बातम्या

भदंत सदानंद महाथेरो यांनी केलेले धम्माचे कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील – डॉ.हर्षदीप कांबळे

भारतात धम्माला वाढवण्यात भदंत सदानंद महाथेरो यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जीवनाचे ध्येयच भारतात बुद्ध धम्म वाढवण्याचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरात बौद्ध धम्माला दिशा देण्याचे कार्य भन्तेजींनी केले आहे. तसेच लहानपानापासून मला त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत होते. त्यांनी केलेले कुशल कम्म आणि धम्माचे कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील असे म्हणत भावुक होत ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ.हर्षदीप कांबळे यांनी भदंत सदानंद महाथेरो यांना आदरांजली वाहिली.

आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचे मंगळवारी (ता.४) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केळझर मधील धम्मराजिक महाविहार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ.हर्षदीप कांबळे यांनी भदंत सदानंद महाथेरो यांच्या सोबतच्या आठवणी सांगत असताना भावुक झाले होते.

डॉ. कांबळे यावेळी म्हणाले की, भदंत सदानंद महाथेरो यांचे काल दुःखद निधन झाले. अचानक झालेल्या दुःखद घटनेने मला खूप दुःख होत आहे. तीन दिवसांपूर्वीच मी त्यांना नागपूर येथील संघाराम विहारात भेटण्यासाठी आलो होतो. त्यावेळी त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मी त्यांच्याकडे डॉक्टरला पाठवले होते. तसेच कोरोना टेस्ट केली असता निगेटिव्ह रिपोर्ट आला होता. मंगळवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते आपल्यातून गेले आहेत.

भिक्षाटनसाठी भिक्खू संघासोबत जात असताना पूज्य सदानंदजी महास्थवीर

मी खूप वर्षांपासून म्हणजेच लहान असल्यापासून त्यांचे माझ्या कुटुंबास आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळत होते. आमच्या भंडारा जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे, त्या गावापासून जवळच भंतेजीचे गाव होते. भंतेजी कधीही आमच्या गावात आले तर आमच्या घरी येत असत. माझे शिक्षण सातारा येथील सैनिक स्कुल मध्ये झाले आहे. त्याच्या परीक्षेसाठी नागपूरला जात असताना रस्त्यात भंतेजी सोबत भेट झाली होती तेंव्हा ते माझ्यासोबत परीक्षेच्या सेंटरवर आले होते. आणि मला खूप शिकून मोठा हो असा आशीर्वाद दिला होता. हे माझ्या स्मरणात आहे. त्यांच्यामध्ये मी पणा मुळीच नव्हता धम्माप्रमाणे फार साधे जीवन ते जगत होते. त्यांच्यामुळेच आमच्या कुटुंबाला धम्माचे शिक्षण मिळाले तेच धम्माचे शिक्षण माझ्या आई वडिलांनी आमच्या सर्व भावंडांवर केल्यामुळे आम्ही आज धम्माच्या मार्गावर चालत आहोत.

भदन्त सदानंद महाथेरो यांच्या सोबत महाराष्ट्र आणि देशभरात अनेक धम्माचे कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते. त्यांच्याकडून नेहमीच मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत होती. नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी झालेल्या दीक्षा सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत भदन्त सदानंद महाथेरो यांनी सुद्धा धम्म दीक्षा घेतली होती. त्यानंतर जुन्या आठवणी सांगताना धम्म महाराष्ट्रात आणि भारतात वाढत गेला याविषयी सांगत असत. तसेच त्यावेळी कश्या अडचणी आल्या किती संकटांचा सामना करावा लागला, सुरुवातीला लोकांना विहाराबद्दल काही माहिती नव्हती त्यामुळे लोकांना धम्म समजून सांगून लहान लहान बुद्ध विहारांची उभारणी कशी केली अश्या अनेक गोष्टी ते सांगत असत. याबद्दल बोलत असताना त्यांना मी म्हटले की भंतेजी हे सर्व प्रसंग आणि अनुभव आपण शब्दबद्ध करून पुस्तक स्वरूपात सर्वांसमोर आणावेत. यावर भन्तेजींनी काम सुरु केले होते.

