आंबेडकर Live

१९४८ सालीच डॉ.आंबेडकरांनी ठणकावून सांगितले ‘मुंबई महाराष्ट्राची’

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल (29 जुलै) मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना “मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही,” असं वक्तव्य करून मराठी माणसांसह महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबईच्या उभारणीत मराठी लोकांच्या कर्तृत्व, कष्ट आणि कर्तबगारीवर झाली असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात आयोगासमोर आपले मत मांडले होते. हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगावे लागेल.

संयुक्त महाराष्ट्र राज्य निमिर्तीसाठी महाराष्ट्रीय माणसांनी अत्यंत संघटितपणे चिवट असा लढा दिला आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले. या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांपेक्षा अगदी भिन्न व वेगळी अशी भूमिका बजावली. त्यासोबतच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचीच्या मागणीच्या आंदोलनपूर्वीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुंबई महाराष्ट्राची’ असल्याचे म्हटले होते.

काँग्रेसच्या मूळ धोरणानुसार स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावार प्रांतनिर्मितीचे वचन देण्यात आले होते. न्या. दार यांच्या अध्यक्षतेखाली १९४८ साली भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात एक आयोग नेमण्यात आला. या आयोगापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र अॅज ए लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुलनात्मक आकडेवारीसह निवेदन सादर केले. यामध्ये ‘मुंबई महाराष्ट्राची आहे,’ या संबंधी त्यांनी अत्यंत जोरदार समर्थन केले. ‘भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केल्यास मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे ते महाराष्ट्रापासून अलग करू नये,’ असे बाबासाहेबांनी स्पष्ट नमूद केले होते.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कुटील डाव चालले होते. या कृतीचा तीव्र शब्दा निषेध करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कृत्य निषेधार्ह आहे. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रापासून मुंबई विलग करण्याचे कोणतेही षड्यंत्र खपवून घेतले जाणार नाही आणि अशी कृती न्यायाला धरून होणार नाही.’ मुंबईतील मराठी लोकांच्या कर्तृत्व, कष्ट आणि कर्तबगारीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचीच्या मागणीच्या आंदोलनपूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील विचार लेखी स्वरूपात मांडले होते.

प्रामाणिकपणा, कर्तव्याची जाणीव व राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे बाबासाहेब म्हणत. ‘महाराष्ट्राची परंपरा टिकवायची असेल, तर महाराष्ट्रातील माणसाने विद्याव्यासंग सोडता कामा नये; त्यामुळे आपण आपली परंपरा टिकवू शकू, आपणामध्ये प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची जाणीव असावी. त्यामुळे राष्ट्रीय हिताची दृष्टी ही परंपरा आपण राखू शकू,’ असे त्यांचे म्हणणे होते.