मित्रहो, आज परत तुमच्या भेटीला येण्याचे कारण म्हणजे आज आषाढ पौर्णिमा, जी गुरु शिष्याच्या नात्याला उभारी देणारी व नाते दृढ करणारी, गुरु विषयी आदर व्यक्त करणारी पौर्णिमा. धम्मदान करणारे सम्यक संबुद्ध तथागतांचे स्मरण व्हावे म्हणून या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात ही पौर्णिमा सर्वत्र वंदनीय असून हा दिवस साजरा करण्याची परंपरा बुद्ध काळापासून आजपर्यंत आहे. ह्याच दिवशी तथागत बुद्धाने पाच ब्राह्मण शिष्याना प्रथम धम्मदीक्षा सारनाथ येथील इसिपतानाच्या मृगदायवनात दिली व भगवान बुद्ध विश्वगुरू झालेत.
आजच्या दिवशी मला माझ्या सारख्या अनेक गरीब, वंचित, पारधी, भटक्या विमुक्तांच्या मुलाच्या जीवनात शिक्षण रुपी प्रकाश आणणारे आमचे आदरणीय गुरु डॉ. हर्षदीप कांबळे साहेबांची आठवण झाली. हर्षदीप साहेबांनी कसे स्वतः पारधी तांड्यावर जाऊन तिथल्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचे जीवन घडवले हा प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे. कारण हा प्रसंग हर्षदीप सरांनी कधीच कोणालाच सांगितला नाही व कधीच सांगणारही नाहीत. त्यांचे नेहमीच सांगणे असतें फक्त कुशल कम्म करत राहायचे व विसरून जायचे कोणतीही अपेक्षा न करता, म्हणून 16 वर्षानंतर हा प्रसंग मला जेव्हा कळला तेव्हा तो प्रसंग शब्दबद्ध करत आहे.
हे पण वाचा : आधुनिक राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यदान करणारा अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे
साहेबांचे कर्तृत्व समाजाला कळायलाच पाहिजे कारण हे प्रसंग इतर अधिकाऱ्यांनाही प्रेरणा मिळून हजारो हर्षदीप साहेब तयार होतील ही अपेक्षा. ज्याप्रमाणे समुद्रात रात्रीच्या वेळेस जहाजाला योग्य दिशा मिळावी त्यासाठी दीपस्तंभ प्रकाश देण्यासाठी असतो त्याचप्रमाणे गोरगरीब, दलित, वंचित, पारधी, भटक्या विमुक्त, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जातीचा धर्माचा कोणताही विचार न करता दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणात आर्थिक मदत करून मानवतावाद जोपासणारे कांबळे साहेब त्यांच्या प्रशासकीय पदापेक्षाही मोठे आहेत. ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचे च दीपस्तंभ हर्षदीप सर झालेत.जी पारधी समाजाची मुले रस्त्यावर भिख मागायची, आज ते शिकून नोकरीवर लागलेत व स्वतःच्या कुटुंबाचे आधारस्तंभ झालेत ते फक्त ह्याच दीपस्तंभा मुळे.

हा प्रसंग मला साहेबांच्या सानिद्यात असणाऱ्या श्री.अंकुश वाकडे साहेबांनी सांगितला. साहेब यवतमाळला कलेक्टर असताना त्यांनी समाजातील गोरगरीब, वंचित लोकांवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीपासून च साहेबांनी पारधी वस्तीत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या. पारधी, भटक्याविमुक्तांच्या तांड्यावर जाऊन तिथल्या लोकांच्या समस्या सोडवणारा जिल्हाधिकारी यवतमाळ च्याच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेने प्रथमच बघितला. खऱ्या अर्थाने प्रशासन कसे केले पाहिजे ह्याचा मापदंड हर्षदीप साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वाने जनतेसमोर व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर ठेवला.
हे पण वाचा : पितृत्व त्यागणारा पिता : ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे
इंग्रजांपासूनच पारधी जातीवर गुन्हेगारीचा शिक्का. शिक्षणाचा अभाव. लेकरांना शिकवले पाहिजे असे पारधी समाजाच्या ध्यानी मनी ही नव्हते. पण साहेबांनी ह्या सर्व गोष्टीची तमा न बाळगता पारधी वस्तीतील विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणाची ज्योत त्यांच्यामध्ये पेटवली. लोकांना दाखवण्यासाठी नव्हे तर त्या मुलांना नोकरी लागेपर्यंत साहेबांनी त्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली.हे सर्व करत असताना कोणताही बडेजाव केला नाही.
अकोला मुकिंडपुर येथील पारधी तांड्या वरील 18 मुलांना दत्तक घेऊन त्यांना नोकरीवर लागेपर्यंत एका पित्यासमान त्यांची काळजी घेतली. त्यापैकी 11 नोकरीवर लागलेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर प्रथमता भटक्या विमुक्त आदिवासी जनजाति च्या कल्याणकडे साहेबांचे प्रामाणिकपणे लक्ष राहिले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी कोलाम पारधी व धनगर समाजाची बहुसंख्य संख्या असताना या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर डॉ. हर्षदीप कांबळे सर यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी प्रथम रस्त्यावरती भीक मागणाऱ्या पारधी समाजाच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले.
नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ या ठिकाणावरून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अकोला मुकिंदापूर पारधी पाड्यावर जिल्हाधिकारी यांची गाडी गेल्यानंतर त्या ठिकाणी थेट जिल्हाधिकारी यांनी या विदारक परिस्थितीत जगणाऱ्या, अठरा विश्व दारिद्र असणाऱ्या पारधी समाजाच्या घरी जाऊन त्यांना एकत्रित करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मार्गदर्शक सल्ला दिला. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व मुलांना एकत्रित करून अगदी तीसरी ते पाचवी पर्यंत असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
पारधी पाड्यातील 18 मुलं दत्तक घेण्याची घोषणा केली. त्यांना वेळोवेळी लागणारी विविध प्रकारची मदत सुद्धा केली. आज या पारधी पाड्यावरची असणारी मुलं पोलीस पाटील, पारिचारिका, एसटी ड्रायव्हर, कंडक्टर तसेच इतर गृह उद्योग आणि लघु उद्योगा मध्ये सुद्धा सक्रिय झाले आहेत. आजही डॉ. हर्षदीप कांबळे सर यांच्या आठवणी त्यांच्या मनात ताज्या आहेत. जिल्हाधिकारी आपल्या घरी येऊन गेला त्याचा अभिमान त्यांना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या मुलांमध्ये आज आमूलाग्र बदल जाणवतोय. त्यामुळे आजही ही मुलं साहेबांच्या भेटीची चातकाप्रमाणे वाट बघतात.
साहेब यवतमाळला कलेक्टर असताना साहेबांनी 18 विद्यार्थ्यांना दत्तक घेतले होते त्यापैकी बरेच नोकरीला लागले.त्यापैकी ज्या विद्यार्थीशी संपर्क झाला त्यांच्याच विषयी सांगत आहे. ते यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे
1) शारदा पवार, अकोला मूर्तिजापूर पारधी बेडा, तालुका -नेर, जिल्हा -यवतमाळ. ही मुलगी सद्या नर्सिंगचे ट्रैनिंग करत आहे. जेव्हा तिच्याशी बोललो तेव्हा तिने सांगितले कि जर हर्षदीप सरांचे मार्गदर्शन व शिक्षणासाठी मदत मिळाली नसती तर माझे जीवन चूल आणि मूल मधेच गेली असती. कमि वयात लग्न झाले असतें. शिक्षणाचा गंध ही नसता.
2) अमिताभ अभिलाल पवार, चिकणी डोंग्याचा राहणारा, तालुका -नेर, जिल्हा -यवतमाळ. हा मुलगा आरोग्य सेवक झाला. त्याच्याशी बोलल्यानंतर मि तर अचंभित झालो. त्याने सांगितले सरांनी जर मदत केली नसती तर आज मि कोणत्यातरी तुरुंगात शिक्षा भोगत असतो. कारण माझ्या वयाची मुले, चोरी, दरोडे टाकून तुरुंगात आहेत. सरांविषयीचा आदर त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.
3) टेलिसीन दीस्तु पवार हा मुलगा एस. टी. डिपार्टमेंट मधे रत्नागिरी येथे चालक आहे. तो सांगत होता कि साहेब आमच्यासाठी देवासारखे धावून आले. सरांमुळे नोकरी मिळाली.
4) अंजिता भोसले ह्या पांढरकवडा डेपो मधे एस. टी. चालक पदावर आहे. हे सर्व डॉ. हर्षदीप साहेबांच्या मदतीमुळे शक्य झाले.
पारधी समाजाची मुले शिकून नोकरी करत आहेत ही अशक्य गोष्ट साहेबांमुळे शक्य झाली. पोलीस नेहमीच पारधी समाजाला गुन्हेगारी जमात म्हणते. इंग्रजांनीही पारधी समाजाला गुन्हेगार म्हटले. आजही कुठे चोरी झाली, दरोडा पडला कि सर्वात आधी पोलीस टार्गेट करतात फासे पारधी लोकांना. त्यांना जेल मधे टाकल्या जाते. अस्या जमाती मधील मुलांना डॉ. बाबासाहेबांचे विचार सांगून कांबळे साहेबांनी शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यांचे जीवन प्रकाशमान केले. फक्त सांगितलेच नाही तर त्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च केला. शेवटपर्यंत मुलांची काळजी घेतली. त्यासाठी कांबळे साहेबांनी श्री. अंकुश काकडे ह्या उत्कृष्ट समाजसेवकाची निवड ह्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी केली. साहेबांचा सहवास लाभलेले व्यक्ती आपोआप समाजसेवा करायला लागतात.
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक धोरणाला नवं रूप देणारे आयुक्त
ह्या सर्व मुलांच्या राहण्याची, जेवणाची अभ्यासाची व्यवस्था साहेबांनी करून दिली. आज ह्या मुलांनी त्यांच्या अशिक्षित समाजासमोर नवीन आदर्श ठेवला ते फक्त डॉ. हर्षदीप कांबळे साहेबांमुळेच. म्हणूनच ह्या पारधी समाजातील मुलांनी डॉ. हर्षदीप कांबळे साहेबाना गुरु मानले आहे. हर्षदीप साहेबांसारखे गुरु मिळाल्यानंतर जीवनाचे सोने होणारच. असे असंख्य उदाहरणे आहेत. पण ते अजूनही प्रकाशात आले नाहीत. कारण साहेब ह्या गोष्टी सांगतच नाहीत. यवतमाळ मधील भटक्या विमुक्त लोकांसाठी साहेबांनी खूप काम केल्याचीही माहिती मिळाली. विशेष करून कोलाम जमातीच्या लोकांसाठी. ही कोलाम जमात अतिशय गरीब, अज्ञानी व अशिक्षित आहे व सर्वात जुनी आदिवासी जमात म्हणून गणल्या जाते.. त्यांच्याविषयी माहिती घेऊन परत तुमच्या भेटीला नक्कीच येईल.
अश्या ह्या गोरगरीब, वंचित, पारधी, भटक्या, विमुक्तांच्या पित्यास, जाती धर्माच्या पलीकडे विचार करणाऱ्या महानायकास, फुले, शाहू, बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या दीपस्तंभास, विशेष म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा जोपासणारे गुरु आम्हाला भेटले, हे आमचे अहोभाग्य. साहेबांमुळे आमचे अंधारमय जीवन प्रकाशमय झाले म्हणून गुरुपौर्णिमे निमित्ताने डॉ. हर्षदीप कांबळे साहेबाना मानाचा मुजरा..
Prof. Ravindra Ingle, AEC Engineering College, Chikhali, Buldhana.
Prof. Ankush Wakde, Sant Tukaram Maharaj Mahavidyalay, Yavatamal.