पूज्य भदंत सदानंद महाथेरो यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना डॉ.हर्षदीप कांबळे

केळझर येथे त्यांचा मुख्य विहार होते. तेथे ते राहत होते, त्यांनंतर मी त्यांना आपले वय झाले आहे तसेच हृदयविकारचा सुद्धा आजार असल्याने आपण नागपूर येथील संघाराम विहारात राहण्याची खूप विनंती केली होती. तसेच काही भन्तेजींनी त्यांना खूप विनंती केली. त्यानंतर त्यांचे वास्तव्य संघाराम विहारात झाले होते.

संघाराम विहारात भदन्त सदानंद महाथेरो यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्हिजिटर्ससाठी एका रूमचे बांधकाम सुरु होते. माझी पत्नी धम्माचे कार्य करत असते त्यांनीच ह्या रूमच्या बांधकामासाठी डोनेशन दिले आहे. दोन महिन्यात हे पूर्ण होणार होते. रविवारीच मी त्यांना भेटले तेंव्हा म्हणले होते की हे दोन महिन्यात पूर्ण होईल आणि आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी उदघाटन करू…तो पर्यंत आपण स्वतःचे आत्मचरित्राचे पुस्तक पूर्ण करावे. त्यावेळी भंतेजी म्हणाले माझे पुस्तक लिहिणे पूर्ण झाले आहे आणि त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांना म्हणालो नक्कीच भंतेजी हे माझ्यासाठी कुशल कम्म असून आपण हे लवकरच प्रकाशित करणार असल्याचे सांगितले होते.

GBC औरंगाबाद येथे महानायका थेरो, श्रीलंका. यांच्या सोबत भदंत सदानंदजी महाथेरो, भदंत बोधिपालो महाथेरो, डॉ हर्षदीप कांबळे, डॉ गायकवाड व अन्य उपासक

भंतेजी यांच्याकडे धम्माचे ज्ञान आणि अभ्यास खूप होता. त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोकांची गर्दी असायची. ज्या प्रकारे ते आपल्या धम्माच्या नियमानुसार पालन करत जगत होते ते इतर भिक्खूंसाठी प्रेरणादायी होते. त्यानंतर त्यांचे मार्गदर्शन घेऊन औरंगाबाद येथे भव्य असे लोकुत्तरा भिक्खू ट्रेनींग सेंटर उभारले जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी भदन्त सदानंद महाथेरो यांचे मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळाला. यासाठी माझ्या पत्नी रोजाना व्हॅनिच ह्यांनी मोठ्या प्रमाणात धम्मदान दिले होते. तसेच लोकांच्या मिळालेल्या मदतीतून ८० ते १०० भिक्खू राहू शकतील असे भिक्खू ट्रेनींग सेंटर बनवले आहे.

भदंत सदानंदजी महास्थवीर, भिक्खू संघासोबत डॉ.हर्षदीप कांबळे आणि रोजाना व्हॅनिच कांबळे ह्यांना धम्म कार्याबद्दल आशीर्वाद देताना.

पूज्य भंतेजीच्या अध्यक्षतेखाली व बोधिपालो भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली लोकुत्तरा भिक्खू ट्रेनींग सेंटरच्या भूमिपूजन, लोकार्पणला सुद्धा उपस्थित होते. या ठिकाणी २०१८ साली पहिला वर्षावास झाला होता त्यावेळी भदन्त सदानंद महाथेरो तीन महिने थांबले होते. यावेळी ६५ तरुण भिक्खू ट्रेनींग साठी आले होते त्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले होते. ह्या वेळेस त्यांचा आम्हा पती पत्नीस खूप सहवास लाभला.. तसेच त्यावेळी त्यांनी आपले अनुभव लिहण्यास सुरुवात केले होते. त्यांना भारतासह जगभरात मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्र आणि देशभरात बौद्ध धम्माला दिशा देण्याचे कार्य भंतेजींनी केले आहे. त्यांनी केलेले कुशल कम्म आणि धम्माचे कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील आणि त्यावर आपण काम करणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *