बातम्या

बुद्धकालीन बावरी ब्राह्मणाच्या प्राचीन स्थळाचा लागला शोध; ३० वर्षांपासून पुरातत्ववेत्ते शोध घेत होते

भगवान बुद्धांच्या वचनाला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्या संगितीमध्ये बऱ्याच सूत्रांची संहिता ठोकळमानाने तयार झाली. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या संगितीमध्ये संपूर्ण त्रिपिटक आकारास आले असावे. म्हणजेच बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ते सम्राट अशोक यांच्या काळातील तिसऱ्या धम्मसंगती पर्यंत त्रिपिटकाची रचना परिपूर्ण होत गेली. या त्रिपिटक साहित्यात एवढी प्रेरणादायी सामुग्री भरली आहे की सर्व संस्कृतीत त्याचे पडसाद उमटले जाऊन आजही मानवी जीवन समृद्ध होत आहे. अशा या बौद्ध संस्कृतीच्या त्रिपिटक साहित्यातील ‘सुत्तनिपात’ हा ग्रंथ बराच प्राचीन असल्याचे दिसून येतो. यातील अनेक गाथांमधून बुद्धकालीन संस्कृतीचे, समाज रचनेचे धागेदोरे मिळतात. यातील गाथा नंतरच्या पाली ग्रंथात उदा. धम्मपद, उदान, इतिवृत्त, मिलिंदपन्ह, थेरगाथा इत्यादी मध्ये सापडतात. यातील २४०० वर्षांपूर्वीच्या भारतातील सामाजिक स्थितीचे चित्रण वाचताना आश्चर्य वाटते.

‘सुत्तनिपात’ या ग्रंथात शेवटी असणाऱ्या पारायणवग्गात सोळा सूत्रे एकत्र गुंफल्याचे आढळते. यामध्ये ‘बावरि’ नावाच्या एका महंताची कथा आहे. तो दक्षिणेला गोदावरी नदीच्या तीरावरील एका बेटावर रहात असल्याचा उल्लेख आहे. एका लूच्च्या ब्राह्मणाने दक्षिणा मिळाली नाही म्हणून डोक्याची सात शकले होतील असा बावरिला शाप दिला. तेव्हा शापवाणीने काही अपाय तर होणार नाही ना याबाबत बावरिच्या मनात शंका आली. तो घाबरला. मग त्याने शंका निरसनासाठी आपल्या सोळा शिष्यांना भगवान बुद्धांची भेट घेण्यासाठी श्रावस्तीला धाडले. ते सोळा शिष्य भगवान बुद्धांना भेटले आणि त्यांची धम्मदेसना ऐकून तेथेच अहर्त झाले. कालांतराने बावरि देखील बुद्धांचा शिष्य झाला. या कथेत ज्या मार्गाने बावरिचे सोळा शिष्य दक्षिणेकडून उत्तरेकडे श्रावस्तीला गेले त्या गावांचा उल्लेख पारायणवग्गात आला आहे. त्यामुळे संशोधकांनी ती गावे कोणती असावीत व बावरिचे वसतिस्थान कुठे असावे हे शोधण्यास सुरवात केली.

बदानकुर्तीच्या आसपास प्राचीन शिळा आढळून येतात. काही शिळांवर कलाकुसर दिसून येते.

तेलंगणा राज्यामध्ये निर्मल जिल्ह्यात गोदावरी नदीचे मोठे पात्र आहे आणि तेथील बदानकुर्ती भागांत अनेक बौद्ध संस्कृतीचे अवशेष प्राप्त होत असल्यामुळे तेलंगणा जॉइंट एक्शन कमिटी यांनी सरकारकडे मागणी केली की हा परिसर प्राचीन बौद्ध स्थळांचा परिसर म्हणून घोषित करावा. येथील गोदावरीच्या विस्तीर्ण पात्रामुळे तयार झालेली बेटे पाहून अनेक संशोधक आणि पुरातत्ववेत्ते बावरिच्या ठिकाणाचा शोध घेत होते. १९९० मध्ये पुरातत्ववेत्ते ठाकूर राजाराम सिंग यांनी बदानकुर्ती येथील बेटावर बावरिचे वसतिस्थान असावे असे अनुमान काढले. पण त्याची शहानिशा करण्यास २०१९ साल उजाडले.

प्रत्यक्षात तेलंगणाचे पुरातत्ववेत्ते व बुद्धवनमचे संशोधक यांना बदानकुर्ती पासून १२ कि. मी. अंतरावरील बवापुर कुरु या बेटावर झाडाझुडुपांमध्ये संपूर्ण विटांचा मोठा स्तूप अलीकडेच सापडला. त्यास प्रदक्षिणा पथ असून त्याच्या भोवती वेगवेगळ्या विटांच्या आकारातील अन्य छोटेमोठे स्तूप आढळून आले आहेत. संशोधक डॉ. डी. संतोष यांनी याबाबत मोलाची कामगिरी केली. यथावकाश त्याचे फोटो प्रसिद्ध होतील.
तेलंगणा राज्यात बौद्ध धम्माचा प्रसार बौद्ध भिक्षू उत्तर व पूर्वेकडून प्रवास करत गोदावरी येथील प्रदेशात आल्यामुळे झाला असावा असे समजले जाते. तसेच सातवाहन राजा हल आणि श्रीलंकन राजकुमारी लीलावती यांचा विवाह बदानकुर्ती येथे झाल्याचे मानले जाते.

सप्त गोदावरीचा प्रदेश म्हणून प्राचीन साहित्यात ज्या प्रांताचा उल्लेख येतो तोच हा भाग असावा असे अनेकांना वाटते. अशा तर्हेने बावरि आणि त्याचे सोळा शिष्य यांचे वसतिस्थान आणि तेथून उत्तरेकडे श्रावस्तीकडे जाण्याचा प्राचीन मार्ग संशोधकांनी शोधला. त्रिपिटकातील गाथांचे या कामी मोठे सहाय्य झाले. या शोधाबाबत अजून संशोधन चालू असून पारायणवग्गातील सुत्तावरून प्राचीन भारतीय बौद्ध संस्कृतीचा ठावठिकाणा गाठणे, हे मोठे विस्मयकारक वाटते.

-संजय सावंत, नवी मुंबई (ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)