या पवित्र वैशाखी बुद्ध पौर्णिमेला अतिशय उत्साहात,बुद्धम् शरणम् गच्छामि या मंगलमय जयघोषात, जवळपास 20,000 उपासकांच्या उपस्थितीत लोकुत्तरा महाविहार चौका औरंगाबाद , इथे तथागत बुद्धांच्या 50 फूट उंच मूर्तीच्या प्रतिष्ठापणेचा मंगल सोहळा भिक्खु संघाच्या मार्गदर्शना खाली पार पडला. रखरखत्या उन्हात लहानबालके, वृद्ध, महिला ,तरुण मुलं ,मुलीनी प्रचंड गर्दी केली होती. मोठ्या संख्येने उपासकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद.
प्रज्ञा मुर्ती,नागपुर यांनी फार लक्ष देऊन व खुप मेहनतीने ही मुर्ती तयार केली आहे.ही मुर्ती बसवताना साइटवर काम करणारे उपासक संदीप कांबळे मागील 5 दिवसापासून दिवस रात्र काम करून इतकी सुंदर मुर्ती या ठिकाणी बसवली, ते माझे भाऊ याचा मला अभिमान आहे. 18 तारखेला मी मुंबई वरून पहाटे 3.30वाजता चौका इथे पोहोचलो, त्यावेळेस सुद्धा संदीप हे साईटवर उभे राहून काम करत होते.त्यांना विशेष धन्यवाद! माझ्यासाठी हा अविस्मरणीय प्रसंग होता,जो नेहमी करिता माझ्या स्मरणार्थ राहील.
तथागत बुद्धाने मनावर विजय प्राप्त करून, संपुर्ण मानव जातीला दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला. या बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर तथागतांच्या 50 फुट मुर्तीचा लोकार्पण सोहळा उत्स्फूर्तपणे पार पडला. यावेळी वंदनीय भिख्खू संघाची पवित्र धम्मदेसना उपासकांनी ग्रहण केली व आनंदाणे सर्वजन घरी निघून गेले.परंतु या आनंदात काही जणांनी मात्र त्यांच्या आठवणी कचऱ्याच्या स्वरूपात या पवित्रबुद्ध मूर्तीच्या स्थळीच ठेवल्या होत्या.

मुंबई वरून आलेले राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती मधील स्वयंसेवकांच्या मदतीने आम्ही रात्री थोडी साफ सफाई केली.दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार ( १९ मे २०१९ ) मी लोकुत्तरा विहारातच होतो.त्या वेळेस एक उपासिका तिथे मला कचरा वेचताना दिसल्या. यावेळी मी ही त्यांना कचरा वेचण्यास मदत करू लागलो;तेव्हा मला आठवले की आदल्या रात्री या भगिनी मला म्हणाल्या होत्या की तुमचे धम्मकार्य पाहून आम्हाला खुप प्रेरणा मिळते.तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की स्वतः पासूनच धम्मकार्याची सुरुवात केली पाहिजे. तेव्हा त्या भगिनी म्हणाल्या होत्या की , सर मी उद्या सकाळी इथे येऊन लोकांनी टाकलेला कचरा उचलणार आहे”. या “उपासक” भगिनींचे नाव शारदा पगारे असे असुन ,त्या सातारा रोड औरंगाबाद इथे राहतात. शहरापासून १४ ते १५ की.मी दूरवरून कार्यक्रम संपल्यावर,दुसऱ्या दिवशी स्वयंस्फुर्तीने इतरांनी टाकलेला कचरा उचलण्या साठी व आपली पवित्र वास्तू स्वछ ठेवण्या साठी येणे आणि या धम्मकार्यासाठी वेळ देने हे महत्वाचे काम करणाऱ्या “उपासीकेला” मी प्रणाम करतो.
आम्हाला कचरा वेचताना बघून त्त्यानंतर याच वेळी त्या ठिकाणी दुसरे १०-१२ जण तिथे हजर होते; त्यांनी मला त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी विनंती केली. तेव्हा जरा नाराजीनेच त्यांना म्हणालो “अरे जरा लाज वाटू द्या, आधी कचरा उचला आणि मग माझ्या सोबत फोटो काढा.” तेव्हाच एकदम मला तीव्र जाणीव झाली की तथागत बुद्धांनीही मनातील कचरा काढण्यासाठीच तर आपल्याला अष्टांगिक मार्ग सांगितला आहे.त्यांचे पालन जर लोकांनी केले तर त्यांच्या मनातील विकाररुपी कचरा दूर होईल आणि त्या नंतर आपल्या” विहारात,पवित्र वास्तु मध्ये कोणी ही कचरा करणार नाही.
माझी पत्नी थायलंड येथील निवासी आहे. ती लोकुत्तरा येथे आली की बुद्ध विहाराची साफ- सफाईसाठी मदत करते.मागील वर्षी वर्षावास सुरू असताना तासगाव येथील उपासक साळवे यांच्या सोबत 15 ते 20 उपासक दर रविवारी लोकुत्तरा भिख्खू प्रशिक्षण केंद्रात साफ-सफाई करायला यायचे बुदिस्ट कल्चर मध्ये स्वतः धम्माला वेळ देने खुप महत्त्वाचे पुण्यकर्म मानले जाते. आपल्याकडे हा विचार रुजायला वेळ लागेल हे मला माहिती आहे.मात्र या कचरा वेचणाऱ्या उपासीकेने दृढनिश्चय करून एवढ्या दूर एकटीने येथील कचरा उचलून “स्वताच्या” मनातील कचरा नष्ट करण्याचा निश्चय केला ही माझ्या साठी अत्यंत महत्वपूर्ण व आठवणीत राहणारी बाब आहे.
स्वतःच्या मनातुन अशी इच्छा उत्पन्न होने ह्याला खुप महत्त्व आहे. आपल्या पवित्र विहार परिसरातील कचरा उचलणे हे देखिल एक धम्मकार्य आहे या जाणिवेतून काम करणाऱ्या या उपासक भगिनीला मी स्वतःहून मला आपल्यासोबत एक फोटो काढायचा आहे अशी विनंती केली. मुंबई मध्ये आम्ही दर रविवारी “विहार स्वछ मन स्वछ” ही मोहीम राबवित असतो.या बुद्धपौर्णिमेच्या निमिताने लोकुत्तरा, औरंगाबाद, इथे बघायला मिळाले ही खुप चांगली सुरुवात आहे.मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात ही मोहीम औरंगाबाद येथे सर्वत्र पाहायला मिळेल. या पौर्णिमेच्या निमित्ताने हाती घेतलेले धम्मकार्य करण्यासाठी अशा सकारात्मक गोष्टीमुळे माझा उत्साह आणखीन वाढवला आहे.त्या बद्दल सर्वांना मी मनःपुर्वक धन्यवाद देतो.
या प्रसंगी माझ्या मनातील विकाररुपी कचरा कमी व्हावा यासाठी तथागताच्या चरणी प्रार्थना करून,तशी कृती करण्याचे स्वतःलाच बजावतो.
आपलाच:
डॉ.हर्षदीप कांबळे (आयएएस)
विकास आयुक्त (उद्योग) महाराष्ट्र राज्य.
मंगल कार्य,
मंगल kaamna.