अमेरिका व भारत देशाची एकमेकांशी तुलना करीत बाबासाहेब बोलत होते. विश्वबंधुत्व व राष्ट्र यांची माहिती आपल्या भाषणात देत देत बाबासाहेब या संदर्भात ‘राष्ट्र व जात’ या मुद्याकडे वळले. त्याची छाननी करताना ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, “अमेरिकेत जातींचा प्रश्न नाही. भारतात जाती आहेत. या जाती राष्ट्रविरोधी आहेत. जाती सामाजिक जीवनात विषमता आणतात. वेगवेगळेपणा आणतात म्हणून त्या राष्ट्रविरोधी आहेत. जाती या जातीजातीत द्वेष व मत्सर निर्माण करतात. म्हणूनही त्या राष्ट्रविरोधी आहेत.”
आपल्याला राष्ट्र बनावयाचे आहे तर
बाबासाहेब पुढे म्हणाले, “आपल्याला राष्ट्र बनावयाचे आहे, तर या अडचणींना तोंड देऊन आपण त्यातून पार पडले पाहिजे. जर आपण खरे राष्ट्र असूतर विश्वबंधुत्व शक्य आहे. विश्वबंधुत्व नसेल तर काय? तर समता व स्वातंत्र्यास काही खोलपणा राहील काय? ब्रशाने रंगविलेल्या थराला खोली असते काय? तेवढी खोली तरी समतेला मिळेल काय? स्वातंत्र्यास लाभेल काय?”
सत्तेचे मक्तेदार व ओझ्याचे बैल
शेवटी समारोप करीत बाबासाहेब पुढे म्हणाले, “आपल्यापुढे असलेल्या समस्यांबद्दलचे हे माझे विचार आहेत. ते काही लोकांना फार आनंददायक वाटणार नाहीत. या देशातील राजकीय सत्तेची मक्तेदारी फार थोड्या लोकांच्या हाती आहे. ती मक्तेदारी फार काळ चालत आलेली आहे. उरलेले लोक निव्वळ ओझे वहाणाऱ्या बैलासारखे बनलेले आहेत.
संदर्भ : ऍड.बी.सी.कांबळे
समग्र आंबेडकर चरित्र
खंड २४