आंबेडकर Live

माझ्यामागे तुमचे ऐक्य अभेद्य ठेवा!

ता. ३१ डिसेंबर १९३९ रोजी कोल्हापूरहून सातारा येथे जात असता वाटेत नेरे मक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. गावातील सर्व स्त्री-पुरुष समुदाय स्वागतासाठी गावच्या शाळेच्या इमारतीत जमा झाला होता.

स्थानिक पुढा-यांनी डॉ. बाबासाहेबांचे स्वागत केले. रा. बी. टी. कांबळे या तरुण व उत्साही समाजकत्र्याचे स्वागतपर भाषण झाल्यावर डॉ. बाबासाहेबांनी जमलेल्या स्त्री-पुरुष मंडळीस दोन शब्द सांगितले, ते म्हणाले, मी स्वागत मानपत्र वगैरे प्रकारांचा भुकेला नाही. मला कोणी शिव्याशाप दिले तरी त्याची मला भीती वाटत नाही. सार्वजनिक कामास पैशाचे पाठबळ अवश्य लागते, हे आपणास ठाऊकच आहे. गांधीजींनी एक कोटी रुपयाचा फंड जमविला व त्याचा फन्ना झाला, हे आपण ऐकले असेलच, जनाब जिनांनाही सार्वजनिक कार्याप्रित्यर्थ पैशाचा पाठिंबा मिळत असलाच पाहिजे .

माझ्या समाजाकडून आजवर माझ्या कार्याला रु. ५, ००० पेक्षा जास्त मदत झालेली नाही, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या गरिबीमुळे आपणास आपण सांपत्तिक अडचणीतूनच कार्य करीत राहावे लागणार, हे उघड आहे. आपसात एकी राखली पाहिजे. बेकी माजू देता उपयोगाचे नाही. गांधी, जिना व अस्पृश्यांच्यावतीने मी, यांना विचारल्याशिवाय हिन्दुस्थानचा राजकीय प्रश्न सुटणार नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ही गोष्ट डॉ. थॉमसन या इंग्रज गृहस्थाने गांधीजींना व मलाही सुनविली आहे.

काँग्रेसने काही केले व काही म्हटले, मला राक्षस, राष्ट्रद्रोही, अस्तनीतील निखारा वगैरे शिव्याशाप दिले तरीही त्यांना मला पुसून टाकता येणार नाही, हे खास! असे म्हणण्याचे कारण काय? मी काही गांधीजीप्रमाणे महात्मा नाही. माझ्यामागे तुम्हा लोकांच्या अभेद्य ऐक्याचे कवच आहे. त्यानेच मला बळकटी आली आहे. म्हपान तुम्ही आपआपसात भांडू नका. मानापानासाठी चढाओढ करून एकमेकाल करू नका. जगात फुकट्याला काही मानसन्मान मिळत नाही, ही गोष्टही विसरू नका, समाजकार्यासाठी पैसे जमवतात व ते क्वचित प्रसंगी खाण्यातही येतात, ही गोष्ट मला माहीत आहे. तरी एवढ्यासाठी समाजकार्य थांबविता येणार नाही.

तळे राखणारा पाणी चाखतो, त्याचा आपण बंदोबस्त केला पाहिजे. पण आपण याबाबतीत व्यावहारिक दृष्टी ठेवली पाहिजे. काँग्रेसच्या एक कोटी फंडाची काय अवस्था झाली, हे जगजाहीर असून काँग्रेसचे कार्य चालूच आहे. आपसातील बारीकसारीक गोष्टींना महत्त्व देऊन यापुढे समाजात भेद करू नका, असेच माझे तुम्हास शेवटी सांगणे आहे.

संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण १६ खंड १८ भाग २