कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगामध्ये अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असला तरी सुद्धा या संकट काळामध्येही आपल्याला काही नव्या संधी उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र राज्याचे लघु व मध्य्म उद्योग विभागाचे सचिव तथा विकास आयुक्त (उद्योग) डॉ.हर्षदीप कांबळे म्हणाले. ते ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेत बोलत होते.
बुद्ध पौर्णिमा निमित्त तीन दिवसीय ऑनलाईन जागतिक धम्म परिषदेचे आयोजन डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.०५) धम्म परिषदेला सुरुवात झाली असून ७ मे पर्यंत विविध ऑनलाईन कर्यक्रमासह आठ देशातील बौद्ध भिक्खू धम्म प्रवचन देणार आहेत. काल सायंकाळच्या सत्रात ‘कोरोना संकट काळातील उद्योग आणि व्यवसायाचे विश्लेषण’ या विषयावर डॉ.कांबळे आणि बिजनेस कोच विनीत बनसोडे यांनी आपले विचार मांडले.
पुढे बोलताना डॉ.कांबळे म्हणाले की, यापुढे बिझनेस मॉडेल बदलतील काही बिझनेस वाढीला लागतील. जसे वर्क फ्रॉम होम , होम ट्युशन, ऑनलाईन मार्केटिंग, डेटा सेंटर, क्लाऊड कॉम्पुटिंग, आर्टिफिशिअल इंटिलिजिअन्स अशा प्रकारचे बिझनेस वाढीला लागणार आहेत. महत्वाचे म्हणजे डोर टु डोर डिलिव्हरीचे बिझनेस हे खूप चांगल्या प्रमाणात चालतील. लोकांच्या घरी जाऊन तुम्ही भाजीपाला देता हा खूप चांगला बिझनेस होऊ शकतो. गरजेच्या वस्तू घरी लोकांपर्यंत पोचवून देणे हे बिझनेसच साधन होऊ शकते. त्यासोबतच फॅशन टेक्नॉलॉजी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ई कॉमर्स आहेत यांची जोड घालून देता येईल. तो सुद्धा नवीन बिझनेस डेव्हलप होणार आहे.
काही दिवसात फाईव्ह जी येणार आहे, तसेच दोन तीन वर्षात सिक्स जी सुद्धा येईल. याच्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्यामुळे होम इंटरटेन्मेन्ट आणि मोबाईलवर छोट्या छोट्या मुव्हीज व्हिडिओ क्लिप्सच्या स्वरूपामध्ये इंटरटेन्मेन्टचा खूप मोठा बिझनेस डेव्हलप होणार आहे. यावर लक्ष द्यायला पाहिजे. जशी टेक्नॉलॉजी वाढत आहे, आता होलोग्राफीक्स इमेजस मधून आपल्या प्रोडक्टचं मार्केटींग करणं सुरु होणार आहे. उदहारण देताना डॉ.कांबळे म्हणाले की देताना सांगितले की, मोबाईल, लॅपटॉप मध्ये खुर्ची टेबल पाहतो त्यावर क्लीक केले की थ्रीडी इमेज त्यातून बाहेर येईल आणि ती गोलाकार करून चारही बाजूने पाहता येईल. असेही सॉफ्टवेअर येणार असून आता पासून आपली तयारी हवी.
सर्वात महत्वाचे म्हणजे आता चांगलं अन्न सर्वांना लागणार आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाजीपाला कडे लोकांचा भर जाणार आहे. त्यामुळे ऍग्रो प्रोसेसिंगकडे खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे. ऍग्रो प्रोसेसिंगला महाराष्ट आणि भारतात खूप स्कोप असल्याचे सांगून ते दीर्घकाळ कसे चालेल यावर डॉ. कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
हे सर्व करत असताना कुठल्या प्रकारचा बिझनेस करायचा याचे काही तत्व पाळायला पाहिजेत. जसे बुद्ध धम्मामध्ये सम्यक आजीविका असून ते अष्टांगिक मार्गातील एक मार्ग आहे. कुठला बिझनेस करायचा कुठला नाही करायचा, ते दुसऱ्यांना अपायकारक असू नये अश्या प्रकारचेच बिझनेस करायला पाहिजे. शेवटी पैसा कमावणे हाच माणसाचा ऊद्देश नसतो. चांगले जीवन जगणं, आपल्या जीवनाला काही अर्थ असणे यालाही तेवढेच महत्व आहे. हे कितीही संकट मोठे असले तरी यातून आपण बाहेर येऊ शकतो. असं डॉ.कांबळे यांनी सांगितले
तसेच आज उद्या बिझनेस डाऊन आहेत तरी एक दोन वर्षात अर्थव्यवस्था उभारी घेईल असा विश्वास डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला. त्यासोबत या काळात शांत डोक्याने राहिलो आणि थोडासा ताण वाढल्यामुळे मेडिटेशन आपण करायला लागलो तर त्याचाही फायदा होतो. चांगल्या विचाराने एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो, त्याच्यामधून चांगलं प्लॅनींग तयार होऊ शकतं. ते आपल्याला नक्कीच बिझनेस मध्ये मदत होणार आहे. असा थोडासा आर्थिक बाजू आणि थोडासा धम्माची बाजू अशी मिळवणूक केली तर त्यामधून चांगलं प्रॉडक्ट बाहेर येऊ शकते. त्याचा फायदा मनुष्य जातीला फायदा होऊ शकतो. असे डॉ.कांबळे यांनी बोलताना विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर बिझनेस कोच विनीत बनसोडे यांनी नोकरी करणाऱ्या लोकांना बिझनेस मध्ये येण्याची भीती का वाटते, यावर बोलताना म्हणाले की लहान असल्यापासून आपल्याला बिझनेस म्हणजे नुकसान, कर्ज, अश्या अनेक गोष्टी सतत ऐकत असतो. त्यामुळे आपल्या मनात बिझनेस बद्दल भीती बसलेली असते.
तसेच बिझनेस करताना नॉलेज, स्किल्स आणि ऍटीट्युड या तीन गोष्टी असतील तर यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन श्री बनसोडे यांनी केले. त्यासोबतच बिझनेसची सुरुवात कशी करावी? पैसा किती लागतो?, जाहिरात कशी करावी? अश्या अनेक प्रश्नावर लाईव्ह कार्यक्रमात बिझनेस सुरुवात करणारे आणि सुरु असणाऱ्या अनेक युवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी ऑनलाईन धम्म परिषदेला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. जगात पहिल्यांदाच एवढ्या स्वरूपात ऑनलाईन बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात असून डॉ.कांबळे यांच्या या उपक्रमाचे जगभरातून कौतुक होत आहे.