ब्लॉग

तुम्ही संकटापासून पळू नका!

प्रथम आपल्या मनात व घरात भरभक्कम पाया रचण्यासाठी स्वत:पासूनच आरंभ करावा लागतो. आदर्श समाजाची, बुद्धभूमीची जर आपल्याला उभारणी करायची असेल तर त्याची सुरवात ही आपल्या स्वत:च्या घरापासूनच करायला हवी. तुम्ही तुमच्या घरात, मनात सुव्यवस्था आणलीत तर तुमचे केवळ घरच नव्हे तर अवघे जगच बदलून जाईल. यासाठी गुणात्मक परिवर्तनाची निकड आहे. यातही असे परविर्तन स्वकडून स्वेतरांकडे गतिमान व्हावे लागते.

आपण जर संपूर्ण मानव जातीचा आजवरचा इतिहास पाहिला तर प्रत्येक पायरीवर माणसाने (आपणच) या व्यवस्थेत बिघाड घडवून आणला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्यक्षाप्रत्यक्ष युद्धालाही आपणच जबाबदार आहोत. खरे तर जेवढी आपण भौतिक प्रगती साधतो आहोत, तेवढ्या प्रमाणात किंबहुना त्यापेक्षाही अधिक वेगाने आपण आपल्या संपूर्ण समाज व्यवस्थेत बिघाड घडवून आणतो. ही वस्तुस्थिती आहे. अधिकाधिक युद्धे आकारात येत आहेत. ताणतणाव, दहशतवाद तसेच अराजकता ही रोजचीच आहे. ती देखील आपल्या मनात, घरात व अवतीभोवतीही. या पृथ्वीतलावर इतिहासाचा असा एकही तुकडा वा कालखंड नसेल की जेव्हा युद्ध आकारात आलेले नसेल.

एक माणूस, एक जमात तसेच दुस-याच्या विरोधात, युद्धासाठी संघर्षासाठी उभा राहिलेलाच आहे. एकूणच एक जमात-गट, देश वा धर्म दुस-याच्या विध्वंसासाठी आसुसलेला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक जण दुस-यावर आपली सत्ता-अधिकारशाही गाजवत स्वत:चा झेंडा / विचारधारा प्रस्थापित करू पहात आहे.

आजवरच्या या संघर्षमय-युद्धमय ऐतिहासिक वस्तुस्थितीकडे आपण नेहमीच डोळेझाक करीत आलो आहोत. पण तसे न करता किंवा त्यापासून पळून न जाता, स्वत:ला एकांतवासात कोंडून न घेता, आपल्याला आंतरर्बाह्य शांततेत, संघर्ष-युद्धाविना सुपूर्ण साफल्यमयतेत, आनंदात तेही मोठ्या पवित्रतेने व प्रज्ञेने जगता येईल का? बुद्धभूमीची व विचारसरणींची उभारणी आपल्याला करता येईल, हा खरा प्रश्न आहे. तसे जर तुम्ही करू शकलात-खरे तर त्यासाठीच सर्वांनी एकत्रितपणे, एकमेकांशी सुसंवाद साधत, सर्वांची मानसिकता एकवटत मूलभूत परिवर्तन घडूवन आणायला हवे! तरच आपण बुद्धभूमीची व अनुशासनाची तसेच चांगल्या सुखमय समाजरचनेची मागणी करू शकु. बुद्धाची शिकवण व विचार आपल्या मुलाबाळांत-घरात रुजवायला हवेत.

या आध्यात्मिक प्रवासात अंतिम सत्याच्या द्वारा बुद्धत्त्वापर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे. एकूणच ही आर्यसत्ये तुम्हाला ज्ञात आहेतच : हे जग दु:खमय आहे. मानवाचे दु:ख हे विवक्षित कारणपरंपरेमुळे उद्भवते. या दु:खाच्या तसेच संकटाच्या कारणांचा निरास करणे शक्य आहे. तुम्ही समस्येपासून-संकटापासून पळू नका! पण समस्या निर्माण करणाच्या कारणांचा शोध घ्या. या शोधप्रवासात स्वार्थ, आसक्ती, अहंकार यांचा त्याग करा. बुद्धाच्या अनुशासनाने व बुद्ध विचारांच्या बिनशर्त स्वीकाराने, प्रत्यक्ष आचरणाने दु:खाचा परिहार होईल.

संदर्भ: बुद्धाचा पुनर्जन्म – रयुहो ओकावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *