आंबेडकर Live

निजामाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीला खरंच मदत केली होती का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची निजामाच्या बाबतीत भूमिका अगदी स्वच्छ होती. त्यांनी म्हटले होते, पाकिस्तान अथवा हैदराबादेतील अनुसूचित जातींनी मुसलमान वा मुस्लिम लीगवर विश्वास ठेवणे आत्मघातकीपणाचे ठरेल. निजाम हा भारताचा एक नंबरचा शत्रू असल्याने अनुसूचित जातीच्या एकाही व्यक्तीने निजामाशी सहकार्य करून आपल्या जातीला कलंकित करू नये. निजामाविषयी डॉ.आंबेडकरांची स्पष्ट भूमिका असतानाही काही आंबेडकर द्वेषी लोकांकडून अर्धवट अभ्यासातून त्यांच्यावर निजामाकडून पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेसाठी मदत घेतल्याचा आरोप करत असतात.

निजामाने लाखो रुपयांची जमीन व १२ लाख रुपयांचे बिनव्याजी, बिनमुदतीचे कर्ज पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिले म्हणूनच औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालय स्थापन होऊ शकले असे नेहमीच बिनबुडाचे आरोप केले जातात. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे.

निजामाचे सरकार असताना दलितांच्या शैक्षणिक विकासासाठी १ कोटी रुपयांचा डिप्रेस्ड क्लासेस वेल्फेअर फंड उभारण्याचा निर्णय १ एप्रिल १९४७ साली घेतला होता. मात्र १७ सप्टेंबर १९४८ नंतर म्हणजेच पोलीस ऍक्शन नंतर या फंडाचे नामकरण शेड्युल कास्ट ट्रस्ट फंड असे करण्यात आले होते.

निजामाचे सरकार खालसा झाल्यानंतर २३ मे १९४९ रोजी हैदराबाद सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री सी.व्ही. राव आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये लेखी करार होऊन महाविद्यालयासाठी १२ लाख रुपये बिनव्याजी कर्ज मंजूर करण्यात आले होते. मिलिंद महाविद्यालय १९ जून १९५० ला सुरु झाले.

१७ सप्टेंबर १९४८ सालीच हैदराबाद स्टेट भारतात सामील झाले होते. त्यामुळे पीपल्स एज्युकेशनला मिळालेले कर्ज हे स्वातंत्र्योत्तर हैदराबाद सरकारने मंजूर केले होते. तसे विधायक विधानसभेत मांडण्यात आले होते. एम.के. वेळोदी तेव्हा मुख्यमंत्री होते. तसेच निजामाने शरणागती स्वीकारल्यानंतर त्याला भारत सरकारने हैदराबादचा नामधारी राज प्रमुख केले होते. १ सप्टेंबर १९५१ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीने उभारलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या भव्य वास्तूचा शिलान्यास समारंभ राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाला.

संदर्भ :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र – धनंजय किर
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील चित्तथरारक आठवणी – लक्ष्मणराव कापसे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हैदराबाद संस्थान – डॉ.शेषराव नरवाडे