महाराष्ट्र राज्याचे उद्योग विभागाचे आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्ताने एका ऑनलाईन माध्यमाशी बोलताना डॉ.कांबळे यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्य करत असताना मोहापासून दूर जाण्यासाठी तसेच आपल्या स्वतःच्या आयुष्यातील वैयक्तिक जबाबदरी कमी करण्यासाठी आणि समाजातील मुलांना पुढे नेण्यासाठी स्वतःची मुलंबाळ होऊ न देण्याचा कांबळे दांपत्याने निर्णय घेतला असल्याचा खुलासा खुद्द डॉ.कांबळे यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.
सोमवारी (ता.१८) डॉ हर्षदीप कांबळे यांचा ५० वा वाढदिवस होता. राज्य तथा देशभरातून सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यानिमित्ताने वरिष्ठ पत्रकार रवींद्र अंबेकर यांनी त्याची विशेष मुलखात घेतली. यावेळी डॉ.कांबळे यांनी कोरोना संकट काळात तरूण तरूणींना रोजगाराच्या काय संधी? याविषयावर मार्गदर्शन केले. त्यासोबतच त्यांना वैयक्तिक आयुष्यवर काही प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नावर बोलत असताना डॉ.कांबळे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला त्यासोबतच एक मोठा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
कोरोना संकट काळात तरूण तरूणींना रोजगाराच्या काय संधी?
कोरोना संकट काळात तरूण तरूणींना रोजगाराच्या काय संधी? उद्योग #MSME विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याशी मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी केलेली विशेष चर्चा
Posted by Max Maharashtra on Monday, May 18, 2020
श्री अंबेकर यांनी डॉ कांबळे यांना प्रश्न विचारला की, आपण समाजातील सर्व मुलांचा विचार करत आहात, तुम्ही स्वतःच्या मुलांबद्दल काही विचार केला आहे का? यावर बोलताना डॉ कांबळे म्हणाले की, पूर्वीपासून मी सामाजिक आणि धम्माच्या कार्यात काम करतो. मी अनेक ठिकाणी जात असतो तिथे सोबत अनेक मुले काम करतात मी जिथे जिथे जातो तिथे मला ज्या वेळी गरजू आणि हुशार मुले दिसतात त्या त्यावेळी मी त्यांना शिक्षणासाठी मदत करत असतो. त्यामुळे समाजातील गरजू मुलांसाठी मला जास्त काम करायचे असेल तर आपली स्वतःची वैयक्तिक जबाबदारी कमी केली पाहिजे, असे मला वाटते. ही एवढी सर्व मुले पाहून मला असा विचार आला की आपले स्वतःचे मुलंबाळ ठेवणे गरजेचे आहे का? म्हणून मी आणि माझी पत्नी आम्ही यावर खूप विचार केला. त्यानंतर ठरवलं की स्वतःची मुलंबाळ होऊ द्यायची नाही असा ठाम निश्चय केला. समाजातील मुलांनाच पुढे आणायचे आणि त्यांच्यावर खर्च करायचा आहे. याचे आम्हाला काहीच दुःख नाही.
शेवटी आपले जीवन संपले की कुणाच्याही लक्षात राहत नाही. लोकांना हा निर्णय खूप मोठा वाटत असला तरी आमच्या दोघांसाठी खूप जाणीवपूर्व निर्णय घेतलेला आहे. आपल्याला अजून खूप मोठे काम करायचे आहे. त्यामुळे या मोहापासून दूर जायायला पाहिजे. असं आम्ही करून समाजामधील एवढी मुले आहेत तीच आपली मुले मानायची, त्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी डॉ.कांबळे यांनी सांगितले.