देवानामप्रिय प्रियदर्शी याने कोरून ठेवलेल्या शिलालेखांचा शोध, अनेक शतकांमध्ये आणि पूर्ण भारतभर घेतला जात होता. आणि अनेक वर्षे’ देवानामप्रिय प्रियदर्शी’ या नावाच्या व्यक्तीची ओळख पटवणं म्हणजे एखादं कोडं सोडवण्यासारखंच कठीण काम झालं होतं.
१९१५ साली एक दिवस कर्नाटकामधल्या रायचूर जिल्ह्यातल्या मस्की नावाच्या एका खेड्यातल्या, एका टेकडीवर एक शिलालेख सापडला आणि या शिलालेखावर पहिल्यांदाच, अशोकच्या नावासोबत ‘देवानामप्रिय’ आणि ‘प्रियदर्शी’ अशी दोन नावे कोरलेली सापडली. यावरून ‘देवानामप्रिय प्रियदर्शी’ म्हणजे दुसरी कोणती व्यक्ती नसून, अशोकचीच ही नावे होती हे निश्चितपणे समजले.
अशोक म्हणजे असा एक सम्राट ज्याचे नाव जगाच्या इतिहासात एखाद्या अति-तेजस्वी ताऱ्यासारखे तळपत राहिले आणि त्याच्या मृत्यूला दोन हजार वर्षे उलटून गेली असली तरी अजूनही सगळ्या जगाच्या मनात या सम्राटाबद्दल आदर आहे, प्रेम आहे.