ब्लॉग

खरा धम्मनायक वामनराव गोडबोले

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत अनुयायी वामनराव गोडबोले धम्मदीक्षा समारंभाचे सचिव होते. वामनराव धम्मदीक्षेचे साक्षीदारच नव्हे तर बौद्धधम्माची, बाबासाहेबांच्या विचारांची सर्वत्र बाग फुलविणारे कुशल कारागीर होते. आज, १ जानेवारीपासून श्रद्धेय वामनराव गोडबोले यांच्या जन्मशताब्दी पर्वाला सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने…

बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी सर्वस्व अर्पण करणारे, धम्मक्रांतीनंतर त्यांचे स्वप्न मूर्तरूपात साकार करण्यासाठी चंदनाप्रमाणे आयुष्य झिजविणाऱ्या श्रद्धेय वामनराव गोडबोले यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी वडील मोतीराम व आई कस्तुरीबाई यांच्या पोटी झाला. पारशिवनी तालुक्यातील डुमरी हे त्यांचे मूळ गाव होते. कालांतराने गोडबोले परिवार नागपुरातील सीताबर्डी परिसरात आनंद टॉकीजसमोर असलेल्या आनंदनगर येथे स्थायिक झाला.

पाच मुले व तीन मुली असा मोठा परिवार होता. त्यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव गोरले होते. पुढे ते गोडबोले करण्यात आले. वामनरावांचे शिक्षण ‘बुटी प्रायमरी स्कूल मध्ये झाले. वडील मोतीराम स्वाभिमानी होते. हाच स्वाभिमान वामनरावांनी आयुष्यभर जोपासला. जन्मदात्याचे सुभाषित ते नेहमी उच्चारायचे, ‘तंग के खाना, पर मांग के मत खाना’ म्हणूनच शेवटच्या क्षणाला त्यांच्या जेवणाची सोय होत नव्हती अशा वेळी ते भजी खायचे. लहानपणापासून त्यांना वाचनाची गोडी होती. लेनिन, हिटलर, मार्क्स यांचे साहित्य त्यांनी वाचले होते. त्यामुळे ते बाबासाहेबांच्या अधिक जवळ गेले. रेल्वेमधील कंडक्टर पदाची नोकरी सोडून धम्मकार्याला त्यांनी वाहून घेतले, असे जुने जाणकार सांगतात.

वामनरावांनी आयुष्यभर ‘हिटलर बौद्ध होते का?’ या पुस्तकाचा शोध घेतला. त्यांनी हिटलरचे जीवनदर्शन वाचले आहे असे बाबासाहेबांना कळले होते. बाबासाहेबांनी दिल्ली निवासस्थानी ‘हिटलर बौद्ध होते का?’ असा प्रश्न गोडबोले यांना केला. ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी वारंवार बाबासाहेबांना हिटलर यांच्याविषयी विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाबासाहेबांनी एकच वाक्य उच्चारले हिटलरचे पुस्तक मिळाल्यास जरूर वाचणे. १९५६ पासून वामनरावांनी या पुस्तकाचा देशभर शोध घेतला जागतिक पातळीवरील बौद्ध भिक्खूंकडे विचारणा केली. परंतु आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना हे पुस्तक सापडले नाही.

बाबासाहेबांना डोळे भरून पाहण्याचा योग वामनरावांना १९३० साली दलित काँग्रेस मेळाव्याच्या निमित्ताने व्यंकटेश थिएटर नागपूरमध्ये आला. त्यावेळी बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाच्या कार्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून यायच्या. त्या वाचून नागपुरात पहिल्यांदा समता सैनिक दल स्थापन करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. १८ जुलै १९४२ रोजी बाबासाहेबांशी त्यांची पहिली भेट नागपुरात झाली. ही भेट फारच रोमहर्षक आहे. बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी गोडबोले यांच्या दलाच्या शाखेने निर्णय घेतला होता. परंतु म्होरक्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांची कार दुसऱ्या रस्त्याने काढण्याचा प्रयत्न केला. याची चाहूल लागताच वामनरावांनी दलाच्या काही सैनिकांना बाबासाहेबांच्या कारखाली झोपण्याचे निर्देश दिले. सुरुवात स्वतःपासून केली. कारच्या समोरच्या चाकासमोर ते झोपले. बाबासाहेबांची कार अडवणारा कोण? म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यावेळी बाबासाहेब कारमधून उतरले. वामनरावांचे म्हणणे ऐकले. मानवंदना स्वीकारली. ती कवायत पाहून बाबासाहेब अतिशय चकित झाले होते. कार अडव्या गोडबोले म्हणून बाबासाहेब त्यांना ओळखू लागले.

१९४३ साली वामनरावांनी ‘भीमराव रामजी आंबेडकर क्रीडा क्लब’ची स्थापना केली. ३ जानेवारी १९५५ ला ‘ सिद्धार्थ बुद्धदूत सोसायटी ची स्थापना केली. पुढे ‘बुद्धदूत सोसायटी’चे भारतीय बुद्धजन समितीमध्ये रूपांतरण केले. १९५५ साली नागपूर शहरात पहिली बुद्ध जयंती साजरी केली. २४ मे १९५६ रोजी बुद्धाच्या प्रतिमेची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढली. ‘आषाढ पौर्णिमा’ हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षेकरिता नागपूर शहराचे नाव पत्राद्वारे सुचविले. बाबासाहेबांनी वामनरावांना २३ जुलै १९५६ रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले की, ‘दीक्षा समारंभ नागपूरलाच होईल.’

१३ सप्टेंबर १ ९ ५६ रोजी वामनरावांनी शिष्टमंडळासह बाबासाहेबांची २६ अलीपूर रोड नवी दिल्ली येथे भेट घेऊन ऐतिहासिक धम्मदीक्षेकरिता माता कचेरी जवळील जागा भारतीय बौद्धजन समितीमार्फत निश्चित केली. दीक्षाभूमीची जागा स्मारक समितीला हस्तांतरित होण्याआधी जगभरातील बौद्ध विचारवंत नागपुरात आले की गोडबोले यांच्याकडे थांबायचे. ‘कोठारी भवन’ येथे असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात त्यांच्या जेवणाची, निवासाची सोय खुद्द वाम करायचे. त्यावेळी भवानीशंकर नियोगी, अनंत रामचंद्र कुळकर्णी तसेच श्रीलंकेचे जयसूर्या नागपुरात थांबले होते. तसेच भन्ते आर्य नागार्जुन सुरेई ससाई जपानहून नागपुरात सर्वप्रथम १९६७ साली आले. त्यावेळी त्यांना ओळखीचे असे कोणीच नव्हते. धम्मदीक्षा समारंभाचे सरचिटणीस म्हणून गोडबोले यांच्याकडे ते गेले. त्यावेळी गोडबोले यांनी दोन वर्षे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात भन्तेजींची राहण्याची सोय केली होती.

वामनरावांची बाबासाहेबांप्रती अतीव श्रद्धा पाहून १४ ऑक्टोबर १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा समारंभाचे सचिव म्हणून त्यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही ते स्वस्थ बसले नाही. बाबांच्या पवित्र अस्थी त्यांनी चैत्यभूमीवरून नागपूरला आणल्या. रिपब्लिकन ऐक्याइतकाच गंभीर बनलेल्या धार्मिक एकतेच्या मुद्यावरही वामनराव जीवनभर कार्यरत राहिले. बौद्ध महासभेच्या शाखा अनेक रिपब्लिकन पक्षांनी काढल्या. रिपाइंच्या राजकारणातील तुकड्यांमध्ये बौद्ध धम्म दुभंगू नये ही त्यांची प्रामाणिक इच्छा होती. धम्मकारण व राजकारण हे वर्गीकरण व्हावे या मताचे ते होते. भारतातील बौद्धांना एकत्र आणण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अधिवेशन १९६० साली सीताबर्डी येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानात त्यांनी घेतले होते. नागपूरच्या अंबाझरी गार्डनमध्ये ६ डिसेंबर १९७५ रोजी चार दिवसीय अ.भा. शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला देशभरातील अनेक नेते, विचारवंत, आदरणीय भिक्खूसंघ आवर्जून उपस्थित होते. बिहारचे तत्कालीन राज्यपाल आर.डी. भंडारे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले होते. तिबेटचे स्नेहकुमार चकमा पाहुणे म्हणून आले होते. याच परिषदेत तथागत बुद्धांचा पवित्र अस्थिकलश जनतेच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच ठेवण्यात आला होता.

धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांनी नागपूरपासून साधारण १२ कि.मी. अंतरावर चिचोली गावात बाबासाहेबांच्या संकल्पनेतील ‘धम्म प्रचारक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची योजना आखली. या पवित्र कार्यासाठी बहुजन समाजातील थोर माऊली गोपिकाबाई ठाकरे यांनी आपली साडे अकरा एकर जागा या प्रकल्पासाठी २२ एप्रिल १९५७ रोजी श्रद्धापूर्वक दान दिली. या निसर्गरम्य परिसरात गोडबोले यांनी रमणीय, मनोहारी ‘शांतीवन’ उभारले. बाबासाहेबांचे खाजगी सचिव नानकचंद रत्तू यांच्या मदतीने बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय उभारले. वामनराव बाबासाहेबांची जणू सावलीच होते. अनेक निष्ठावंत अनुयायांपैकी एक अनमोल रत्न होते याची प्रचिती शांतीवनाला भेट दिल्यानंतर पदोपदी जाणवते. शांतीवनाचे निर्माण कार्य सुरू असताना मला पितृतुल्य वामनरावांना पाहण्याचे, त्यांच्याशी मोकळेपणाने गप्पा मारण्याचे सद्भाग्य लाभले त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो.

धम्मक्रांतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच वामनरावांनी ३ मे २००६ रोजी देह ठेवला. समाजबांधवांना धम्माची उबदार छाया देणारा विशाल वृक्ष त्या दिवशी उन्मलून पडला. त्यांचे जाणे चटका देणारे ठरले. वामनराव धम्मदीक्षेचे साक्षीदारच नव्हे तर बाबासाहेबांच्या विचारांचा अव्याहत प्रसार प्रचार करणारे चालते – बोलते ज्ञानपीठ होते. जन्मशताब्दीनिमित्त धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन मानाचा मुजरा.

मिलिंद मानकर, नागपूर