इतिहास

सम्राट अशोका – जगातील सर्वश्रेष्ठ नृपती

एच.जी.वेल्स या ख्यातनाम ब्रिटिश इतिहासकाराने सम्राट अशोकाचे मूल्यमापन करताना प्रतिपादिले- “Amidst the tens and Thousands of the names of Monarchs that crowd the columns of history… the name of Ashok shines and shines alone almost like a Star.”

मराठी सारांश असा की, “इतिहासाच्या परिच्छेदा परिच्छेदातून गर्दी करून असलेल्या शेकडो नव्हे, हजारो राजांच्या नावांमध्ये अशोकाचेच एकट्याचे नाव तेजाने तळपते, ताऱ्यासारखे चकाकते.” तात्पर्य , वेल्ससाहेबाला एकूण जगाच्या इतिहासात अशोकाचे व्यक्तिमत्त्व सर्वश्रेष्ठ वाटले. अशाच आकारची मते इतरही पाश्चिमात्य आणि भारतीय विद्वानांनी व्यक्त केली आहेत. ती पूर्णपणे रास्त आहेत हेही मान्यच केले पाहिजे.

सामान्य माणसाला सम्राट अशोकाचे नाव ज्ञात असते ते एक बौद्ध धर्म प्रसारक राजा म्हणून! बौद्ध धर्माला राजाश्रय देणारा, परधर्मसहिष्णू नृपती म्हणूनच, परंतु सम्राट अशोक खरोखरच एक सर्वश्रेष्ठ असामान्य आणि अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वाचा नृपती होता. त्याचं नेमक अलौकिकता, असामान्यत्व आणि श्रेष्ठत्व. सर समजून घेतलं पाहिजे. अराज्यारोहणानंतरच्या सात आठ वर्षांनंतरचा एक प्रसंग आहे. मौर्यनृपती अशोकाने आपल्या सेनापतीला बोलवलंय. मौर्य साम्राज्याच्या सीमा खंडप्राय भारतातच नव्हे, तर खैबरखिंडीच्या पलीकडेपर्यंत जाऊन भिडल्या होत्या, परंतु ओरिसातलं एक छोटसं; पण बलाढ्य राष्ट्र मात्र आपलं स्वतंत्र याचे अस्तित्व टिकवून होतं. हे राज्य होतं कलिंग देशीचं. कलिंगचे लोक अत्यंत शूर व लढवय्ये होते, खूप जिद्दी होते. अशोकाने सेनापतीशी बोलताना कलिंग देशावरील सिद्धार्थ स्वारीची तयारी करण्याची आज्ञा दिली. कलिंगची लढाई झाली. या लढाईचे सविस्तर वर्णन उपलब्ध नाही, परंतु या लढाईनंतरची कलिंगची वाताहत मात्र एका शिलालेखातून आपल्याला कळते. त्या काळात म्हणजे आजपासून दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी कलिंगातले एक लाख लोक मृत्युमुखी पडले. हजारो जायबंदी झाले. अशोकाने आपल्या विजयानंतर जेव्हा कलिंग नगरीत प्रवेश केला तेव्हा त्याला रस्त्यावर पूर्णपणे सामसूम दिसली. लोकांनी आपली दारं, खिडक्या लाऊन घेतलेल्या. साऱ्या राजधानीवर शोककळा पसरली आहे, हे अशोकाने पाहिले.

ही कलिंगची स्वारीच अशोकाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारी घटना ठरली. इथेच अशोकाच्या अलौकिकत्वाची प्रचिती येते. अशोकाचे व्यक्तिमत्त्व असामान्य वाटते. भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातला तो सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून अधिकच प्रभावी वाटतो. अशोकाने कलिंग देश जिंकला. हजारो लाखो लोक या लढाईत मारले गेले. अशोकाच्या सैन्याने प्रयत्नांची शर्थ करून प्रचंड पराक्रम दाखवला. या साऱ्या गोष्टी इथे घडल्या; पण त्यात असामान्यत्व ते काय? जगाच्या इतिहासात पानापानांवर अशी असंख्य राजांची नावं आढळतील की, ज्यांनी अशा एक नव्हे, अनेक लढाया केल्या. असेच किंबहुना यापेक्षाही अधिक माणसे मारली. प्रचंड पराक्रम दाखवला आणि विजयश्री प्राप्त केली.

एक अलौकिक व्यक्तिमत्त्व
लढाईतल्या शौर्याने, मिळालेल्या विजयाने अशा राजांची महत्त्वाकांक्षा वाढलेली इतिहासात आपल्याला दिसते. रणमैदानावरच्या मृत्यूने त्यांना स्फुरण चढते. शत्रूपक्षातील सैन्याची प्राणहानी, वित्तहानी पाहून सामान्य राजांना, सेनापतींना दुःख नाही तर त्यांचा अभिमान फुलून उठतो. म्हणूनच त्यांच्यातून सर्व जग जिंकण्याची ईर्षा बाळगणारा सिंकदर जन्माला येतो. नेपोलियन बोनापार्टच्या रूपातला आधुनिक जगातला जगजेत्ता सेनापतीही याच ईर्षतून उदयाला आलेला असतो. यशाची नशा ही माणसाला बेफाम करते . अशीच ही रणभूमीवरची नशा. एका लढाईतील यशाने ही धुंदी चढते आणि ती वाढतच जाते. यश जेवढे कठीण तेवढी यशाची धुंदी अधिक. ही झाली सामान्यांची कथा. सम्राट अशोकाच्या आयुष्यातही हेच घडले असते तर जगाच्या इतिहासात आणखी एका पराक्रमी जगज्जेत्या नृपतीच्या नावाची भर पडली असती; पण अशोक हा जगाच्या इतिहासातील एक अलौकिक आणि असामान्य नृपती ठरला. तो कलींगच्या यशानंतर कसा वागला यावरून.

एवढा प्रचंड पराक्रम करून कलिंगची लढाई सम्राट अशोकाने जिंकली. त्यानंतर तो कलिंग देशात प्रवेश करता झाला. कलिंग देशात प्रवेश करताच त्याचे मन दुःखाने विदीर्ण झाले. प्राणहानी पाहून इतरांना, सामान्य राजांना वीरश्री संचारली असती; पण सम्राट अशोक दुःखी, कष्टी झाला. त्याला प्रचंड यशाची धुंदी चढलीच नाही. स्थिर चित्ताने त्याने यशापयशाचे गणित मांडले. काय मिळवले याचा विचार केला. हा तर विचार सारेच करतात. त्याने काय गमावले. याचाही विचार केला. त्याच्या हे लक्षात आले, की कलिंगच्या लढाईतून आपण कलिंग देश जिंकला. प्रचंड साधनसंपत्ती हाती आली; पण त्या जमिनीवर राहणारी चालतीबोलती माणसं मात्र आपण गमावलीत. बरीचशी मारली गेली. जिवंत राहिली ती ही मनानं अशोकाला दुरावली. देश निर्जीव संपत्तीने समृद्ध असतो की त्यावर राहणाऱ्या जिवंत माणसामुळे? ज्या युद्धामुळे ही जिवंत माणसं आपण गमावली, त्यांची मनं दुखवली, त्यांच्या मनात सुडाचा अग्नी प्रज्ज्वलित केला की युद्ध आपण कशासाठी लढायची? लढाईतील विध्वंस बघून अशोकाचे मन द्रवले होते. तो अंतर्मुख झाला. विचार करू लागला आणि त्याला शस्त्राची निरर्थकता जाणवली. शस्त्राच्या मर्यादा लक्षात आल्या, शस्त्राने, पराक्रमाने निर्जीव जमीन, जुमला, इमारती, डोंगर, दऱ्या, धन, धान्य, संपत्ती जिंकता येते; पण जिवंत माणसांच्या शरीरातली मनं जिंकायला शस्त्रं निरुपयोगी ठरतात. हे त्याला प्रकर्षान जाणवले. हिंसेने हिंसा वाढते. शस्त्राने शस्त्राला पराभूत करताच येत नाही , याची त्याला प्रचिती आली. या विचाराने अशोक अहिंसेकडे आकर्षित झाला. यापुढे शस्त्रसामर्थ्यावर साम्राज्यविस्तार न करता लोकांच्या मनावर राज्य करण्याचा त्याने निश्चय केला. त्याने प्रेम, दया, क्षमा या भावनेने लोकांना जिंकायचे ठरवले. त्याने युद्धाचे भेरीघोष बंद केले. सुखयात्रा त्याजिल्या. सैन्याच्या कवायतीवरील भर कमी केला. मांसाहाराचा त्याग केला.

बौद्ध भिक्षू उपगुप्ताच्या संपर्कातून त्याची बौद्ध धर्मांविषयाची जिज्ञासा जागृत झाली. त्याने उर्वरित आयुष्य बौद्ध धर्म प्रसारात घालविले. अनेक विहार बांधले. स्तूप उभारले. तिसरी बौद्ध धर्म परिषद भरवली. देशोदेशी धर्मप्रसारक पाठविले. बौद्ध धर्माला त्याने राजाश्रय दिला. अशोकाचे अलौकिकत्व दिसते ते यात की, शस्त्राच्या यशस्वी उपयोगानंतरही त्याला शस्त्राची निरर्थकता जाणवली. शस्त्रास्त्रांची प्रशंसा करणारे सहस्रावधी राजे इतिहासात आढळतात; पण शस्त्राची निरर्थकता प्रतिपादन करणारा यासम हाच!