काळ, स्थळ व परिस्थिती हे तीन घटक विचारात घेतले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्रात प्राप्त केलेल्या पदव्या म्हणजे त्यांचा अपूर्व पराक्रमच आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सहा पदव्या इसवी सन १९१३ ते १९२३ या दहा वर्षांच्या कालावधीत मुंबई, न्यूयॉर्क आणि लंडन या तीन ठिकाणाहून प्राप्त केल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेऊन इ.स. १९१२ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली. इ.स. १९१३ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन डॉ . आंबेडकर यांनी सामाजिक दृष्टीने पुढे क्रांतिकारी इतिहास घडवू शकेल अशी मुंबई विद्यापीठाची बी.ए. ही पहिली पदवी प्राप्त करण्याचा मान मिळविला.
डॉ.आंबेडकर यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाची एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण करून दि.२ जून १९१५ रोजी एम.ए. ची उच्च पदवी प्राप्त केली. त्यानंतर लगेच त्यांनी पीएच. डी. या अत्युच्च पदवीसाठी आपला प्रबंध इ. स.१९१६ च्या जून महिन्यात कोलंबिया विद्यापीठास सादर केला. काही तांत्रिक अडचणीमुळे जरी कोलंबिया विद्यापीठाने त्या प्रबंधाच्या आधारे डॉ. आंबेडकर यांना दि. ८ जून १९२७ रोजी पीएच.डी. ची अत्युच्च पदवी देण्यात आल्याचे जाहीर केले असले तरी इ. स. १९१७ मध्येच ही अत्युच्च पदवी देण्यात येत असल्याचे मान्य केले होते आणि ‘डॉक्टरेट’ ही अत्युच्च पदवी आपल्या नावासोबत वापरण्याची परवानगीही देण्यात येत असल्याचे कळविले होते.
इंग्लंडमध्ये लंडन येथील लंडन विद्यापीठाची एम.एस्सी. ही परीक्षा उत्तीर्ण करुन १९२१ च्या जून महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एम.एस्सी. ही लंडन विद्यापाठाची उच्च पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लगेच डी. पदवासाठी इ. स. १९२२ च्या ऑक्टोबर महिन्यात लंडन विद्यापीठा आपला प्रबंध सादर केला आणि इ.स. १९२३ च्या नोव्हेंबर महिन्यात त्या प्रबंधाच्या आधारे त्यांनी लंडन विद्यापीठाची डी. एस्सी. ही अतिउच्च पदवी प्राप्त केली.
दरम्यान त्याच कालावधीत लंडन येथील वास्तव्यात ‘ग्रेज इन’ मधून डॉ.आंबेडकर यांनी ‘बार – अॅट – लॉ’ ‘( Bar – at – law ) ही परीक्षा उत्तीर्ण करून कायद्याच्या क्षेत्रातील ‘ बार-अॅट – लॉ’ ही अत्युच्च पदवी प्राप्त केली आणि ते ‘बॅरिस्टर’ (Barrister) होण्यातही यशस्वी झाले. ज्या काळी भारतात महार या जातीला (आणि एकूणच ब्राह्मणेतर जातींना ) शिक्षण घेता येणार नाही अशी जाचक बंधनात्मक सामाजिक परिस्थिती होती त्या काळी महार जातीत जन्मलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील आणि परदेशातील विद्यापीठांच्या एकापेक्षा एक वरचढ अशा पदव्यांनी विभूषित व सन्मानित होत राहिले ; हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या भीषण प्रतिबंधात्मक काळाच्या संदर्भात अभूतपूर्व , अद्वितीय, अनुपम, विलक्षण, लक्षणीय, मननी विचारणीय, प्रशंसनीय आणि अनुकरणीय असा महा पराक्रम होता.