आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनाबद्दलचा आलेख त्यांच्याच शब्दात लिहून ठेवला आहे. अनेकांना तो उद्बोधक आणि प्रेरणादायी वाटेल. त्यांनी लिहिले आहे की २१/०७/१९१३ रोजी मी न्यूयॉर्कला पोहोचलो. पहिले चार-पाच महिने काहीच अभ्यास झाला नाही. परंतु एके रात्री मी अभ्यासापासून दुरावलो आहे हे माझ्या लक्षात आले. मग मीच माझ्या मनाला विचारले ‘कुटुंबातील प्रेमळ माणसांना हजारो मैल दूर टाकून मी इथे अभ्यासाकरता आलो आहे. संस्थानाच्या मिळालेल्या पैशाचा व संधीचा उपयोग केला तरच मला माझा नावलौकिक वाढवता येईल. सर्व विषयांचा अभ्यास केला तरच मी जगातल्या सर्व पंडितांच्या रांगेत बसू शकेन’. ती रात्र त्यांना नवीन आत्मप्रभावाची जाणीव करून देणारी ठरली व ते अभ्यासात गर्क झाले. निश्चयाने तासनतास अभ्यास करण्याची सवय लावून घेतली. पुस्तकांसाठी काही काळ हॉटेल्स व खानावळीत सुद्धा त्यांनी अंग मेहनतीचे काम केले.

अंगात सुप्त गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतो असे त्यांचे मत होते. “मी संशोधन कसे करावे”? याबाबत प्रोफेसर सेलिंग्मनला त्यांनी विचारले असता ते म्हणाले “तू तुझे अभ्यासाचे काम चालू ठेव. म्हणजे तुला आपोआप समजू लागेल की संशोधन कसे करायचे ते”. या प्रमाणे मी खूप वाचन करू लागलो. टाचण काढू लागलो. त्यामुळे माझी स्मरणशक्ती दांडगी झाली. कोणता संदर्भ कोठे आहे हे ताबडतोब स्मरण होऊ लागले. डॉ. आंबेडकरांनी असे ही सांगितले आहे की तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. नोकरीमुळे पगार हाती येतो. ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाहीत, तो समाज अधिकाराच्या जागेवर जाणार नाही. त्याची ऊर्जितावस्था होणार नाही. ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत गुंतलेला आहे. त्यामुळे त्याला सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो. म्हणून सरकारी नोकरी मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करा.

६ मे १९५५ रोजी नालासोपारा येथे दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की भाराभर ग्रंथ नुसते वाचून काय उपयोग ? ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती आली पाहिजे. नवनविन कल्पना सुचल्या पाहिजेत. सिद्धांत परिपोष करता आले पाहिजेत. ज्ञानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. भर पडत असते. नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला, उज्जयनी या विद्यापीठातील ज्ञानसंचया नंतर शेकडो वर्षात ज्ञानात किंचितही भर पडली नाही. कारण धर्ममार्तंडानी ज्ञानाचा ऱ्हास केला. त्यामुळे त्याचे विकृत स्वरूप शिल्लक राहिले. तरी आपणाला जे ठावे आहे ते दुसऱ्यांना शिकवावे. शहाणे करून सोडावे.

पुस्तकांबद्दल आंबेडकरांचे असे म्हणणे होते की बायको-पोरांपेक्षा ज्यांचे विद्येवर जास्त प्रेम आहे त्यालाच विद्येची गोडी लागली असे म्हणता येईल. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की “जर कदाचित माझ्या घरावर सावकारी जप्ती आली आणि बेलिफाने जर माझ्या पुस्तकांना हात लावला तर त्याला मी गोळी घालून जागच्या जागी ठार करीन”. असे पुस्तकांबद्दलचे डॉ. आंबेडकरांचे अतोनात प्रेम होते.

संदर्भ :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाषणे आणि विचार, खंड-२ शिक्षण
संपादक डॉ. धनराज डाहाट.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)