बुद्ध तत्वज्ञान

दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय?

मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते. मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते. दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे. संत तुकाराम म्हणतात ‘या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे’. तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?

दीघ निकाय मधील महासतिपठ्ठान सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात “भिक्खूंनो, दुःख काय आहे ? जन्म होणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मरण दुःख आहे, शोक करणे दुःख आहे, रडणे-ओरडणे दुःख आहे, पीडित होणे दुःख आहे, चिंतित होणे दुःख आहे, त्रस्त होणे दुःख आहे, आप्रियांचा संबंध दुःखकारक आहे, प्रियजनांचा वियोग दुःख आहे, इच्छेची पूर्तता न होणे दुःख आहे. थोडक्यात पाच उपादान स्कंद दुःख आहेत. व्यथा, भोग, त्रास, ताप, कष्ट, क्लेश, वैफल्य, त्रागा, पीडा, कारुण्य, विशाद, अशांतता, असमाधान, शोषण, चिंता, निराशा, व्याकुळता इत्यादी दुःखांच्या अनेक छटा आहेत. सर्व आयुष्यभर मनुष्याला त्या पीडित असतात. त्यामुळे मनुष्यप्राणी हतबल होऊन जातो. आणि दुःख मुक्तीचा मार्ग माहीत नसल्याने काल्पनिक देवांचा धावा करतो. भगवान बुद्धांचा दुःख नष्ट करणाऱ्या व परमसुख देणाऱ्या निर्वाणाचा मार्ग भारतातून जरी लोप पावला तरी १२ व्या शतकातील ज्ञानेश्वरांपासून १७ व्या शतकातील रामदासांपर्यंत अनेक संतांच्या अभंगात दुःख नष्ट करण्यासाठी सदाचरणाचा मार्ग व्यक्त झाला आहे. ज्यामधून बुद्ध तत्वज्ञानच प्रतिबिंबीत होते.

संत साहित्यावर बुद्ध विचारांचा पगडा का आढळतो या बाबत अनेक भारतीय विद्वान मूग गिळून बसले आहेत. वास्तविक पापकर्मे त्यागण्याचा व पुण्यकर्मे अर्जित करण्याचा उपदेश संतांच्या अभंगातून ठिकठिकाणी आढळतो. ‘जसे बीज असेल तसेच फळ प्राप्त होईल’ हा बुद्धांचा कम्म सिद्धांत सर्व संतांनी सांगितला. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे तुकारामांनी देखील लिहिले आहे. बौद्ध धर्माचा पायाच मुळी ‘जग हे दुःखमय असून त्यातून मुक्त होण्यासाठी सदाचरणाचा अष्टांगिक मार्ग’ या तत्त्वावर उभारला आहे. या सृष्टीत अनित्यता भरलेली असून देखील मनुष्याची त्याबद्दलची आसक्ती खूप आहे. जी पुन्हा पुन्हा जन्माला घालीत असते असे बुद्धांनी स्पष्ट केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी परिवर्तनशीलतेचा केलेला उल्लेख बुद्ध तत्वज्ञानाशी सुसंगत वाटतो. संत नामदेव हा प्रपंच खोटा व आभासी आहे व तेथे दुःख अनंत आहे असे म्हणतात. संत एकनाथ म्हणतात चौर्‍यांऐशी लक्ष योनी भोगूनही दुःख संपत नाही. सुखाचा प्रत्येक क्षण हळूहळू नष्ट होत आहे. थोडक्यात सर्व संतांनी प्रिय वस्तूंचा हळूहळू होणारा नाश व त्यांचा वियोग यातच दुःखाचे कारण मांडले आहे.

बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांना प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांता बरोबर चार आर्यसत्ये आणि आर्यअष्टांगिक मार्गाचा बोध झाला. हाच दुःख मुक्त होण्याचा मार्ग असून अखिल मानवजातीप्रती करुणा उत्पन्न होऊन बुद्धाने तो अडीज हजार वर्षांपूर्वी विशद केला. आणि पुन्हा सांगितले आहे की “भिक्खुंनो, सुवर्णकार जसे सोने तापवून व दगडवर घासून त्याची परीक्षा करतो तशी माझ्या वचनांची परीक्षा करून नंतरच ते ग्रहण करा. केवळ माझ्या गौरवप्रभावाने प्रभावित होऊन ग्रहण करू नका”. असा उदार दृष्टिकोन बुद्धांशिवाय इतर कोणत्याही धर्म संस्थापकाने दाखविलेला नाही. इतर धर्मग्रंथात विचार स्वातंत्र्याची एक ओळ ही आढळत नाही, हे सत्य आहे. म्हणूनच जे सुज्ञ आहेत ते अभ्यास करून त्या मार्गावरून चालून स्वतःच दीपस्तंभ होत आहेत. आणि जे सुख म्हणजे नक्की काय असतं, हे शोधण्यासाठी धावत आहेत ते प्रत्यक्षात अंधारात चाचपडत आहेत.

( संदर्भ : मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव – डॉ. भाऊ लोखंडे )

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)