बुद्ध तत्वज्ञान

जातक कथा : जेथे संपत्ती तेथे भय

अकिंचनाला भय कोठून.

एकदा बोधिसत्त्व वयांत आल्यावर प्रापंचिक सुखें त्याज्य वाटून त्याने हिमालयावर तपश्चर्या आरंभिली. पुष्कळ काळपर्यंत फलमूलांवर निर्वाह केल्यावर खारट आणि आंबट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तीत जावे या उद्देशाने तो तेथून निघाला. वाटेत त्याला कारवानांचा तांडा सांपडला. त्यांच्या बरोबरच तो मार्गक्रमण करू लागला. रात्री एका ठिकाणी मुक्कामाला उतरले असता त्या व्यापा-यांना लुटण्यासाठी पुष्कळ चोर जमा होऊन व्यापारी निजल्यावर लुटावे अशा उद्देशाने आसपास दबा धरून राहिले. बोधिसत्त्व एका झाडाखालीं इकडून तिकडे फिरत होता. सगळे व्यापारी झोपी गेल्यावर चोर हळू हळू जवळ येऊ लागले. त्यांची चाहूल ऐकून बोधिसत्त्व तसाच फे-या घालीत राहिला. चोर तिकडे वाट पहात बसले होते. हा तपस्वी निजणार व या तांडयाला आम्ही लुटणार, अशा बेताने चोरांनीं ती सारी रात्र घालविली परंतु आमचा बोधिसत्त्व झोंपीं न जातो सारी रात्र फे-या घालीत जागृत राहिला. पहांटेला चोर आपली हत्यारे तेथेच टाकून पळत सुटले, व जातां जातां मोठ्याने ओरडून म्हणाले, “निष्काळजी व्यापा-यांनों, हा तपस्वी तुमच्या बरोबर नसता तर आजच तुमचे धडे भरले असते !”

व्यापारी चोरांच्या आरोळ्यांनी जागे होऊन पहातात तों त्यांना चोरांनीं टांकून दिलेली शस्त्रास्त्रे आढळून आली. ते बोधिसत्त्वाला म्हणाले, “सारी रात्र चोर तुमच्या आसपास दबा धरून बसले असता, व ते तुमच्यावर हल्ला करतील असा संभव असतां तुम्ही भिऊन आरडाओरड केली नाही हे कसें !” बोधिसत्त्व म्हणाला, “गृहस्थहो, जेथे संपत्ती आहे तेथे भय आहे. माझ्यासारख्याला भय मुळीच नाही, गावात किंवा अरण्यांत कोणत्याही प्राण्याची मला भीती वाटत नाही. का की, मैत्री आणि करुणा यांची मी सतत भावना करीत असतो.”

असंकीत जातक नं.७६ – धर्मानंद कोसंबी

3 Replies to “जातक कथा : जेथे संपत्ती तेथे भय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *