आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाडची परिषद आणि गंधारपाले लेणी

महाडची सत्याग्रह परिषद दिनांक २५ ते २७ डिसेंबर १९२७ रोजी भरविण्यात आली होती. त्या परिषदेची पूर्वतयारी करण्याकरीता अनंत विनायक चित्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ते पंधरा दिवस अगोदरच महाडमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी महाडमध्ये त्यांना सत्याग्रहाबद्दल प्रतिकूल मत असल्याचे दिसले. तसेच परिषदेच्या कार्यात सर्वतोपरी विघ्ने उत्पन्न करून परिषदेला कोणत्याही प्रकारचे सामान मिळू द्यायचे नाही असा विरोधकांचा कट असल्याचे त्यांना दिसून आले. तेव्हा चित्रे यांनी कायस्थ ज्ञातीतील काही तरुण मंडळींना हाती धरून आपला उद्योग तडीस नेला. या कामी त्यांना शांताराम पोतनीस, केशवराव देशपांडे, कमलाकर टिपणीस, सुभेदार घाडगे, थोरात आणि जमादार वगैरे मंडळींचे पुष्कळ साहाय्य झाले. त्यांनी सर्व परिषदेची व्यवस्था इतकी उत्कृष्ट ठेवली की सगळे लोक थक्क झाले. २५ डिसेंबरला समुदाय दहा हजारांच्यावर झाला होता.

या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दीड दोनशे मंडळी दि. २४ डिसेंबर रोजी मुंबईवरून सकाळी नऊ वाजता पद्मावती बोटीने निघाली. ती संध्याकाळी साडेपाच वाजता हरेश्वर बंदरात येऊन पोहोचली. कोळमांडला येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी २५ डिसेंबरला सकाळी अल्पोहार झाल्यावर मंडळी आठ वाजता दासगावला जाण्यासाठी ‘अंबा’ बोटीत चढली. दुतर्फा डोंगर व मधून खाडी आणि आजूबाजूला हिरवीगर्द झाडी असा हा त्यांचा प्रवास खूप आनंददायी झाला. ‘अंबा’ साडेबारा वाजता दासगाव बंदरात पोहोचली. तेथे सुमारे तीन हजार लोक महाडला जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मुंबईकरांची वाट बघत बसले होते. दासगाव बंदरापासून महाड सुमारे पाच मैल आहे. डॉ. आंबेडकर तेथे पोहोचताच सर्वांना आनंद झाला. तिथून पाच जणांची एक रांग करून जयघोष करत मिरवणूक सत्याग्रहाच्या छावणी जवळ आली. सर्व लोकात वीरश्रीचा संचार झाला. तिथून मग परिषदेच्या कामास ४.०० वाजता सुरवात झाली. आलेल्या तारा व इतरांच्या पत्रांचे वाचन झाल्यावर डॉक्टर आंबेडकर यांनी आपले भाषण केले. त्यानंतर सभेत चार ठराव मंजूर करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता परिषदेच्या कामास सुरवात झाली. परंतु विरोधकांनी तोपर्यंत कोर्टाचा मनाई हुकूम मिळविला होता. स्वतः कलेक्टर डॉ. आंबेडकरांची समजूत घालीत होते. तरीही शेवटी चवदार तळ्यापर्यंत जाण्याचे डॉ. आंबेडकर यांनी ठरविले. व तळ्याच्या दोन्ही बाजूस मिरवणुका काढण्यात आल्या. हा विलक्षण देखावा पाहून आता तळे घ्यायचे बाकी काय राहिले !! असे केविलवाणे उदगार गावातील लोकांनी काढले. खांद्यावर काठ्या घेऊन मिरवणुकीचा हा देखावा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील मावळ्यांच्या सैन्यांची आठवण करून देत होता. घोषणांनी महाड दुमदुमून गेले. अनेक विरोधक घरे बंद करून पसार झाले होतेे. संध्याकाळी परत सभा होऊन आभार प्रदर्शन झाले व परिषदेची समाप्ती झाली. लोक आपआपल्या गावी परतू लागले.

तिसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २७ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर काही मोजक्या लोकांसह महाडची गंधारपाले लेणी बघण्यास सकाळी नऊ वाजता निघाले. पायी चालत सर्वजण लेण्याच्या पायथ्याशी आले. वनश्रीने नटलेल्या पायवाटेवरून चढत सर्वजण लेण्यापाशी पोहोचले. इथे ३ चैत्यगृह व १९ विहार आहेत. बौद्ध संस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा पाहून सर्वजण भारावले. वंदना झाल्यावर बुद्धांबद्दल माहिती डॉ.आंबेडकरांनी उपस्थितांना दिली. त्यानंतर काही घटका तेथे थांबून सर्वजण परत डोंगर ऊतरुन एक वाजेपर्यंत खाली आले. दुपारचे भोजन झाल्यावर मोजक्या लोकांसह डॉ. आंबेडकर रायगड पाहण्यास व मुक्काम करण्यास चार वाजता पुढे निघाले.

अशा तर्हेने डॉ. आंबेडकरांनी महाड परिषदेच्या निमित्ताने गंधारपाले लेण्यांना दि. २७ डिसेंबर १९२७ रोजी भेट दिली असल्याने आंबेडकरी चळवळीतील ते एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ झाले आहे. गंधारपाले लेणी आणि रायगड स्थळी जाताना डॉ. आंबेडकर यांना पाहण्यासाठी गावागावातून आबालवृद्ध येत होते. तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी तरुण महारांची फौज खडा पहारा देत होती. कारण महाड परिषदेमुळे काही दगाफटका होण्याची शक्यता निर्माण झाली होती. बौद्ध संस्कृतीच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमी आनंद वाटत असे. म्हणूनच सर्वांनी प्राचीन बौद्ध लेण्यांना वारंवार भेट देऊन भारताचा हा दैदिप्यमान वारसा जपला पाहिजे.

संदर्भ :- बहिष्कृत भारत (पाक्षिक पत्र) शुक्रवार ता. ३ फेब्रुवारी १९२८ ( अंक २२-२३-२४ )

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)