ब्लॉग

विरधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर,बलशाली महार मावळे!

जुन्या कोणे एके काळी एक आटपाट नगर होतं, त्या शहरात एक पिळदार शरीर,बलदंड बाहू, धिप्पाड बांधा, एका वेळा चार जणांना गार करेल इतकं हत्तीचं बाळ अंगात असलेला तरुण राहत होता, त्याला पाहूनच कुणाचाही थरकाप उडेल असा त्याचा रुबाब..पण त्याचा स्वभाव मात्र तितकाच मृदू अन मनमिळाऊ, आपल्या साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी अन घरसंसार चालविण्यासाठी त्याला सैन्यात भरती व्हायचं होतं,तसं त्याचं स्वप्न होत.तो राजाकडे जायला निघाला.

राजानी राज्य चालवायला प्रधान नेमला होता..त्या तरुणाला प्रधानाला भेटावं लागलं.प्रधान ही त्याची शरीरयष्टी अन बाना पाहून खुश झाला.पण पायात बांधलेल्या काळ्या धाग्यावरून अन त्याच्या नावावरून प्रधानाला लक्ष्यात आले की हा तरुण जातीनी अतिक्षुद्र आहे.प्रधानाने त्याला सैन्यात भरती साठी नकार दिला.तरुणाने विनंती केली,मी सैन्यात भरती होण्यासाठी कुठलीही खडतर परीक्षा देण्यास तयार आहे, तुम्ही संधी देऊन तर बघा. प्रधान आपल्या खांद्यावरून लटकणाऱ्या जनव्या वरून हात फिरवत कडकडला.. अरे मूर्ख तरुणा.. तू क्षुद्र आहेस..तू कितीही शूरवीर असला तरी तुझीच काय तुझ्या सावलीची देखील आमच्या समोर यायची लायकी नाही आणि तू युद्धभूमीवर जायच्या गोष्टी करतोस.. विटाळ होतो तुझा आम्हाला..चालता हो.

राज्यामध्ये राजाची कमी अन प्रधानाचीच जास्त टाप होती,त्यामुळे इतर कुणाकडे दाद मागण्याचा प्रश्नच नव्हता. तरुण खिन्न मनाने घरी परतला.घरी बायका पोरांची उपाशी तोंडं अन जातीचं भयाण वास्तव अंगाची लाही लाही करत होतं,एकाच नगरात एकाच मातीत जन्मलेली माणसं असा भेदभाव का करत असावीत हा प्रश्न त्याच्या समजण्याच्या पलीकडचा होता.

नगरात इतर काही काम करून पोट भरावं तर नगरातल्या सगळ्या नोकऱ्या-चाकऱ्या स्वतःला उच्च म्हणवून घेणाऱ्यांच्याच हातात.जाती मुळे तेथेही उपेक्षाच.भीक मागून आन हातपाय पसरून पोट भरण्या इतका तो तरुण लाचार नव्हता.

त्याच दरम्यान भारतवर्ष्यात व्यापारासाठी आलेले श्रीमंत लोक सैन्यभरती करत आहे हे त्या तरुणाला समजलं.तिथे काहीतरी व्यवस्था होईल नोकरी मिळेल ही अपेक्षा ठेऊन तो तेथे गेला.तेथे त्याचं स्वागतच झालं नाही तर त्याला त्याच्या योग्यतेचा सन्मान मिळाला.त्याला सैनिक म्हणून नोकरी मिळाली. त्या व्यापाऱ्यांची आणखी एक बाब तरुणाला महत्वाची वाटली ती म्हणजे ती लोक माणसा माणसात भेदभाव करत नसतं, ज्याच्या त्याच्या योग्यते नुसार मानसन्मान देत..एवढंच नव्हे तर सैनिकांच्या कुटुंबियांचा ही योग्य तो मानसन्मान करत. फार जवळ करत जरी नसली तरी तूच्छता तर बिल्कुलच मानत नव्हती, शेवटी त्यांनाही सैनिकांची गरज होती.

तरुण खुश झाला,पोटाला भाकरी मिळाली. अंगाला काम. त्या आटपाट शहरात अशे अनेक तरुण होते. ज्यांची पात्रता असतांनाही फक्त जातीच्या विखरा मुळे त्यांना जनावरापेक्षाही नीच वागणूक मिळत असे. व्यापाऱ्यांची सैन्य भरती हा चांगला पर्याय होता. पोटाला भाकरीच नाही तर माणूस म्हणून जगायला मिळत होतं. तरीही नवीन सैनिक म्हणून भरती झालेल्यापैकी एकाने त्या तरुणाला विचारलेच,” दादा, आपण सैनिक म्हणून काम करत आहोत म्हणजे आपण आपल्या मायभूमीच्या,साम्राज्याच्या विरुद्ध तर जात नाही आहोत ना? ”

त्या तरुणाने खिन्न मनाने उत्तर दिले, “मित्रा, ज्या भूमीत योग्यता असलेल्या माणसाला देखील फक्त जातीच्या आधारावर जनावरापेक्षा नीच वागणूक मिळते, ज्या साम्राज्याचे राज्यकरतेच आपल्याच मातीतल्या माणसाला आपलं मानत नाहीत ते साम्राज्य आपलं तरी कसं, त्यांना आपण तरी कसं आपलं म्हणायचं? आणि शेवटी माणसं म्हणून आपलं ही पोट आहे,आपलाही स्वाभिमान आहेच की. इकडे आटपाट नगरात प्रधानाचा माज दिवसेन दिवस वाढत होता, त्याने राज्यातल्या जातीने क्षुद्र ठरविलेल्यांच्या गळ्यात मडकं अन कमरेला झाडू बांधला होता. एवढच नव्हे तर प्रधानाने राज्य स्वतःच्या नावाने चालवायला घेतलं होतं, राजा केवळ नामधारी केला होता. त्याचा माज काही केल्या संपत नव्हता.
त्याच दरम्यान प्रधानाच्या कानावर बातमी आली, नगरच्या काही अंतरावरच्या नदीच्या किनारी नगरातून व्यापाराकडे सैनिक म्हणून निघून गेलेल्या तरुणांची एक तुकडी वास्तव्यास आलेली आहे. इनमिन सातशे आठशेेचाचा आकडा असवा. प्रधान चवताळला,ह्या सैनिकाला चिरडून टाकू ह्या मनसुब्याने त्याने अठ्ठावीस हजार सैनिकांच्या फौजेसह हल्याची तयारी केली.

इकडे नदीच्या किनाऱ्यावर ही खबर पोहोचली,एकच गलका झाला,सैनिकांच्या व्यापारी नेतृत्वाचा थरकाप उडाला,त्याने मागे हटण्याचा निर्णय घेतला. आपलं सैन्य माघार घेणार हे त्या तरुणाला कळालं, त्याने आपल्या साथीदारांसोबत चर्चा केली, आणि मनसुबा बांधला.काही सहकाऱ्यांसोबत तो तरुण मनसुबा घेऊन नेतृत्वाच्या समोर उभा राहिला,कणखर आवाजात बोलला, आपण मागे हटायचं नाही,युद्ध करायचं. त्याच्या आवाजात गांभिर्य होतं.

नेतृत्व त्या तरुणांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, मित्रा मी समजू शकतो तुझी धग, पण आपलं संख्याबळ,शस्त्रसाठा शत्रूसैन्या समोर काहीच नाही, एकास चार नाही तर एकास चाळीस हे प्रमाण येताय, त्यात आपला अन्न साठासुद्धा तुटपुंजा आहे, आज आपण माघार घेऊ, नंतर आपल्या इतर सैन्याची मदत घेऊ, हवं तर जास्त संख्याबळ घेऊन येऊन परत हल्ला करू, मला आपन ज्या नदी किनाऱ्यावरच्या निर्जीव जमिनीवर उभे आहोत त्या पेक्षा तुम्ही हाडामासाची माणसं महत्वाची वाटतात,जमिण काय पुन्हा जिंकता येईल,गेलेली माणसं नाही.

तरुण गहिवरला,खांद्यावर ठेवलेल्या हातावर स्वतःचा हात ठेवून म्हणाला, मी तुमची काळजी समजू शकतो, पण हा हल्ला फक्त तुमच्या विरुद्ध नाही, त्या प्रधानाला माहीत आहे की ह्या सैन्यतुकडीत जवळपास सगळे सैनिक हे त्याच्याच मायभूमीतले आहेत,त्याला माहित आहे की तो जो हल्ला करतोय तो तुमच्यावर नाही तर आमच्या वर आहे, तो माजलाय, भलेही आपल्याकडे सैन्यसंख्या शस्त्रसाठा कमी असेल, भलेली आपल्या कडे अन्नपुरवठा कमी असेल, पण आपल्या कडे प्रचंड इच्छाशक्ती आहे, आपक्या कडे प्रघाढ चातुर्य आहे, आपल्या कडे त्यांनी पाळलेली जातीय मानसिकतेचा बिमोड करण्याची ताकत आहे, आपल्याकडे आम्हाला सिद्ध करण्याची ही संधी आहे. नगरा मध्ये असतांना आम्ही कित्येकदिवस उपेक्षित होतो भुकेले होतो, आज आम्ही त्याच उपेक्षेचं, त्याच भुकेचं अधिष्ठान करू अन शर्थीनं लढू..तरुणाला आणखी बोलायची गरजच पडली नाही नेतृत्व त्याच्या प्रचंड इच्छाशक्ती पुढे झुकलं, प्रतिहल्ला करायला तयार झालं.

तरुणानी अन त्याच्या साथीदार सैन्यानी कंबर कसली. हातात धारधार तळपती तलवार,भारदस्त निधडी छाती,मांड ठोकत,मिशीवर पिळ मारत तरुण बाहेर पडले, प्रधानाला त्याच्या सैन्यासकट नेस्तनाबूत करायच्या भीमगर्जने सोबतच..अठ्ठावीसवीस हजार विरुद्ध आठशे,इतिहासातला हा अभूतपूर्व लढा होता, युद्धभूमीवर तलवारीचे,बंदुकीचे, घोड्यांच्या खिंकाळण्याचे आवाज घुमू लागले, तरुणांच्या अंगात आज त्यांचं सर्व शौर्य एकवटलं होतं, आज त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती, आज त्यांच्या अस्मितेची लढाई होती, आज त्यांच्या गुलामगिरी विरुद्धची लढाई होती..दिसलं जानवं की फाड कोथळा, दिसली शेंडी की उडव मस्तक..

तब्बल १२ तास कुठलंही अन्न न खाता, घोटभरही पाणी न पिता तरुण लढत होते..हजारोवर्षे चालत आलेल्या जाती वर्चस्वाच्या च्या अन्याया विरुद्ध..अविरत. आणि फक्त आठशे तरुणांच्या सामर्थ्या पुढे अठ्ठावीस हजाराचं बलाढ्य सैन्य झुकलं, प्रधानाच्या साम्राज्याचा पाडाव झाला..तो कायमचाच..

– डॉ.रेवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *