जगप्रसिद्ध विचारवंत(फिलॉसॉफर) अल्बर्ट आईन्स्टाइन याने एक भाकीत केले होते की जगात फक्त बुद्धांचा मावतावादी धर्मच शिल्लक राहील. आज या विचारवंतांचे भाकीत कोरोनामुळे खरे ठरले आहे असेच म्हणावे लागेल. बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू हा मानव आहे. माणसामाणसामधील उचित व्यवहार अर्थात मानवतावादी व्यवहार हा बुद्ध धम्माचा पाया आहे.
कोरोना या जीवघेण्या व्हायरसने जगात मृत्यूचे तांडव मांडले असल्यामुळे लोक आज भयभीत झाले आहेत. या व्हायरसवर विजय मिळवण्यासाठी जगातील प्रत्येक देशाने आपला देश लॉकडाऊन केला आहे. परंतु या लॉकडाऊनच्या काळात ज्यांची हातावरील पोट आहेत अशा गरजू लोकांची भोजनाची व्यवस्था करताना अनेक लोक दिसत आहेत. अनेक लोक अडचणीत सापडले आहेत त्यांना सर्व प्रकारची मदत करताना लोक दिसत आहेत. ही मदत करताना कुणीही जात धर्म विचारत नाही किंवा पाहत नाही. मदत करताना माणुसकीचा धर्म पाळत आहेत.
जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतो हा लोकांचा विश्वास सुद्धा कोरोनाने खोटा ठरवला आहे. कारण ज्यांच्यावर अपार श्रद्धा व विश्वास लोकांनी ठेवला होता त्यांचे दरवाजे सुद्धा आज लोकांसाठी बंद झाले आहेत. दरवाजे खुले आहेत ते रुग्णालयाचे तेही 24 तास. ज्याला कोरोनाची बाधा झाली आहे त्याच्यासाठी डॉक्टर, नर्स व श्रमिक वर्गातील कर्मचारी हे देव झाले आहेत. त्यामुळे गाडगेबाबा जे म्हणायचे ” देव देवळात नाही,जिता जागता देव हा माणसात असतो, देवळात पुजाऱ्याचे पोट असते.” ते आज लोकांना पटले असेल.
आम्हाला देवळांची नाही तर रुग्णालये व शाळांची गरज आहे हे ही लोकांना पटले असेल. जेव्हाही आपदा येते मग महापूर असो, भूकंप असो,पटकी, प्लेग,स्वाईन फ्लू यासारखे साथरोग असो तेव्हा तेव्हा लोक लोकांच्या मदतीला व विज्ञान लोकांना वाचवायला पुढे आलेले पाहायला मिळते. त्यामुळे धार्मिक श्रद्धा व विश्वास हा मिथ्या आहे ,विज्ञान व मानवतावाद आणि माणुसकी सत्य आहे हेच सिद्ध होते. म्हणूनच माणसाने माणसाशी कसे वागावे याचा आदर्श घालून देणारा बुद्धांचा धम्म श्रेष्ठ आहे आणि तोच जगात शिल्लक राहील हे आइन्स्टाइनचे भाकीत आज खरे ठरले आहे, असेच म्हणावे लागेल…..”
अशोक नगरे, पारनेर (लेखक – मोडी लिपी तज्ज्ञ, लेणी, शिल्पकला, बौद्ध स्थापत्य आणि बौद्ध इतिहास अभ्यासक)