बुद्धांच्या जीवनावर आधारित जगातील पहिला चित्रपट भारतात तयार झाला याचा सार्थ अभिमान सर्वांना वाटला पाहिजे. चित्रपटाचे नाव होते “बुद्धदेव”. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी १९२३ मध्ये तयार केला होता. दुर्दैवाने याची रिळे उपलब्ध नसल्याने आपण हा पाहू शकत नाही. त्यानंतर दोनच वर्षांनी ब्रिटिश कवी सर एडविन अर्नोल्ड यांच्या “द लाईट ऑफ एशिया ” या पुस्तकावर आधारित “प्रेम संन्यास ” हा बुद्धांच्या जीवनावरील दुसरा चित्रपट भारतीय भूमीत एका जर्मन चित्रपट निर्मात्याने तयार केला.
पाश्चात्य देशातील सिनेजगतामध्ये या चित्रपटाला भरपूर यश मिळाले. या चित्रपटात हिमांशु राय यांनी बुद्धांची भूमिका साकारली होती. सुदैवाने या चित्रपटाची रिळे उबलब्ध असल्याने युट्युबवर हा मूक चित्रपट आपण पाहू शकतो. या चित्रपटात बोधगया येथील एक साधू परदेशी पर्यटकांना बुद्धांबाबत माहिती सांगावयास सुरुवात करतो आणि फ्लॅशबॅक पद्धतीने हा चित्रपट तिथून सुरू होतो.
त्यानंतर जगात अनेक देशांत, अनेक भाषांमधून बुद्धांबद्दल चित्रपट प्रसिद्ध होत गेले. सिने माध्यम जसजसे सशक्त होत गेले तसतशा अनेक बुद्ध कलाकृती सिनेजगतात तयार झाल्या. जपान आणि कोरिया देश या बाबतीत आघाडीवर होते. आजवर जगात बुद्धांबद्दल अनेक चित्रपटांचा व माहितीपटांचा खजिना तयार झालेला आहे. बुद्ध पौर्णिमेच्या २५००व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने १९५७ साली एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली होती. Gotama The Buddha असे त्याचे नाव होते. हा माहितीपट कृष्णधवल होता आणि १९५७ च्या फ्रान्सच्या कान्स चित्रपट महोत्सवात नावाजला गेला होता. याच दरम्यान आलेला “मणीमेक्खलाई” हा तामीळ चित्रपट बौद्ध महाकाव्यावर आधारीत होता.
१९६० साली आलेला अंगुलीमाल हा हिंदी चित्रपट बुद्धांवर आधारित नसला तरी त्यात बुद्ध तत्त्वज्ञानाचा उहापोह केलेला होता. तसेच अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांमधून प्राचीन बौद्ध स्थळांचे दर्शन अधूनमधून आपणास घडलेले आहे. “आस का पंच्छी” या १९६१ मधील चित्रपटात राजेंद्रकुमार व वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित केलेले एक गाणे आहे. गाण्याचे बोल आहेत “तूम रुठी रहो, मै मनाता रहू” या गाण्यात आपल्याला अंधेरीची कोंडीवटे लेणी दिसतात हे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. साठ वर्षांपूर्वी तेथील लेण्यांचे आणि डोंगर दरीतील निसर्गाचे चित्रण केलेले पाहून आपण चकित होतो.
गाण्यामध्ये तेथील लेणीच्या मुख्य चैत्यातील गवाक्षे स्पष्ट दिसतात. लेणी समोरील निसर्ग पाहून त्याकाळी तो परिसर किती सुंदर असेल याची कल्पना येते. “जॉनी मेरा नाम ” या देवानंदच्या चित्रपटातील एका गाण्यात नालंदा विद्यापीठाचे अवशेष दिसतात. आठ वर्षापुर्वी आलेल्या “मिस मॅच” या मराठी चित्रपटातील एका गाण्यात सांचीच्या स्तूपाचे पूर्ण चित्रण केलेले आढळले होते. चित्रपटातील गाण्यासाठी बौद्ध स्थळांचे चित्रण करण्यास काहीच हरकत नसावी. परंतु त्यातील नाचगाण्याचे तारतम्य देखील बाळगणे आवश्यक आहे.
संजय सावंत (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक , नवी मुंबई)