२५ डिसेंबर १९२६ ते ५ जानेवारी १९२७ अखेर नाताळच्या सुट्या असल्याने कोर्ट कचेऱ्या बंद होत्या. या कालावधित डाॅ.आंबेडकर, सी.ना.शिवतरकर व कापड व्यापारी गायकवाड यांचेसह विश्रांतीसाठी पन्हाळ्यात आले होते. येण्याआधी दत्तोबा पोवार व करवीर संस्थानाधिपती यांना पत्र लिहून पन्हाळा येथे राहण्याची व्यवस्था करणेविषयी कळविले.
त्याप्रमाने पन्हाळ्यावरील संस्थानच्या तीन नंबरच्या बंगल्यात राहणेस त्यांना परवानगी मिळाली होती. कोल्हापूर रेल्वेस्टेशनवर दत्तोबा पोवार व गंगाधर पोळ यांनी बाबासाहेब व सहकाऱ्यांचे स्वागत केले व लगेचच पन्हाळ्यावर ठरलेल्या बंगल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली.
पन्हाळ्यावर डाॅ.आंबेडकर विश्रांतीसाठी आल्याचे कळताच गंगाराम कांबळे, गणपतराव पोवार, दादासाहेब शिर्के इ.कार्यकर्ते डाॅ.आंबेडकरांना भेटण्यासाठी पन्हाळ्याला आले होते. रोज संध्याकाळी दतोबा पोवार,तुकाराम गणाचारी व गंगाधर पोळ डाॅ आंबेडकरांना भेटत व गडावर निरनिराळ्या ठिकाणी फिरवत असत.
असेच एके दिवशी गडावर फिरताना डाॅ आंबेडकरांचे लक्ष तेथून दिसणाय्रा मसाई पठाराकडे गेले व तेथे जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार पूर्ण तयारीनिशी मसाई पठारची सहल करण्याचे ठरले. मसाई पठार हे स्थळ पन्हाळ्या पासून दोन ते तीन मैल अंतरावर व बऱ्याच चढउताराचे असल्यामूळे सोबत फराळही घेण्याचा बेत ठरला. रविवार सुट्टिचा दिवस निश्चित करण्यात आला.
दत्तोबा पोवारांनी आपल्या दोन कारकुनांसोबत भोजन साहित्य घेऊन दिले व जेवन तयार करुन जेवनावेळी पठारावरील देवळाजवळच्या पाण्याच्या झऱ्याजवळ येण्यास सांगितले. रविवार सकाळी चहापाण्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर डाॅ आंबेडकर, शिवतरकर,गायकवाड,दत्तोबा पोवार ,तुकाराम गणेशाचार्य ,गंगाधर पोळ ,डाॅ रमाकांत कांबळे,बामनीकर क्लार्क अशी सर्व मंडळी सकाळी नऊ वाजता पायी चालत मसाई पठाराकडे निघाली.
पन्हाळगड उतरुन झाल्याबरोबर वाटेतच शाहू महाराजांनी चहाचा मळा बसवून चहाची लागवड केली होती. या अनोख्या प्रकल्पाला भेट देऊन मळ्याची माहीती घेतली. प्रकल्प पाहून छ.शाहूंच्या बुद्धिमत्तेचे कौतूक करत व गप्पा मारत सर्वजन पठाराकडे निघाले.
चढ चढण्यासाठी प्रत्येकाने हातात काठी घेतली होती. डाॅआंबेडकर साहेबांच्या शरीराला शोभेल असा एक दंडा त्यांच्या हातात दिला होता. अखेर चढ चढून विस्तिर्ण अशा मसाई पठारावर सर्व पोहोचले. मसाई देवीच्या मंदिराजवळ वाहणारा झऱ्याचा डोह पाहून साहेबांना खूप आनंद झाला.
तेथून ते पुढे काही अंतर चालून गेल्यावर त्या ठिकाणी दगडात कोरलेल्या बुध्द लेण्या पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला. डोंगराच्या अखंड खडकात खोदलेल्या लेण्यांचा अस्वाद घेत ते देवळा जवळ आले. तेंव्हा डाॅ.आंबेडकर साहेबांना त्या डोहात आंघोळ करण्याची इच्छा झाली.अंडरपॅंट व धोतराचा उपयोग करुन त्या ओहोळरुपी वाहत्या पाण्याच्या झऱ्यात साहेब मनसोक्त डुंबत राहिले.
उघड्यावर आंघोळ करताना बाबासाहेबांचे गोरेपान शरीर एखाद्या पंजाबी पहिलवानालाही लाजवेल असे दिसत होते. नियोजित कार्यक्रमानुसार क्लार्क आडनाईक व कोरणे जेवण घेऊन पोहोचले. केळीची पाने ,पत्रावळीवर व झऱ्याजवळच्या एका विशाल वृक्षाच्या गार सावलीत बसून सर्वांनी भोजनाचा अस्वाद घेतला. जेवल्यानंतर बाबासाहेब म्हणाले,” पन्हाळ्यावरील मसाई पठार आणि हे वनभोजन माझ्या चांगलेच लक्षात राहील”
संकलन
राजेंद्र भोसले
संदर्भ
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार