ब्लॉग

एका टेक्स्ट मॅसेजवर कधीही भेट न झालेल्या गरीब मुलाचा केला शिक्षणाचा खर्च; १० वर्षांनंतर झाली दोघांची भेट

एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल अशीच सत्य घटना बुलढाणा येथील एका गरीब विद्यार्थ्या सोबत घडली आहे. एका टेक्स्ट मेसेजवर त्या विद्यार्थ्यांचे इंजिनीरिंगचा संपूर्ण खर्च एक आयएएस अधिकारी करतो. विशेष म्हणजे त्या मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन नोकरी आणि लग्न झाल्यावर सुद्धा दोघांची भेट झाली नव्हती. तब्बल 10 वर्षानंतर दोघांची भेट झाल्यानंतर दोघे एकमेकांना पाहिले होते. अश्या दानशूर आणि गरीब विध्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या तळमळीबद्दल स्वतः तो विध्यार्थी आपल्या शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत…

गोर गरीब, शोषित पीडित, भटक्या विमुक्त, दिन दलित, मजूर, वंचित, मागासवर्गीय सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ, प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तर गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करणारे दीपस्तंभ!.. डॉ. हर्षदीप कांबळे साहेब

मित्रहो, डॉ.हर्षदीप कांबळे सरांविषयी बोलणे म्हणजे सूर्याला कंदील दाखवण्यासारखे होईल. कारण सरांचे कर्तृत्वच सागरासारखे अथांग व सूर्यासारखे प्रदीप्त, प्रखर आहे. सरांच्या कर्तुत्वाला विविध पैलू आहेत. विविध क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. ते सर्व सांगणे म्हणजे एक पुस्तकच तयार होईल. म्हणून त्यांच्या या कार्यामधून त्यांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण स्वखर्चातून पूर्ण करून त्यांचे भवितव्य घडवण्याचा जो भीमपराक्रम केला त्याविषयी मला आज तुमच्याशी हितगुज करायचे आहे. मदत करून शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन त्यांनी बदलविले, पण त्यापैकी मोजकीच उदाहरणे मी सांगणार आहे. कारण सरांनी कोणाला मदत केली हे कधीच कोणालाच सांगितले नाही.

माझ्या जीवनाचा प्रवास एका गरीब कुटुंबात, खेडेगावात झाला. आई वडील दोघांनाही शिक्षणाचा गंध नव्हता. पण वडील समता सैनिक दलाचे प्रमुख कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांची चळवळ जवळून बघितली. वडिलांनी स्वतः अशिक्षित असून आपल्या पाचही मुलांना डिग्री पर्यंतचे शिक्षण दिले. माझी लहानपानापासून इच्छा इंजिनियर बनण्याची. दहावीला 89 % घेऊन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई ह्यांच्या विद्याभारती सायन्स कॉलेज, अमरावती ला 12 वी सायन्स केले. नंतर अनुराधा इंजिनीरिंग कॉलेज, चिखली, बुलढाणा येथे प्रथम वर्षाला ऍडमिशन घेतली. माझ्या संघर्षाची सुरुवात येथूनच झाली.

वडिलांचे वार्षिक उत्पन्न खूपच कमी. इंजिनीरिंगचा खर्च त्यांच्या अवाक्याबाहेरचा, त्यांच्याकडून तुटपुंजी मदत होत होती. मोठ्या बहिणीने ही मदत केली. पण मेसला लागणारे पैसे, घरभाडे, ऑटोचे भाडे, कॉलेजचा खर्च त्यात भागत नव्हता, अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नव्हते. इंजिनीरिंग सोडून द्यावेसे वाटू लागले. इंजिनीरिंगचे स्वप्न अपूर्णच राहील असे वाटू लागले.

शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी माझ्या जीवनाचे दीपस्तंभ डॉ. हर्षदीप सरांचा परिसस्पर्श होऊन जीवनाचे सोने झाले. त्यादिवसापासून माझ्या जीवनातील संघर्षाचा अंधार दूर होऊन सरांच्या रूपाने आशेचा किरण दिसला. तो दिवस म्हणजेच 14 एप्रिल आमच्या बहुजनांचा मुक्ती दिन. त्यादिवशी एक कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यवतमाळचे एक गृहस्थ होते. त्यांना माझे सूत्रसंचालन आवडले. त्यांनी माझी चौकशी केली असता त्यांना माझी परिस्थिती समजली. त्यांनी मला एक मोबाईल नंबर दिला, तो नंबर होता यवतमाळचे कलेक्टर डॉ. हर्षदीप कांबळे साहेबांचा.

मी त्या व्यक्तीची गोष्ट जास्त सिरीयस घेतली नाही कारण जिथे जवळचे नातेवाईक शिक्षणासाठी मदत करत नाहीत तर मग अनोळखी व्यक्ती कशी मदत करेल? असे वाटले. काही दिवसांनी मी डॉ.हर्षदीप सरांना सहजच text message त्यांच्या मोबाईल वर केला. माझी सर्व परिस्थिती सरांना सांगितली. तोपर्यंत सर मला ओळखत ही नव्हते. मी सरांना बघितले पण नव्हते.

आधी सिनेमामध्येच बघितले होते की कोणी तरी दयाळू व्यक्ती गरिबांना मदत करतो. रिअल लाईफ मध्ये मला असा कधीच अनुभव आला नाही. रिअल लाईफ व रील लाईफ मधे खुप अंतर असतें हे माहिती होते. पण माझे मत हर्षदीप सरांनी खोटे ठरवले. त्याच दिवशी माझ्या मोबाईल वर एक कॉल आला. समोरून आवाज आला, “काय रे, मला असे समजले की तू परिस्थिती मुळे इंजिनीरिंग सोडून देत आहेस. मी तुला शिक्षणात मदत करेन. “मला वाटले कोणीतरी मित्र फिरकी घेत आहे मी फोन डिस्कनेक्ट केला. परत फोन आला आणि मला म्हणाले, “मी डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी, यवतमाळ.” माझा तर विश्वासच बसत नव्हता. मला एकदम रडूच कोसळले. आतापर्यंत जेव्हढेही अधिकारी बघितले ते फक्त स्टेज वर बोलायचे पण प्रत्यक्षात मात्र कर्तव्यशून्य.

कोणी अधिकारी एवढा कनवाळू, मायाळू, गरिबीची जाण असणारा आहे, हे पहिल्यांदाच बघितले. सरांनी मला सांगितले, “तू काळजी करू नकोस, तुझ्या शिक्षणाची सर्व जबाबदारी मि घेतो. तू बँक मध्ये अकाउंट ओपन कर. जेव्हाही तुला गरज भासली तर मी अकाउंट मधे पैसे पाठवेन. पण तू इंजिनियर झाल्यानंतर मला काय देशील? ” मी मानवी स्वभावानुसार सरांना म्हटले, “मि सर्व पैसे परत करेन. ” सर बोलले, “अरे, हे तर कोणीही करेल, तू मला एक प्रॉमिस कर कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा विचार न करता, बाबासाहेबानी जसा सर्व मानवजातीचा विचार केला तसाच तुलाही मानवतावाद हेच ध्येय समोर ठेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करायची. मी सरांना तसे प्रॉमिस केले. ” तेव्हापासून जेव्हाही मला गरज भासली मी सरांना मेसेज केला की पैसे माझ्या अकाउंटला लगेच यायचे. कधीही सरांनी प्रश्न विचारला नाही. सर कामात व्यस्त असले की, सरांना आदर्श मानणारे प्रा.संजय खडसे साहेब (निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला ) मला पैसे द्यायचे. सरांच्या संपर्कात असणारे अधिकारी सुद्धा सरांचा आदर्श घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करायचे. त्यात सर्वात आघाडीवर असणारे अधिकारी म्हणजेच प्रा. संजय खडसे साहेब.

मी नोकरीला लागल्यानंतरही डॉ. हर्षदीप सरांनी माझ्याकडून शिक्षणाला लावलेले पैसे परत घेतले नाही. त्यांना दिलेल्या प्रॉमिस नुसार मी 3 गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांना इंजिनियर घडवले. हर्षदीप सरांनी केलेल्या मदतीमुळे इंजिनियर झालो. इंजिनीरिंग कॉलेजलाच asst. प्रोफेसर झालो. नोकरी लागून 10 वर्ष होऊन गेलेत पण सरांची एकदाही भेट होऊ शकली नाही. मी सरांना बघितलं सुद्धा नव्हते. सरांनी सुद्धा मला बघितले नव्हते. एका अनोळखी विद्यार्थ्याला मदत करत होते. एवढे करूनही सरांनी माझे शिक्षण केले हे कोणालाही सांगितले नाही. माझ्यावर उपकार केले ह्याची जाणीवही होऊ दिली नाही. नाही तर काही लोक थोडेसे काही करतात आणि गावभर ढिंढोरा पिटतात. मी जेव्हा सरांच्या आईला भेटलो तेव्हा त्यांना पण सर ह्या गोष्टी कधीच सांगत नाही. त्यांच्या मित्रांना मीच सांगितले. ” नेकी कर दरियां मे डाल ” ह्या उक्तीप्रमाणे सरांचे कार्य सुरु आहे.

मला नोकरी मिळून 10 वर्ष झाले तरी सरांशी भेटण्याचा योग येत नव्हता. चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहतो तशीच मला सरांच्या भेटण्याची ओढ लागली होती. मी ठरवले होते की सरांसारखेच अधिकारी होऊनच सरांना भेटायचे. पण कुटुंबाची जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर आल्यामुळे अधिकारी होता आले नाही. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो अविस्मरणीय क्षण आला. २७ जानेवारी 2019 ला, सर एका लग्नासाठी अकोला येथे येणार होते. मी तिथे जाऊन सरांची भेट घेतली सोबत मॅडम पण होत्या. सरांना मी प्रथमच पाहत होतो. सरांनी सुद्धा मला पहिल्यांदाच बघितले. सरांना बघितल्यावर डोळ्यात आनंद अश्रू आले. सरांनी माझी, माझ्या मुलीची, पत्नीची आस्थेने चौकशी केली. माझ्या पत्नीला पण त्यांना भेटण्याची खुप उत्कंठा होती. सरांनी मॅडमशी जेव्हा ओळख करून दिली तेव्हा माझ्याविषयी सांगताना म्हणाले की हा मुलगा खुप विपरीत परिस्थितीत शिकून इंजिनियर झाला. खुप मेहनती आहे. येथेही त्यांनी स्वतः श्रेय न घेता माझ्या मेहनतीला दिले.

अकोला येथील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच भेट झालेली फोटो. फोटोमध्ये डॉ हर्षदीप कांबळे सर सोबत त्यांच्या पत्नी रोजाना व्हनिच कांबळे आणि प्रा.रवींद्र इंगळे आणि त्यांच्या पत्नी आहेत.

सरांनी माझ्याविषयी बोललेले शब्द मी कधीच विसरू शकणार नाही. जेव्हाही नर्वस होतो तेव्हा ते शब्द आठवले की मनाला ऊर्जा मिळते. मॅडम लाही त्यांनी स्वतः सांगितले नाही मला केलेल्या मदतीविषयी. मॅडम सुद्धा थायलंड च्या मोठ्या उद्द्योजिका असूनही खूप साध्या व नम्र आहेत. धम्मा प्रति समर्पित आहेत. औरंगाबादला लोकुत्तरा भिक्खू सेंटर, बांधण्यात त्यांचे फार मोठे आर्थिक योगदान आहे. एवढे असूनही त्यांच्या वागण्यात किती साधेपणा. त्यांनी ही आस्थेने चौकशी केली. जेव्हा सरांचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा सरांनी परत प्रॉमिसची आठवण करून दिली की सर्व जाती धर्माच्या मुलांना मदत करायची आहे. तीच माझी गुरुदक्षिणा असेल. सर नेहमी म्हणतात “DEVELOPMENT OF SELF &DEVELOPMENT OF SOCIETY AND DEVELOPMENT OF NATION. ” हेच उद्दिष्ट्य समोर ठेऊन काम करायचे. सरांना आदर्श मानून माझे काम सुरु आहे.

सरांनी लावलेल्या वटवृक्षाला आता फळे यायला लागली. “डॉ. हर्षदीप कांबळे सर शिष्यवृत्ती ” गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बुलढाणा येथे सुरु केली. त्याद्वारे दरवर्षी 3 विद्यार्थ्यांना mpsc च्या क्लास ची फीस, राहण्याचा, खाण्याचा, लायब्ररीचा पूर्ण खर्च देत आहे. सर नेहमी म्हणतात कुशल कर्म करायचे आणि विसरून जायचे ह्याच बुद्ध तत्वावर ते जगतात. जाता जाता काही कवितेच्या ओळी सरांसाठी…

” हे दीपस्तंभा, तुम्हाला माझे वंदन…
तुम्हीच भीमकर्तुत्वाचे सुगंधी चंदन
तुमच्या मायेच्या कुशीत, दीनदुबळ्या, गरीब, वंचित लेकरांचा विसावा
तुमच्याच सामर्थ्याने ‘भीमसूर्य ‘उद्याचा दिसावा….

लिहिण्यासाठी भरपूर आहे. पण इथेच थांबतो. साहेब, आपल्या सारख्या अधिकाऱ्याची देशाला नितांत गरज आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद साहेब

प्रा.रविंद्र प्रल्हादराव इंगळे,
मु.पो. -पिंपळगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जी. अमरावती
मोबाईल नंबर. -9860081640