आंबेडकर Live

खंडाळ्याच्या हाॅटेलचा किस्सा : आपले बाबासाहेब जेवायला आलेत, तुमचं माझ भाग्य समजा

सन १९४२.मुंबई-पुणे हायवेवर निसर्गरम्य वातावरणात वसलेले त्याकाळातील सुप्रसिद्ध खंडाळा हाॅटेल.श्रीमंती थाटमाटातलं उंची हाॅटेल म्हणून त्याची गणना होत असे.हाॅटेल उंचशा टेकडीवर बांधण्यात आलेलं होतं.त्याच्या सभोवताली घनदाट झाडी.उत्तर बाजूला ऐतिहासिक राजमाची किल्ला,त्याच्या खालच्या दिशेला काचळदरी,दक्षिणेला नागफणी…भोवताली सह्याद्रीची गिरीशिखरं.पारशीबाबाचे हे हाॅटेल तिथल्या रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध होतं.पारशी पध्दतीची मटण बिर्याणी,हैद्राबादी बिर्याणी हे या हाॅटेलचे वैशिष्ट्य होतं.

नोव्हेंबरमधल्या कडाक्याच्या थंडीने आणि दाट धुक्याने सारा खंडाळा परिसर गारठला होता.थंडीच्या दिवसात हाँटेलात वर्दळ कमीच होती.बाहेरचं जेवणाचं दालन रात्री नऊलाच बंद होत असे.त्या दिवशी ही भटारखाना बंद करून सारे नौकर घरी जाण्याच्या तयारीत होते.त्याच वेळी एक काळ्या रंगाची डाॅज गाडी हाॅटेलच्या आवारात शिरली.त्यातून एक सूटाबुटातले गृहस्थ उतरले.हाॅटेलमधली सामसूम त्याना जाणवली.तरी ते काऊन्टर पर्यंत गेले.काऊन्टर वर असलेल्या मॅनेजरला त्यानी विचारलं,

” एक्सक्यूज मी.”
” येस सर,मी रामचंद्र कांबळे.”
“ओ.के.मि.कांबळे.आम्ही पाच जण आहोत आम्हाला डिनर हवयं.”
तसं हातातलं काम थांबवत रामचंद्र म्हणाले,
“थंडीच्या दिवसामुळे भटारखाना आताच बंद केला आहे साहेब.तुमच्यासारख्या अतिथींची सेवा करण्याची या हाॅटेलची खासियत आहे पण पण इलाज नाही.सगळे नौकर घरी निघालेत.”
त्या गृहस्थाने सहज सांगितलं,” कांबळेजी माझं नाव आर.आर.भोळे आणि इथं जेवायला आले आहेत ते भारताचे मजूरमंत्री डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.तेंव्हा प्रयत्न करून बघा.”

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव कानावर पडताच रामचंद्र कांबळेना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.त्यानी भोळेशी हस्तांदोलन केलं. ते म्हणाले,”साहेब सोय झालीच म्हणून समजा.आमचे भाग्य थोर म्हणून हा योग आलाय.अहो,देवाकडे मागूनही असं भाग्य आमच्या वाट्याला आलं नसतं.साहेब हे सार हाॅटेल आपल्या सेवेसाठी आहे.इथे काम करणारी बहुसंख्य मंडळी आपल्याच बिरादरीतील आहेत.मी आताच खानसाम्याला जेवण बनवायला सांगतो.तुम्ही बाबासाहेबाना घेऊन या.”
रामचंद्रच्या आनंदाला पारावारच उरला नाही. त्यानी ताबडतोब सा-या नौकराना बोलावून घेतलं.सांगितलं,

“आरं बाबानो,आपले बाबासाहेब आंबेडकर जेवायला आलेत,तुमचं माझ भाग्य समजा.त्यांची सेवा करायची संधी आपल्याला मिळालीयं.असा दिवस आयुष्यात पुनः येणार नाही.घरी जायला कितीही उशीर होऊ द्या,जेवणात कसलीही कसर राहू देऊ नका.”
सगळेजण झाडून कामाला लागले.आॅर्डर पेक्षाही अधिक पदार्थ बनवले गेले.

बाबासाहेबांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व,चेहऱ्यावर बुध्दिमत्तेची चमक,सूटाबुटातला रूबाबदार पेहराव,डोळ्यात विलक्षण तेज,त्या तेजाने कुणीही दिपून जावं.बाबासाहेबांचे दर्शन होताच सा-यानी मनोभावे हात जोडले,चरणस्पर्श करण्यासाठी खाली वाकणार तोच मागे सरकत बाबासाहेब म्हणाले,”अरे थांबा,मी काय देव आहे पाया पडायला! या,असे माझ्या जवळ या! तुम्ही माझेच आहात.मी तुमचाच आहे.”

बाबासाहेबानी जेवण केले.स्वादिष्ट भोजनाने ते तृप्त झाले.त्यानी सर्वाना धन्यवाद दिले.
जेवणानंतर भोळेनी बिलं देऊ केलं.तसे रामचंद्र आणि भागुजीबुवा हाॅटेल मालकाकडे गेले.त्यानी हाॅटेल मालकाला हात जोडून विनंती केली,” जेवायला आलेले आम्हा दीन दुबळ्यांचे पालनकर्ते आहेत.झालेलं बील आम्हा सर्वांच्या पगारातून वळते करून घ्या.”

हाॅटेल मालकने बाबासाहेबांचे नाव ऐकले होतेच.तो बाबासाहेबाना भेटायला आला.त्याने ही बील घ्यायला नकार दिला.तुमच्यासारख्या महान हस्तीचे पाय माझ्या हाॅटेलला लागले हे माझं भाग्य समजतो मी. सर्वानी बाबासाहेबाचे परत एकदा दर्शन घेतले अन बाबासाहेबांची गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली.

(चित्र – काळ्या डाॅग्ज गाडी सोबत बाबासाहेब.)

बी.एन.साळवे