बातम्या

चंद्रमोळीत पोहोचला ‘हर्षदीप’; होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना डॉ. हर्षदीप कांबळेंची मदत

यवतमाळ : सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचा आपण एक महत्त्वपूर्ण घटक आहोत आणि आपली महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर ती आहे ही भूमिका पार पाडत असताना सनदी अधिकारी म्हणून संपूर्ण देशामध्ये परिचित असणारे डॉ.हर्षदीप कांबळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन जगासमोर एक आगळे वेगळे उदाहरण ठेवला आहे.

उच्चशिक्षित असणाऱ्या या दाम्पत्यांनी अपत्य होऊ देण्याची प्रतिज्ञा घेऊन समाजातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची संकल्पना ठेवली. त्याचे उदाहरण देऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत चा खर्च उचलण्याची किमया या सनदी अधिकाऱ्यांनी केली. आजही ती परंपरा कायम ठेवीत या वर्षी दहावीत उत्तीर्ण झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तो आदर्श जर प्रत्येक अधिकाऱ्यांनी घेतला तर सामाजिक दृष्टिकोनातून समाजातील प्रत्येक मुलं सक्षम होतील हे याचे उत्तम उदाहरण आहे. आजही कुठल्याही प्रकारचा अहंभाव मनामध्ये न ठेवता समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना महाराष्ट्राचा सलामच आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम भागात असणा-या गरीब व होतकरू तीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दत्तक घेतले. आता या तीनही गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च डॉ. हर्षदीप कांबळे व रोचाना कांबळे उचलणार आहेत. डॉ.हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोचाना कांबळे यांनी स्वतः अपत्य न होऊ देण्याचा निर्णय घेतला. शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेतले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव मादनी येथील सुरज डांगे या गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठविले त्यांचा सर्व खर्च या दाम्पत्यांनी केला आहे. हे त्यांचे कार्य अविरतपणे सुरू असतानाच, उमरखेड तालुक्यातील ढाणकी बिटरगाव येथील बुद्धभूषण चंद्रकांत इंगोले यास इयत्ता दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळाले. परंतु घरची परिस्थिती दयनीय व गरीब असल्याने तो पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने डॉ.हर्षदीप कांबळे यांना आपली आपबीती सांगितली. त्यानंतर लगेच त्याला मायेचा आधार देत त्यांनी शिक्षणाकरिता मदत पाठवली. त्यास लागणारा शिक्षणाचा खर्च हे दांपत्य उचलणार आहे.

तसेच बाभुळगाव तालुक्यातील आलेगाव डेहणी येथील चंद्रमोळी मध्ये राहणा-या दोन बहिणी पलक शेंडे व मोनाली शेंडे या दोन मुलींची शिक्षणाची समस्या निर्माण झाली होती. परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्या समोर शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, म्हणून त्यांनी आपली माहिती डॉ. हर्षदीप कांबळे यांना सांगितली. लगेच त्यांना आर्थिक मदत पाठवून त्यांच्याही शिक्षणाचा खर्च उचलला. शेकडो विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची सनदी अधिका-यांची ही पहिलीच घटना आहे.

मला मायेचा आधार मिळाला – बुद्धभूषण इंगोले

बुद्धभूषण इंगोले

माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची व दयनीय आहे. मी पुढील शिक्षण घेऊ शकेल की नाही याबाबत मला काळजी वाटत होती. अशातच मी डॉ. हर्षदीप कांबळे यांना फोन करून त्यांना माझी परिस्थिती सांगितली. त्यांनी मला मराठवाड्यातील नांदेड या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले असून डॉ. कांबळे सर्व रोचाना मॅडम यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. समाजासाठी मलाही काम करायचे आहे.

आमचे आदर्श डॉ. हर्षदीप कांबळे सर- पलक शेंडे

पलक शेंडे

मला खूप मोठं व्हायचं आहे,आणि पुढे शिक्षण घ्यायचे आहे. घरची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. कोरोनाच्या काळात मार्गदर्शन व आर्थिक मदत केल्याने आम्ही पुढील शिक्षण घेणार आहोत. आमचा आदर्श सर आहेत. अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी पलक शेंडे हिने दिली.

समाजातील होतकरू विद्यार्थी उद्याचे भविष्य – उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे

समाजात असणा-या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा माझा व माझी पत्नी रोचाना कांबळेचा सदैव प्रयत्न राहिला आहे. आम्ही अपत्य न होऊ देता समाजातील गरजवंत मुलांना दत्तक घेऊन ते विद्यार्थी उद्याचं भविष्य म्हणून त्यांना मदत करत आहोत. गरजवंतांना मदत करण्याचं कार्य करतांना आम्हाला समाधान आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याशी आमची जुळलेली नाळ अजूनही कायम आहे.