आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान

कार्लाईलच्या मते सत्य हा थोर पुरुषाचा पाया आहे. मात्र जर सत्यनिष्ठा आणि बुध्दी बरोबरच समाजाच्या गतिमानते बद्दल तळमळ असेल तर हा पुरुष, महापुरुष होत असतो कारण महापुरुष समाजाच्या शुध्दीकरणाचे आणि प्रशासकाचे काम करीत असतो. ही कसोटी पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापुरुष का संभोधले जाते हे आपल्याला कळते.

बाबासाहेबांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक प्रवास हा थक्क करणारा आहे. असमतेने जातीपातीत विभागलेल्या आणि कायम शोषित राहिलेल्या समाजाला स्वातंत्र्य, समतावादी व मानव मुक्ती आणि कल्याणाचा मार्ग असलेल्या बौध्द धम्माची दीक्षा दिली. मात्र केवळ दीक्षा देऊन बाबासाहेब थांबले नाही तर ‘The Buddha and His Dhamma’ आणि ‘पालि व्याकरण व शब्दकोश’ सारखे ग्रंथ लिहिले ज्यामुळे बाबासाहेबांचे पालि भाषेबद्दलचे प्रेम, आदर आणि दूरदृष्टी दिसून येते.

१९४० नंतर म्हणजे वयाच्या पन्नाशी नंतर बाबासाहेबांनी ‘पालि व्याकरण व शब्दकोश’ लिहिला. त्यांचे हे काम अद्वितीय होते. त्यांच्या या ग्रंथाची तुलना १७५५ मधे डॉ. स्यामुअल जॉन्सन यांच्या इंग्रजी शब्दकोशाशी केली जाते मात्र त्यात एक मोठा फरक आहे. डॉ.जॉन्सनने जेव्हा इंग्रजीचा शब्दकोश लिहिला तेव्हा इंग्रजी ही जागतिक भाषा होऊ पाहत होती तर बाबासाहेबांनी जेव्हा पालि शब्दकोश लिहिला तेव्हा पालि जवळपास एक मृत भाषा होती. आणि मृत भाषा प्रवाहात नसल्यामुळे त्यातील वेगवेगळे शब्द शोधून, त्यांचे अर्थ व वाक्य रचना करणे हे महाकठीण काम बाबासाहेबांनी केले. या शब्दकोशात बाबासाहेबांनी पालि भाषेतील शब्दांना इंग्रजी, मराठी, गुजराती आणि हिंदी मधील अर्थ दिले आहेत. एवढंच नव्हे तर वाक्य रचना कशी करावी व दोन व्यक्तींमधील घरगुती अथवा व्यावसायिक संवाद पालि मधे कसा असतो हेही दाखवून दिले. त्यामुळे हा शब्दकोश जगातल्या इत्तर सर्व शब्द्कोशांपेक्षा वेगळा ठरतो.

चाईलडर्सने पालि इंग्रजीमधे शब्दकोश लिहिला होता पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याचा उपयोग नव्हता. पालिमधे कच्चायन व्याकरण सर्वात जुने आहे. या ग्रंथात बाबासाहेबांनी पालि भाषेचे व्याकरण अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे त्यामुळे पालि भाषा व तिचे व्याकरण शिकताना सोपे जाते. भविष्यात भारतात बौध्द धम्माचे आकर्षण वाढेल आणि बुध्द विचार समजून घेण्यासाठी लोक पालि भाषा शिकतील हा दुर्दृष्टीपणा ठेऊन बाबासाहेबांनी ‘पालि शब्दकोश व व्याकरण’ हा ग्रंथ लिहिला जो आजही पालि भाषा शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

‘The Buddha and His Dhamma’ हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी संपूर्ण पालि त्रिपिटकाचा अभ्यास केला होता याची साक्ष या ग्रंथाच्या प्रत्येक पानावर दिसते. हा ग्रंथ १९५० ते ५६ या कालावधीत बाबासाहेबांनी प्रकृती साथ देत नसतानाही अतिशय सखोल आणि तार्किकरित्या निर्माण केला. पालि त्रिपिटकामधे काही विरोधभासी वाक्यांवर बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केले व भ.बुद्धांच्याच पालि वचनांचा आधार घेत स्पष्टीकरणही दिले. या ग्रंथात बाबासाहेबांनी तळटीप न दिल्यामुळे अंतराष्ट्रीय स्तरावर काही जणांनी या ग्रंथावर शंका घेतली, मात्र १९६१ मधे डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन यांनी बाबासाहेबांनी या ग्रंथातील कोणती वाक्य पालि त्रिपिटक मधील कोणत्या सुत्तातील आहेत हे शोधून काढले व बाबासाहेबांनी लिहिलेला ‘The Buddha and His Dhamma’ या ग्रंथाला पालि त्रिपिटकच आधार असल्याचे सिद्ध केले.

पालि त्रिपिटक हे तुलनेने प्रचंड आहे. बायबल पेक्षा ११ पटीने मोठे आहे. पिढी दर पिढी मौखिक रूपाने बुध्द वचनांचा प्रसार होत होता. त्यामुळे नकळतपणे त्यात काही अघटीत घटनांचा उल्लेख आला आहे. बाबासाहेबांनी अशा प्रत्येक घटनेचे खंडन केले आहे व सर्वसामान्यांना बोध होईल असा बुध्दांचा इतिहास आणि त्यांचा धम्म लिहिला. महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौध्द धम्म पुनर्जीवित करताना असा खांब उभा केला आहे कि कोणी तो हलवू शकणार नाही.’ बौध्द धम्म आणि बौध्द समाजासाठी जे योगदान बाबासाहेबांनी नागपूर येथे दीक्षा देऊन केले त्यापेक्षा कैक पटीचे योगदान बाबासाहेबांनी हे दोन ग्रंथ लिहून दिले आहे. डॉ.बाबासाहेबांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर ती पालि भाषा शिकून द्यायला हवी तरच या महापुरुषाच्या कष्टाचे चीज होईल.

अतुल भोसेकर 
(लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक) 
९५४५२७७४१०

2 Replies to “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान

  1. अलौकिक असे लैखन आणि ऐतिहासिक सत्यशोधाचे जगासमोर प्रस्तुतिकरण करण्याच्या या महान कार्यास कृतद्नपणे आप ले आभार। जय भिम

Comments are closed.