आंबेडकर Live

‘फादर्स डे’ विशेष : माझा बाप दिल्लीतच आहे, त्यांचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांना विद्यार्थ्यांबद्दल विशेष काळजी वाटत असे. ते विद्यार्थ्यांना नेहमी योग्य सल्ला देत असत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी ते जागरुक असत. मला या गोष्टीचा चांगला अनुभव आला.

१९५२ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. यास्तव इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून तिकीट मागावयास दिल्लीला सर्व पार्ट्याच्या कार्यकर्त्यांची फार गर्दी झाली होती. ७ फिरोजशहा रोडवर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी पां.ना. राजभोज राहत होते. बरेच लोक त्यांना भेटायला येत असत. मी तिथे गेलो असता जवळ असलेल्या ब्रिजलाल बियाणींच्या बंगल्यातून एक महाराष्ट्रीयन मनुष्य बाहेर येताना दिसला.

माझ्या स्वभावानुसार मी स्वतः जाऊन माझा परिचय दिला. ते पण त्यावेळच्या चांदा जिल्ह्याचेच कन्नमवार होते. ते काँग्रेसचे सेक्रेटरी होते. ते आपण होऊनच मला म्हणाले होते, ‘निमगडे, तू एम.एस.सी पास आहेस. आता महाराष्ट्रात ये. तुला मी चांदा जिल्ह्यातून एम.एल.ए चे तिकीट देतो!’

हे ऐकून मला फार नवल वाटले. मी म्हणालो, ‘मला पुढे शिकायचे आहे. मला तिकीट नको. तरीपण त्यांनी फार आग्रह केला व म्हणाले, ‘तुमच्या समाजातून चांगले शिकले सवरले उमेदवार मिळत नाहीत म्हणून मी तुला तिकीट द्यायला तयार झालो, पण तू नकार देतो आहेस, पहा विचार कर!’

मी म्हणालो, ‘असे आहे तर मी आधी माझ्या बापाला विचारतो!’ कन्नमवार म्हणाले, अरे तुझा बाप तिकडे चांदा जिल्ह्यात तिथे तू जाशील केव्हा नि येशील केव्हा? आता विचारपूस करायला वेळ नाही.’

मी त्यांना नम्रपणे सांगितले, ‘माझा बाप दिल्लीतच आहे. त्यांचे नाव आहे बाबासाहेब आंबेडकर, हाच माझा खरा बाप!’

त्यानंतर लगेच मी २६, अलीपूर रोडवरील बंगल्यावर बाबासाहेबांकडे जाऊन त्यांना सर्व माहिती सांगितली. बाबासाहेब मला म्हणाले,

‘No no. You should not go in politics. As you are in scientific line. You must continue your research work. Our students should make all-round progress. Some should become renowned scientists, some should become painters, engineers, doctors, wrestlers and some may become musicians etc.’

मला फार अानंद वाटतो की, मी बाबासाहेबांचा उपदेश ऐकला व कृषितज्ञ म्हणून थोडीफार विश्वख्याती प्राप्त केली. अनेक विद्यार्थ्यांना एम.एस.सी. व पीएच.डी. च्या डिग्रीसाठी मार्गदर्शन केले.

शे.का.फे तर्फे १९५२ ला बाबासाहेब मुंबईतून व पां.ना. राजभोज पुण्यातून इलेक्शनसाठी उभे होते. बाबासाहेबांच्या इलेक्शनमध्ये प्रचार करावा व तिकडूनच पुण्याला पण जावे म्हणून मी मुंबईचे तिकीट काढून बाबासाहेबांना भेटायला गेलो. तेव्हा बाबासाहेब माझ्यावर फार रागावले. ते म्हणाले,

You are conducting research for Ph.D Degree. You are a scholar. You must devote your time for studies. You must return your ticket. Don’t come to Bombay for convincing in election. I don’t want victory at the cost of my best students.

बाबासाहेबांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण विद्यार्थ्याला म्हणून प्रेमाने उत्तेजन दिले, त्यामुळेच मी पुढे निकराने अध्ययन करुन पुढे विश्वविख्यात विस्काॅन्सीन विश्वविद्यालयातून पीएच.डी. ही बहुमानाची पदवी १९६२ मध्ये मिळवली. १९६८ मध्ये आॅस्ट्रेलियातील अॅडीलेड येथे भरलेल्या ९ व्या जागतिक मृदुविज्ञान परिषदेत मी माझा अनुसंधान प्रबंध वाचून ‘An untouchable gains world status’ अशी ख्याती मिळवली. पण हे सर्व पहावयास व ऐकावयास त्यावेळी बाबासाहेब जिवंत नव्हते याबद्दल वाईट वाटते.

– डाॅ.ना.मा. निमगडे यांनी सांगितलेली आठवण…

संकलन – इंजि. सुरज तळवटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *