एकदा भगवान बुद्ध वैशालीमधील कुटागार नावाच्या शाळेत थांबले असताना भद्दीय नावाचा लिच्छवी त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, “भगवन् लोक म्हणतात की, श्रमण गौतम एक जादूगार आहेत व ते जादूटोणा करून दुस-या मतांच्या शिष्यांचे मत परिवर्तन करतात. तेव्हा याविषयी आपले काय म्हणणे आहे.
भगवंत म्हणाले, भद्दीय! अफवा, परंपरा किंवा लोकापवाद यावर विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे किंवा ती तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित आहे किंवा बाह्यतः ती खरी वाटते किंवा तुम्हास ती न्याय्य वाटते, म्हणून ती मान्य करू नका. तसेच ती एखाद्या आदरणीय व्यक्तीने सांगितली आहे, ती मानलीच पाहिजे अशा भावनेनेही तुम्ही तिचा स्वीकार करू नका.
परंतु भद्दीय! अमूक एक गोष्ट पापकर्म आहे, हे स्वतः आपल्या अनुभवाने निरीक्षण करून पाहिल्यावर किंवा अनुभवी विद्वानांनी ते निंद्य कर्म आहे, असे सांगितले व त्यामुळे हानी होण्याचा संभव आहे असे जर आढळले तर त्याचा तुम्ही त्याग करा, भद्दीय माझ्या शिष्यांना मी फक्त असा उपदेश करतो की, शिष्यांनो लोभयुक्त विचारांचे नियमन करा. म्हणजे कोणतेही लोभमूलक कार्य काया, वाचा, मनाने तुमच्याकडून घडणार नाही. द्वेष व अविद्या यांच्या आहारी जाऊ नका. ही शिकवण जर जादूटोणा असेल तर ती जगाच्या हिताची व सुखाची ठरणार आहे. “
Love you Buddhist