इतिहास

देवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला

देवदत्त हा बुद्धाचा आरंभापासूनच बुद्धाचा द्वेष करीत असे त्याला बुद्धाविषयी तीव्र घृणा वाटत होती. बुद्धाने गृहत्याग केला तेव्हा देवदत्ताने यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. एकदा यशोधरा निद्राधीन होण्याच्या तयारीत असताना तो भिक्खू वेशात तिच्या शयनगृहात प्रवेश करता झाला. तेव्हा त्याला कोणीही अटकाव केला नाही. तिने त्याला विचारणा केली. “भिक्खू , तुला काय हवे आहे? तू माझ्या पतीचा काही संदेश आणला आहेस काय?”

“तुझा पती, त्याला तुझी काय पर्वा! या सुख निवासात तुला तो निर्दयपणे आणि निष्ठुरपणे त्यागून निघून गेला.” देवदत्त म्हणाला. “परंतु त्याने हे बहुजनांच्या कल्याणा-साठीच केले.” यशोधरा उत्तरली. “ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घ्यावास” देवदत्त सुचविता झाला.

“हे श्रमण, तू आपली जिव्हा आवरावी. तुझी वाणी आणि विचार अपवित्र आहेत.” यशोधरा उत्तरली. “यशोधरे, तू मला ओळखले नाहीस? मी देवदत्त तुझा प्रियकर देवदत्त, तू दुष्ट आणि कपटी आहेस हे मला ज्ञात होते. तू कधी श्रमण झालासच तर पतित श्रमणच होशील याची मला जाणीव होती. परंतु इतका अधम वृत्तीचा असशील याची मला कल्पना नव्हती.

“यशोधरे, यशोधरे, मी तुझ्यावर प्रेम करतो. “देवत्ताने विनवनी केली. तुझ्या पतीने तुला तिरस्काराशिवाय काहीही दिलेले नाही. तो तुझ्याशी क्रूरपणेच वागला. मला प्रेम कर आणि त्याच्या क्रूरपणाचा सूड उगव.” यशोधरेचा फिकट आणि कृश चेहरा रक्तिम झाला. तिच्या कपोलावरून अश्रू ओघळू लागले. “देवदत्त तू क्रूर आहेस. जरी तुझे माझ्यावर प्रामाणिक प्रेम असते तरी तो माझा अपमानच ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगताना तू मिथ्या कथनच करतो आहेस.”

“जेव्हा मी यौवनात होते, सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे नजर उचलूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्क झाले आहे. दुःख आणि वेदनांनी माझे हृदय विदीर्ण झाले आहे. आणि या रात्रीच्या अनुचित प्रहरी तू आपल्या घातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. देवदत्त, तू नीच आहेस. देवदत्त, तू भेकड आहेस.” आणि ती ओरडली, “देवदत्त, त्वरित येथून चालता हो.” आणि देवदत्त तेथून चालता झाला.

बुद्धाने त्याला संघ प्रमुख केले नाही आणि सारीपुत्र आणि मौद्गल्यायन यांना संघप्रमुख पद बहाल केले. याबद्दल देवदत्तचा बुद्धावर रोष होता. देवदत्ताने तीनदा बुद्धाचा वध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला एकदाही यश आले नाही. एकदा बुद्ध गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी छायेत सहज शतपावली करण्याच्या हेतूने फिरत होते. देवदत्त त्या पर्वतावर चढला आणि बुद्धाचा प्राण घेण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड लोटून दिला. तो दगड दुसऱ्या मोठ्या खडकावर आदळला आणि तेथेच रुतून राहिला. त्या दगडाचा एक लहानसा तुकडा मात्र बुद्धाच्या पायाला लागला आणि त्यांच्या पायातून थोडे रक्त आले.

दुसऱ्यांदा त्याने बुद्धाचे प्राण हरण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवदत्त राजपुत्र अजातशत्रूकडे गेला आणि कथन करता झाला की, “मला काही माणसे द्यावी.” आणि त्या राजपुत्राने, अजातशत्रूने आपल्या माणसांना आज्ञा केली.” देवदत्त तुम्हाला जी आज्ञा देईल तसे करावे.” देवदत्ताने त्यापैकी एकास आज्ञा केली, “मित्रा तू जावे, श्रमण गौतम अमुक स्थानी वास्तव्याला आहे. तेथे जाऊन त्याचा वध करावा.” तो माणूस परत आला आणि देवदत्तास म्हणाला, “मी तथागतांचे प्राण हरण्यास असमर्थ आहे.”

त्याने बुद्धाचे प्राण हरण्याचा तिसरा प्रयत्न केला. त्यासमयी राजगृही नलगिरी नावाचा क्रूर नरमेधक हत्ती होता. आणि देवदत्त राजगृही गेला, तो हत्तीखान्यात गेला आणि हत्तीखान्याच्या रक्षकाला म्हणाला, “मी राजाचा मित्र आणि आप्त आहे. कनिष्ठपदी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी श्रेष्ठपदी चढवू शकतो. त्याचप्रमाणे त्याच्या शिध्यात किंवा वेतनात वृद्धीचे आदेश मी देऊ शकतो.” “तेव्हा हे मित्रा, श्रमण गौतम जेव्हा या पथावरून मार्गक्रमणा करील, तेव्हा नलगिरीला याच पथावर मोकळे सोडून द्यावे.”

देवदत्ताने बुद्धाचा वध करण्यासाठी धनुर्धारी नियुक्त केले. त्याने बद्धाच्या मार्गावर त्या पिसाळलेल्या हत्तीला मोकळे सोडले. परंतु तो सफल होऊ शकला नाही. जेव्हा त्याच्या या प्रयासाची माहिती सर्वाना झाली तेव्हा त्याचे वर्षासन समाप्त करण्यात आले राजा अजातशत्रू गटाने त्याला भेट देणे बंद केले. आजीविकेसाठी त्याला दारोदारी जाऊन भिक्षा मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून खूप अनुग्रह प्राप्त होत होता. पण हा संबंध फार काळ टिकला नाही. नलगिरीच्या कांडानंतर त्याचा सर्व प्रभाव समाप्त जाहला.

त्याच्या या पापकरणीने देवदत्त मगधात फारच अलोकप्रिय झाला. त्याने मगध सोडून कोशल देशी प्रयाण केले. त्याचा विचार होता की, कोशल नरेश प्रसेनजीत आपले स्वागत करेल. परंतु राजा प्रसेनजिताने त्याला घृणापूर्ण दृष्टीने पाहिले आणि त्याला घालवून दिले.

संदर्भ : बुद्ध आणि त्याचा धम्म – लेखक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

One Reply to “देवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला

Comments are closed.