ब्लॉग

अशोकाने आपल्या अभिलेखात ‘या’ लिपीला ‘धम्मलिपी’ म्हणून संबोधले असल्याचा लेखी पुरावा

नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने इ. बारावीच्या ‘पाली पकासो’ या पाली भाषेच्या पाठ्यपुस्तकात ‘धम्मलिपी’चा स्वर व व्यंजन यांचा अभ्यासक्रम समाविष्ट केला. त्यामुळे या लिपीला ‘ब्राह्मी लिपी’ म्हणणाऱ्या काही ‘सदाशिव पेठी’ संशोधकांचा अगदी तिळपापडच झाला, आणि, जाणवी आवळून व शेंडीला गाठी मारुन ते ‘केयं धम्मलिपी’ म्हणून वृथा शंखनाद करु लागले.

अशोकाची लिपी ही ‘धम्मलिपी’ नसून, ती साक्षात ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ‘ब्राह्मी लिपी’च आहे, ही गेल्या दिडशे वर्षांपासून मारत असलेली ‘शुद्ध लोणकढी’ थाप नेहमीप्रमाणेच मारु लागले. ‘धम्मलिपी’ की ‘ब्राह्मी लिपी’ ,या वादात ‘ब्राह्मी लिपी’चेच तुणतुणे त्यांनी सतत वाजत ठेवले, तरी ‘ब्राह्मी लिपी’ चे अस्तित्व अशोकाच्या अगोदरपासूनच असल्याचा एकही लेखी पुरावा मात्र त्यांना देता आला नाही. त्यावर नेहमीचे आपले ‘ ग्रंथ प्रामाण्य ‘ हे अस्त्र भात्यातून बाहेर आले.

‘समवायांग सूत्र’ हा जैन ग्रंथ व ‘ललितविस्तर’ हा बौद्ध ग्रंथ ‘ग्रंथप्रामाण्य’ म्हणून पुढे केला गेला. परंतु, हे दोन्हीही ग्रंथ इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात लिहिले गेले असल्याने, हा पुरावा अशोकापूर्वीचा ठरुच शकत नसल्याने, तो ही प्रयत्न केवीलवाणा ठरला. तरीही तेच तुणतुणे – ‘ब्राह्मी लिपी’च…. बरे, ठिक आहे. चला, ‘ ब्राह्मी लिपी’ तर ‘ ब्राह्मी लिपी’. तसेही म्हणा हवे तर….फक्त, सम्राट अशोकाने आपल्या लिखाणासाठी वापरलेली ही लिपी म्हणजेच तुमची ती तथाकथित ‘ब्राह्मी लिपी’ आहे, हे सिद्ध करण्यासाठी निदान एकतरी पुरावा द्या…तर ते ही नाही.

अहो, अशोकाने आपल्या अभिलेखात या लिपीला ‘धम्मलिपी’ म्हणून संबोधले असल्याचा लेखी पुरावा एकदोन ठिकाणी नव्हे, तर तब्बल ३६ अभिलेखात, ४० ठिकाणी आढळतो. तुमच्या ‘ ब्राह्मी लिपी’ ला ‘ब्राह्मी लिपी’ म्हणून संबोधलेला, अशोकापूर्वीचा किंवा अशोककालीन निदान एकतरी लेखी पुरावा द्या, तर तो ही नाही. ज्याने अशोकाचे शिलालेख अनेक शतकांच्या कालावधीनंतर सर्वप्रथम यथायोग्य वाचले, त्या जेम्स प्रिन्सेपनेही तिला ब्राह्मी लिपी म्हटले नाही, तर तुम्ही तिला ‘ब्राह्मी लिपी’ म्हणून गळे काढणारे कोण, आणि कशाच्या आधारे…? आणि कोणती तुमची ‘ब्राह्मी लिपी…? आणि, समजा ती जर असेलच, तर तिचा शोध तुम्ही ‘ब्रह्मा’ च्याच अनुषंगाने घ्यावा, अशोकाच्या ‘धम्मलिपी’शी उगाच आपला ओढून ताणून तो संबंध कदापिही जोडू नका. अशोकाची लिपी हीच ‘धम्मलिपी’. तुमची ती तथाकथित ‘ब्राह्मी लिपी’ कोणती…? “केयं ब्राह्मी लिपी….?”

अशोक नगरे , पारनेर (लेखक – मोडी लिपी तज्ज्ञ आणि बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *