Uncategorized

दीक्षा सोहळ्याचे साक्षीदार, चंद्रपूरचे भूषण इतिहास संशोधक : टी टी जुल्मे.

टी टी जुल्मे हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रख्यात नाव. एवढं मोठं नाव की ज्यांना चंद्रपूर भूषण म्हणावं.ते चंदपूरचे भूषणच होते.मग तसा पुरस्कार कोणी देवो अथवा न देवो किंवा त्यांच्या एवढ्या उंचीच्या व्यक्तीची एखादे विद्यापीठ दखल घेवो अथवा न घेवो,टी.टी.जुल्मे हे निष्ठावंत तसेच अखंड साधना करणारे इतिहास संशोधक होते.

या इतिहास संशोधकाने पतित्यसमुत्पाद,गोंडवनातील ऐतिहासिक मूलचेरा व उत्खननात दोन स्तुपांची उपलब्धी, माणिकगड -गडचांदूरचा प्राचीन इतिहास, विदर्भातील प्राचीन बौद्ध शिलालेख,भद्रावतीचा प्राचीन इतिहास, रामदेगी -रामगिरी नव्हे – संघ आरामगिरी होय,भटाळ्याचा प्राचीन इतिहास ,चपराळा जि.गडचिरोलीचा इतिहास, वढा-जुगाद (पैनगंगा-वर्धा संगम)चा प्राचीन इतिहास, ब्रह्मपुरी येथील उदापूर उपेक्षित स्तुपाचा इतिहास लिहिला.आणि अनेक शोध निबंध लिहिले.अनेक राष्ट्रीय चर्चासत्रात सादर केले.ही प्रेरणा त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून मिळाली होती.

टी.टी.जुल्मे या चंद्रपूर येथील इतिहास संशोधकाने दिनांक ३ आक्टोबर २०२१ रोजी शेवटचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.ते निसर्गाधीन झाले.त्यांचा जन्म चंद्रपूर शहरानजीक असणाऱ्या घोडपेठजवळील कोंढाळी येथे २० सप्टेंबर १९३८ साली झाला होता.

मी चंद्रपूर शहरात १९९७ साली नोकरीनिमित्त आलो.खरं म्हणजे टी.टी.जुल्मे यांना मी शोधलं नाही तर त्यांनीच मला शोधलं.ते सरदार पटेल महाविद्यालयाच्या इतिहास विभागात येत असत.ते शहरात पायीच फिरायचे.त्यांचा नेहमीचा पेहराव म्हणजे पांढरी पँट, पांढरा शर्ट आणि काळा जुता.ते नेहमी म्हणायचे ‘घरी या.’ एकदा त्यांच्या घरी गोपालपुरी येथे गेलो.त्यांचं घर मी बघायला लागलो.ते घर म्हणजे जणू एक म्युझियम होतं.त्यांच्या घरातील ऐतिहासिक वस्तू बघून मी चकित झालो.त्यांनी त्यांच्या पलंगाच्या खाली ठेवलेल्या,अनेक लाकडी आलमाऱ्यांमध्ये ठेवलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू मला दाखवल्या.आदिवासी संस्कृतीवरील गोंडकालीन वस्तूंचा त्यांचा अभ्यास दांडगा होता.ते घर जणू ऐतिहासिक आणि आदिवासींच्या संस्कृतीचं संग्रहालय होतं.त्या अतिशय मूल्यवान वस्तू आहेत.त्या ऐतिहासिक वस्तू दाखवतानाचा त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता.हे दाखवू की ते दाखवू असं त्यांना झालं होतं.तो उत्साह अगदी तिशीतला होता.आपलं हे वैभव कुणीतरी जाणत्याने बघावं असं त्यांना वाटत होतं.

एकदा माझ्या मुलीला त्यांच्या घरी घेऊन गेलो होतो. तेव्हा त्यांनी अनेक ऐतिहासिक ग्रंथ दाखवले.त्याविषयी ते भरभरून बोलत होते.अगदी सम्राट अशोक ते यु आँन च्वांग या सर्वांवर बोलत होते.प्राचीन वस्तूंचा संग्रह दाखवत होते.इ.स.पूर्व ७ व्या शतकापासूनची देशी विदेशी नाणी दाखवत होते.माझ्यासाठी ते सगळं अद्भूत होतं.आदिवासी संस्कृतीच्या कला वस्तू दाखवून त्यावर बोलत होते.मूर्त्या,भांडे,वाद्ये,दागिने आणि खूप मोठ्या आकाराच्या फ्रेमवर असलेले चित्र दाखवत होते.

एकदा ,चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षा समारंभावर लेख लिहितो असे म्हणताच त्यांनी ‘बाबासाहेब करे पुकार…बुद्ध धर्म को करो स्वीकार ‘ असे लिहिलेला १९५६ चा पाँप्लेट झेरॉक्स करायला दिला.झेरॉक्स करून मी लगेच परत केला.त्यांनी तेव्हाच्या अनेक कार्यकर्त्यांचे ग्रुप फोटो दिले.चंद्रपूर येथील धम्मदीक्षा समारोह प्रसंगीचा माईसाहेब सविता आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच बँ.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सोबतचा फोटो दिला.त्या सर्व फोटोंच्या फोटोकाँपी काढून त्यांचं मूल्यवान धन त्यांना परत केलं.बाबासाहेब आणि माईसाहेबांसोबत तेव्हाचे कार्यकर्ते श्रीहरी देवाजी खोब्रागडे, प्रल्हाद सोनबाजी भगत,तुकाराम नामदेव खोब्रागडे, उपासराव घागरगुंडे,बँ.राजाभाऊ खोब्रागडे, रामदास दिनूजी रायपुरे, श्री.बी.एस.वराळे औरंगाबाद यांचे फोटो दिले.१७ आक्टोबर १९५६ चा बाबासाहेबांसोबत नानकचंद रत्तू खांद्याचा आधार देऊन चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनकडे नेत असल्याचा फोटो,तेव्हाच्या भारतीय बौद्धजन समितीचा फोटो त्यांच्यामुळेच माझ्याकडे आहे.आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांचा चंद्रपूर येथे दीक्षा देतानाचा फोटोही आहे.त्या फोटोतील व्यक्तींबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल ते भरभरून सांगत होते.मी त्यांची मुलाखत घेतली होती.जी ‘बहुजन समाचार ‘ मध्ये छापून आली होती.आमच्या पिढीसाठी तसेच पुढील पिढीसाठी त्यांनी मूल्यवान संपदा जतन करून ठेवून आम्हावर उपकार करून ठेवलेले आहेत.

जेव्हा जेव्हा जापान किंवा जर्मनीहून काही इतिहास संशोधक चंद्रपूरला आलेत तेव्हा येथील इतिहासाची खडानखडा माहिती सांगणारी व्यक्ती म्हणजे टी.टी.जुल्मे.मला खूपदा वाटतं की टी.टी.जुल्मे यांच्या पाठीमागे राजकीय पाठबळ असतं तर या शहरात त्यांनी जपलेल्या ऐतिहासिक वस्तूंसाठी, जगाला दाखवण्यासाठी शासनाने संग्रहालय उभारले असते.ते उभारणे आवश्यक आहे.

कोण होते टी.टी.जुल्मे ? टी.टी.जुल्मे पोस्ट खात्यात कामाला असलेली लहानशी व्यक्ती. नंतर प्रमोशन झालं, ते डाक नेण्या आणण्याच्या कामावर.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी नोकरी केली.वरच्या पदावर गेले परंतु संशोधनाची उर्मी थांबली नाही. उलट वाढतच गेली.पोस्टाची माणसं म्हटली की मला एका महान कवीची आठवण होते तो म्हणजे कवी सुधाकर गायधनी आणि दुसरं मोठं नाव म्हणजे माननीय टी.टी.जुल्मे. ते इतिहास संशोधकाकडे कसे वळले असतील ? ते वेड त्यांच्या मनात कसे शिरले असेल ?

आपणास एक ऐतिहासिक घटना माहीत असेल.१६ आक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना चंद्रपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली.त्यावेळी टी.टी.जुल्मे नावाचा एक स्वयंसेवक असलेला १८ वर्षे वयाचा तरूण हे सगळं भारावून बघत होता.तो समता सैनिक दलातील एक स्वयंसेवक होता.डॉ. बाबासाहेबांचे संरक्षण तसेच येणाऱ्या लाखो लोकांचे नियोजन यासाठी समता सैनिक दल राबत होते.जुल्मे साहेब त्या दीक्षा सोहळ्याचे साक्षीदार होते.मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते भरभरून बोलत होते.भारावून बोलत होते.जणू ती घटना कालंच घडून गेली.ती घटना सांगताना ते जणू त्या प्रसंगात,भूतकाळात हरवले आणि सांगायला लागले,”चंद्रपूरच्या सर्किट हाऊसला होतो.माझी वय त्यावेळी अठरा वर्षाची होती.मी सर्वीसला लागलो होतो.साडेआठ महिने माझी पोस्टात सर्वीस झाली होती आणि व्हालींटर झालो होतो.लाल सदरा आणि खाकी पँट घालून बाबासाहेब ज्यावेळी मूलवरून चंद्रपूरच्या सर्कीट हाऊसला आले त्यावेळी गेटवर त्यांचा आम्ही सहाशे लोकांनी सलामी देऊन,समता सैनिक लोकांनी, आम्ही त्यांचं स्वागत केलं.

…………..भावना अशी होती की बाबासाहेबांच्या हस्ते दीक्षा घेण्यासाठी लोक उत्साही होते आणि आपले सारे कामधंदे बाजूला सारून मुलाबाळांसह ते चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आले होते.तिकडे जन्ता कॉलेजपर्यंत घरं नोयते..!”

गोंड राजांनी बनवलेले किल्ले,त्यांचे पाण्याचे व्यवस्थापन त्यांनी मला स्वतः दाखवले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्या कालखंडातील एकूण एक कागद त्यांनी जपून ठेवला.आमच्या पिढीसाठी ते जिवापाड जपून ठेवले.चंद्रपूर जवळील भद्रावती हे प्राचीन ऐतिहासिक नगर.तिथे बौद्धांची विज्जासन टेकडी आहे.तिचा इतिहास त्यांनी मला समजावून सांगितला.इतिहास व पुरातत्व हे माझे आवडीचे विषय असल्याने त्यांची माझी नाळ जुळली.मी माझ्या आईवडिलांना तसेच पत्नीला घेऊन विज्जासन टेकडी बघायला गेलो.तेव्हा ते प्राचीन अवशेष ऐतिहासिक दृष्टीकोणातून घरच्यांना समजावून दिले.टी.टी.जुल्मे साहेबांमुळेच चंद्रपूरच्या दीक्षा सोहळ्याच्या अनेक साक्षीदारांच्या मुलाखती मी घेतल्या.जसे समाधी वार्डातील पुंडलिकजी देव साहेब,चंद्रपूर भूषण दिवंगत शांतारामजी पोटदुखे, दिवंगत रामदासजी रायपुरे,खुटाळ्याचे मेश्रामजी वगैरे.

१७ आक्टोबर १९५६ चा बाबासाहेबांचा माईसाहेबांसोबतचा फोटो सध्याच्या रेस्टहाऊसमध्ये लावण्यासाठी टी.टी.जुल्मे यांनी खूप प्रयत्न केले.शासनाशी पत्र व्यवहार केला.शेवटी त्यांना यश आले.आता तो फोटो चंद्रपूर येथील विश्रामगृहात आहे,तिथे तो फोटो आपणास बघता येईल.एका साध्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यापासून इतिहास संशोधकापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

टी.टी.जुल्मे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आई भीमाबाई यांच्या समाधीची जागा शोधून,आपल्या सोबत्यांबरोबर फोटो काढून मातोश्री भिमाईवर एक पुस्तक लिहिले.त्यांना इतिहासाबद्दल प्रचंड ओढ होती.कितीही कष्ट पडले तरी उपसण्याची धडपड आणि कमालीचा साधेपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते.त्यांनी त्यांच्या एका पुस्तकाला माझी प्रस्तावना घेतली.जेव्हा की मी त्यांना मुलासारखा होतो.टी.टी.जुल्मे या माणसाच्या वेडाला आयुष्यभर साथ दिली,त्यांची पत्नी जिजाबाई यांनी.त्यांचे त्यांच्या जिजावर अतिशय प्रेम होते.त्यांच्या या कार्यात जिजाबाईंचे मोलाचे योगदान आहे.

खरं म्हणजे टी.टी.जुल्मे यांच्या जिवंतपणी विद्यापीठांनी त्यांची दखल घेणे आवश्यक होते.त्यांनी संचय केलेल्या ऐतिहासिक सामुग्रीसाठी शासनाने एखादे संग्रहालय उभारल्यास चंद्रपूर शहराकडे जगातील इतिहास संशोधकांचे पाय निश्चितच वळतील.चंद्रपूरातील इतर संशोधकांना त्यात संधी मिळेल.नवीन संशोधकांना माहिती व प्रेरणा मिळेल.टी.टी.जुल्मे हे चंद्रपूरच्या इतिहासाचे चालते बोलते विद्यापीठ होते.त्यांना त्यांच्या जिवंतपणी पद्मश्री मिळाली असती तर याच जिल्ह्याला मोठेपण लाभले असते.चंद्रपूर ही कोळशाची नव्हे तर हिऱ्यांची खाण आहे.त्यातील एक मूल्यवान हिरा म्हणजे टी.टी.जुल्मे होत.

डॉ. विद्याधर बन्सोड
प्राध्यापक तसेच मराठी विभागप्रमुख
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर.
भ्र.ध्व.९४२१७१७२९५