ब्लॉग

कसं मान्य करू की देश बदलत आहे? समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार?

स्वातंत्र्याचा सूर्य उगवून पंच्याहत्तर वर्ष झाली
पण
समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार?

क्रांतिबा फुल्यांनी 1868 साली आपल्या वाड्यातील विहीर अस्पृश्यासाठी खुली केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. 1950 साली संविधानात कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा दंडनीय अपराध ठरविण्यात आला.
पण काल राजस्थानातील सुराणा (जि. Jalor) येथील घटनेने मन सुन्न झाले आहे. …….

सुप्रिय इंद्र मेघवाल,
अवघ्या तिसरीत तर होतास तू वय केवळ 9 वर्ष पण
तू “सरस्वती” विद्या मंदिर शाळेतील पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून
मनुवादी शिक्षकाने तुला इतकं मारलं की तू
जगण्याची लढाईच हरवून बसलास.
कसं मान्य करू की देश बदलत आहे?
कसं मान्य करू की जातीवाद मिटला आहे?
कसं मान्य करू भेदाभेद मिटले आहेत?
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना तुला अस्पृश्य ठरवून मारून टाकल्या जातं. हे खूपच क्लेशदायक आहे. मी पहिल्यांदा आणि अंतिमत: भारतीय आहे, माझं ह्या देशातील माणसांवर प्रेम आहे. म्हणून या घटनेची मला शरम वाटते.

स्वातंत्र्याचा सूर्य उगवून पंच्याहत्तर वर्ष तर झाली खरी पण
समतेचं आकाश अजून देशाच्या अंगणात उतरलंच नाही.
पाण्याच्या, समतेच्या, मानव मुक्तीच्या लढ्यांना स्मरण करीत
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो.
असं म्हणत म्हणत
इंद्र
तुला
भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ.राजेंद्र गोणारकर, नांदेड