इतिहास

धम्म आणि स्त्रीमुक्ती ; स्त्रियांना स्वयंदिप होण्याचे स्वातंत्र्य बुद्धानेच सर्वप्रथम दिले

भारताच्या इतिहासात स्त्रियांच्या सामाजिक, धार्मिक आणि बौध्दिक स्वातंत्र्याची सुरुवात सर्वप्रथम बुध्दाने केल्याचे दिसुन येते कारण धम्मात मानव कल्याण हाच केंद्रबिंदू मानून स्त्रिसुध्दा मानव आहे. हे मानून स्त्रियांना स्वयंदिप होण्याचे स्वातंत्र्य बुद्धानेच सर्वप्रथम दिले. बुध्दाने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले याशिवाय स्त्रिया देखील ज्ञान आणि शिक्षण घेऊन श्रेष्ठ जीवन प्राप्त करुन स्वतःचा उध्दार करु शकतात ह्याच एका तत्वावर बुद्धाने स्त्रियांना भिक्षुसंघातमध्ये सम्मीलीत करुन त्या भिक्षुनिंचा एक संघ तयार केला. बुद्धाचा स्त्रियांबाबतचा उदार व समतावादी द्रुष्टीकोन होता हे पाहावयास मिळते पण बुद्धाने स्त्रियांना संघात प्रवेश देण्यास सुरवातीला परवानगी दिली नव्हती.

वास्तविक पाहता स्त्रियांना परिव्राजिक म्हणून प्रवेश देताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.पण कालांतराने त्यांनी स्त्रियांना संघात प्रवेश दिला. याचे श्रेय जाते महाप्रजापती गौतमीला. महाप्रजापती हि गौतम बुध्दांची (आई महामायेची लहाण बहिण) मावशी तसेच सावत्र आई महामायेच्या मृत्युनंतर महाप्रजापती गौतमी बुद्धांचा सांभाळ केला. शुध्दोधन च्या मृत्यूनंतर निराश झाली, याचवेळी शाक्य व कोलिय गणराज्यात युध्द सुरु होते तेव्हा शाक्यांच्या ५०० विधवा महाप्रजापती गौतमीकडे आल्या यावेळी ५०० स्त्रियांसह मुंडण करुन भगवी वस्त्रे परीधान करुन महाप्रजापती गौतमीने कपिलवस्तु पासुन वैशाली नगरापर्यंत संघठीत स्त्रियांचा भारतातील व जगाच्या ज्ञात इतिहासातील पहिला यशस्वी मोर्चा काढला आणि गौतम बुध्दांकडे परीव्रजा व बौध्द संघात प्रवेश मागितला यावेळी बुध्दाने प्रथम नकार दिला.

पण आनंदने यशस्वी मध्यस्थी केल्याने महाप्रजापती गौतमी सह सर्वाचा बुद्ध संघात प्रवेश झाला एवढेच नव्हे तर गौतम बुध्दांनी महाप्रजापती गौतमी या अध्यक्षतेखाली भिक्षुणी संघाची स्थापना करण्याचे महाण कार्य केले. यामुळे स्त्रियांच्या बौध्दिक, सामाजिक, धार्मिक, व निर्वाण प्राप्तीच्या स्वातंत्र्याला महाप्रजापती गौतमी पासुन सुरुवात झाली. बुद्धाने स्त्रियांना बुध्द संघामध्ये प्रवेश दिल्यामुळे अनेक स्त्रिया उपासिका, शिक्षिका, धर्मोपदेशक बनल्या हे त्यांनी रचलेल्या थेरी गाथेवरुन दिसुन येते.

त्या स्त्रियांच्या बौध्दिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्यामुळे थेरी गाथेची निर्मिती म्हणजे जगातील पहिल्या स्त्रीवादी कवयित्रींचा तो संघटीत स्वातंत्र्याचा आद्य अविष्कार होय. बुद्धाने स्त्रियांना सर्वप्रथम निर्वाणाची संधी उपलब्ध करून दिली आणि स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील पहिले क्रांतीकरी पाऊल उचलले यामुळे समाजाला मुली जन्माचे स्वागत करण्याची प्रेरणा मिळाली.

-निलेश मोरे