्गाने दिल्लीतील फिरोजाबाद येथे आणण्यात आला. तिथून भूमार्गाने आताच्या फिरोज शहा कोटला स्थळाजवळ तो स्तंभ आणून परत उभारला गेला. ह्या गोष्टीस आज मितीस ६५० वर्षे झाली. पण अजूनही ही टोपरा कलान गावातील लोक आमचा ‘अशोक का लाट’ (स्तंभ) दिल्लीला नेला म्हणून खंत व्यक्त करतात. या स्तंभाची हकीकत त्यावेळच्या दिवाणी इतिहासातील नोंदीमध्ये आढळते. ( Tarikh i Ferozi Shahi- Records of Court Historians Sans-i-Sira )

ज्याअर्थी हरियाणातील टोपरा कलान गावातील टेकडीवर हा स्तंभ अशोक राजाने उभारला होता त्याअर्थी ते ठिकाण भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले असावे याची खात्री पटते. त्याबाबत बौद्ध साहित्यात कुरुक्षेत्राचा ‘कम्मंसद्धम्मा’ (कुरु) असा उल्लेख आढळून येत असून येथे महासतिपट्टान सुत्त (ध्यानधारणेचे महत्वाचे सुत्त), मागदिया सुत्त, महानिदान सुत्त, समांसा सुत्त व अरियवासा सुत्ताचा उपदेश बुद्धांनी केला अशी माहिती मिळते. हा स्तंभ चूनार खाणीतील दगडाचा असून ती खाण टोपरा कलान पासून हजारो कि.मी. दूर आहे. त्यामुळे सम्राट अशोकाने एवढ्या दूर अंतरावरून एकसंघ स्तंभ दगड इथपर्यंत कसा आणला असेल याचे आश्चर्य वाटते.

टेकडीवर स्तंभ उभारल्यावर खालच्या बाजूस वसाहत झाली. तेच आताचे टोपरा कलान गाव होय. मात्र स्तंभ दिल्लीला नेल्यावर इथली मोकळी जागा एका पुजाऱ्याने पटकावली. आता तेथे जागृत देवस्थान झाले आहे. सध्याचे तेथील वयस्कर पुजारी सांगतात की चाळीस वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हा पाया खणताना प्राचीन अवशेषांच्या विटा सापडल्या होत्या. त्यातली एक अजून जपून ठेवली आहे. मात्र इथले सध्याचे सरपंच व इतिहास प्रेमी मनिष नेहरा सांगतात की अधूनमधून ते दिल्लीला जाऊन टोपरा कलानचा अशोक स्तंभ बघून येतात. त्या स्तंभाच्या दर्शनाने काम करण्याची जिद्द आणि स्फूर्ती प्राप्त होते.

अशी ही टोपरा कलान अशोक स्तंभाची कहाणी. आज तो स्तंभ २०० कि.मी. दूर दिल्लीमध्ये असूनही गावातील लोकांना तो अभिमानास्पद वाटतो. ऊर्जेचा स्रोत वाटतो. आठ वर्षांपूर्वी हा स्तंभ परत आमच्या गावात आणून उभारा असे गावकऱ्यांनी अभियान चालविले होते. परंतु ASI ने नियमावर बोट दाखविले व प्रस्ताव रद्द केला.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अशोकचक्राची नोंद.

आज गावकऱ्यांनी अशोक स्तंभाच्या प्रेमापोटी ३५ एकर जागा महा संबोधी विहार व उद्यान बांधण्यासाठी गावाजवळ दिली आहे. व तेथे स्तंभाची मोठी प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. सध्या तेथेच ३० फुटाचे सुवर्ण रंगाचे अशोकचक्र उभे केले आहे. भारतातील सर्वात मोठे अशोकचक्र म्हणून Limca Book of Records 2020 मध्ये त्याची नोंद नुकतीच झाली.टोपरा कलानच्या या अशोक स्तंभास माझे नम्र अभिवादन.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *